आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक घोटाळे: गुंतवणूकदारांना गंडविण्याचा नवा फंडा, शेकडो पर्यटकांना कोट्यवधींचा गंडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धार्मिक आणि द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेले नाशिक आता आर्थिक घोटाळयांसाठीही प्रसिद्ध होत चालले आहे. दर महिन्याला एक तरी आर्थिक फसवणुकीचा प्रकार घडत असल्याची माहिती 'डी. बी. स्टार'च्या हाती लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातच टुर्सचालकांकडूनच नवीन प्रकारे पर्यटकांची फसवणूक करण्याचा नवा फंडा आणला आहे. हज-उमराह यात्रेला जाणाऱ्या भाविकांसह शहरात वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टरांचीही टुर्सचालकांकडून फसवणूक झाल्याचे समोर आले आहेत. गेल्या पाच वर्षांत सुमारे एक हजाराहून अधिक कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक झाली असून मोजक्याच तक्रारींचा हा आकडा समोर आला आहे. फसवणुकीच्या या मालिकेवर 'डी. बी. स्टार'ने टाकलेला हा प्रकाशझोत...

 

गुंतवणूकदारांच्या केबीसी, मैत्रेय, मिरजकर सराफ यांचा तपास अद्याप सुरूच असतांना शहरात एकामागाेमाग एक फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. सध्या परदेशात यात्रेला घेऊन जाणाऱ्या यात्रा कंपनींकडून फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. हज-उमराह यात्रेचे आयोजन करण्याचे शेकडाे भाविकांकडून रक्कम जमा करून त्यांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

त्या आधीच शहरात अशा प्रकारे अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. विशेष म्हणजे, यात शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) संघटनेच्या ७७ डॉक्टरांचा समावेश आहे. डॉक्टरांची तुर्की (तुर्कस्तान) या ठिकाणी सहल जाणार होती मात्र, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या कंपनीने एन वेळी सहल रद्द करत या डॉक्टरांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला. काही दिवसांपासून अशा प्रकारे टुर चालकांकडून सुरू असलेल्या फसवणूकीच्या घटना वाढत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर शहरात काही भामटे पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून, खोट्या स्किम काढून इतरांपेक्षा जास्त व्याजदराचे आमिष दाखवून हजारो लोकांची फसवणूक करीत असल्याचे ही चित्र आहे. लकी ड्रॉच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, दामदुप्पट याेजनेत लाखो रुपयांची फसवणूक, शिक्षक, बँकेत भरतीच्या नावाने फसवणूक, यांसह फ्लँट, कार, बुलेट, दुचाकी यांसह विविध लाखो रुपयांची वस्तूंची अामिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचीही धक्कादायक बाब प्रकार उघडकीस येत अाहे. 


फसवणुकीच्या प्रकारात वाढ, पोलिसांचे दुर्लक्ष 
फसव्या गुंतवणूक योजनांचे राज्यातील वाढते पीक बघता याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी गुंतवणूक आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांची या मोहिमेकरिता मदत घेतली जाणार होती. या मोहिमेत टी.व्ही., केबल यांसारख्या माध्यमातून घराघरांपर्यंत ही जनजागृती केली जाणार हाेती. मात्र, पोलीसांनाच या मोहिमेचा विसर पडला आहे. नाशकात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार घडत असताना पोलिसांकडून मात्र, याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र आहे. 


कोर्टात मागणार दाद... 
सध्या शहरात यात्रे कंपन्या उघडून पर्यटनाला जाणाऱ्यांची फसवणुकीचा नवा फंडा काही भामट्यांनी आणला असून धार्मिक ठिकाणांच्या नावाखाली ही फसवणूक केली जात असल्याचे प्रकार सध्या घडत आहे. आमच्या कुटुंबियातील ८ लोकांची उमराहसाठी बुकिंग केली होती. त्यासंदर्भात आम्ही कोर्टात दाद मागणार आहेत. - व्ही. आर पटेल, फसवणूक झालेली व्यक्ती 
परदेशी टूरच्या बहाण्याने फसवणूक दर महिन्याला आर्थिक फसवणुकीचा एक प्रकार 


 
टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीन्यांकडून फसवणुकीचा नववीन धंदा 
शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची फसवणूकीचे प्रकार सुरु असल्याचे विविध घटनांच्या माध्यमातून पुढे आले आहेत. डॉक्टरांची तुर्की (तुर्कस्तान) या ठिकाणी सहल घेऊन जाण्याच्या नावाखाली फसवणुकीसह हज व उमराहसाठी जाणारे शेकडो भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आला आहेत. 


अशी आहेत प्रकरणे 
१.
काही महिन्यांपूर्वी शहरातील आयएमए संघटनेचे काही डॉक्टर दिवाळीच्या सुटीनिमित्त तुर्कस्तानला जाणार होते, त्यामुळे प्रत्येकी एक लाख ११ हजार रुपये फी हॉलिडे टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीकडे जमा केली होती. अचानक रोवरकेशन कंपनीने 'जमा झालेल्या 'फी'मध्ये तुर्कीला जाता येणार नसल्याची नोटीस आयएमए संघटनेला पाठवली आहे. तुर्कीची सहल आम्हाला परवडणारी नसून आम्हाला आणखी ८० प्रवाशी द्या सोबतच आणखी ३० हजार रुपये द्या अशी मागणी त्या नोटीसमधून करण्यात आली. यामुळे डॉक्टरांकडून यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. 


२. शहरातील जहान इंटरनॅशनल या टूरच्या नावाने राज्यभरात काही एजंट अर्ध्या किमतीत म्हणजे, उमराहसाठी एक वर्ष आधी केवळ २८ हजार, २९ हजार व ३० हजारांपर्यंत बुकिंग करून त्यांना पंधरा दिवसांसाठी उमराहला पाठवले जात होते. तर हज यात्रेसाठी एक वर्ष आधी दीड लाख रुपये घेऊन बुकिंग करून त्यांना तीस दिवसांपासून हज यात्रेला पाठवले जात होते. यामुळे शेकडो नागरिकांनी हज यात्रेसाठी तर शेकडोंनी उमराह यात्रेसाठी तब्बल २०२१ पर्यंतची बुकिंग करत कोट्यवधी रुपये जमवून टूरचालक परदेशात पसार झाल्याची घटना घडली. 
फसवणुकीची सप्टेंबर महिन्यातील तक्रार. 


फसवणुकीच्या प्रकरणात वाढ 
जादा पैशांचे अामिष दाखवून विविध कंपन्यांनी हजाराे गुंतवणूकदारांची फसवणूक केली अाहे. शहरात मैत्रेय, फडणीस, केबीसी, पर्ल्स, ट्रू लाइफ, इमू, एचबीएन यांसारख्या अनेक कंपन्यांनी कराेडाे रुपयांची फसवणूक करून गाशा गुंडाळला अाहे. पाेलिस यंत्रणेकडून हाेणाऱ्या संथगतीच्या तपासामुळे व कायद्यातील पळवाटांमुळे त्यांच्यावर कठाेर कारवाई हाेत नसल्याने नेहमीच नवनवीन कंपन्या उदयास येत अाहे. 


शहराचे नाव होत आहे बदनाम 
गेल्या काही दिवसांपासून शहरात एकापाठोपाठ टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सकडून फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. यासंदर्भात आम्ही पोलिस आयुक्तांशी चर्चादेखील केली आहेत की, बोगस ट्रॅव्हल्सवर कारवाई करावी. अशा फसवणुकीमुळे शहराचा नाव खराब होत आहे. डॉक्टरांसह धार्मिकस्थळांच्या बुकिंगच्या प्रकरणात ग्राहकांनी ही सतर्क रहायला हवे होते. कोणत्या टुर्सची बुकिंग करतांना संबंधित ट्रॅव्हल्स असोसिएशनचा सदस्य आहे की नाही याची खात्री करावी मगच पैसे भरावे. - दत्ता भालेराव, अध्यक्ष,ट्रॅव्हल्स, एजंट असोसिएशन ऑफ नाशिक 


तीन वर्षांत फसवणुकीच्या घटनांत लक्षणीय वाढ 
२०१५ 

विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे १६२ गुन्हे दाखल झाले होते. त्यातील १२१ गुन्ह्याचा तपास करण्यात आला.  सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे २० प्रकरण दाखल असून यात शेकडो कोटींची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार करण्यात आलेली आहेत. 

२०१६ :

या गुन्ह्याचे प्रमाण १८२ वर पोहोचले. त्यातील १३५ गुन्ह्याची उकल करण्यात यंत्रणेला यश मिळाले. 

२०१७ :
फसवणुकीचे २४० गुन्हे दाखल त्यातील १७२ म्हणजे ७२% गुन्ह्याची उकल करण्यात आली. 

 

फसवणुकीचे नवे फंडे 
केबीसी,इमू,फडणवीस, मैत्रेय, मिरजकर सराफ यांसारख्या गुंतवणूक योजनांतून किमान हजार कोटींचा गुंतवणूकदारांना गंडा घालण्याचे प्रकार उघडकीस येऊनही त्याच प्रकारच्या धर्तीवर वेगवेगळ्या कंपन्या नाव बदलवून अल्पावधीतच दामदुपटीच्या योजना आणत आहेत. वेगवेगळे नावाने विविध कंपन्या चालू करून नागरिकांना अामिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याची तक्रारी आहेत. 


'आयटा' प्रमाणपत्र असलेल्या टुर्सचालकांकडेच करावी बुकिंग... 
हज व उमराहसंदर्भातील आता नव्याने २० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शहरातील अनेक टुर्सचालकांकडे 'आयटा'चा प्रमाणपत्र नाही. नागरिकांनी कोणत्याही टुर्सचालकांकडे बुकिंग करण्याआधी त्यांचा 'आयटा'चा प्रमाणपत्र बघूनच बुकिंग करावी. नागरिकांनी कोणत्याही बोगस टुर्सचालकांच्या किंवा विविध प्रकारच्या अामिष दाखवून बुकिंग करणाऱ्या भामट्यांच्या अामिषाला बळी पडू नये. अशाप्रकारे कोणीही पैसे घेत असेल किंवा फसवणूक करत असेल तर त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी. 

 

अशा योजनाही आहेत सुरू 
फसव्या, आकर्षक, जास्त व्याजदराच्या योजना, कमी कालावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या योजना, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकी, साखळी पद्धतीने रक्कम जमा करून लकी ड्रॉच्या योजना राबविणे, खासगी कंपन्या, संस्था यांच्यामार्फत चालविण्यात येणाऱ्या फसव्या पिग्मी योजना, फिक्स डिपॉझिट स्किम यासह फसव्या योजना जोरात सुरू अाहेत. सुनील नंदवाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा 

 

 

बातम्या आणखी आहेत...