आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अस्थी शोधून काढा अन् त्या विधिवत विसर्जित करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मध्य प्रदेशातून चोरीस गेलेल्या महात्मा गांधी यांच्या अस्थी तत्काळ शोधून काढा. त्या विधिवत विसर्जित करा, अशी संतप्त मागणी गांधीजींचे पणतू व प्रख्यात विचारवंत तुुषार गांधी यांनी शनिवारी केली. गांधीजींची यंदा शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी जयंती साजरी केली जात आहे. नेमके  २ ऑक्टोबर रोजीच रेवा शहरातील गांधी भवनातून अस्थी चोरीस गेल्या आहेत. चोरी होऊन तीन दिवस उलटून गेले तरीही मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार शांत आहे, असा आरोप तुषार गांधी यांनी केला. त्याचबरोबर साबरमती आश्रमातील ३६ एकर परिसराची जागा ताब्यात घेण्यासाठी गुजरात सरकारकडून नोटीस आली असून याविरोधात लढा उभारणार असल्याचे ते म्हणाले. 
 

एमजीएमध्ये  एका पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने तुषार गांधी औरंगाबादमध्ये आले होते. त्या वेळी  त्यांनी मध्य प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. चोरीच्या घटनेचे कुणालाही गांभीर्य नाही.गांधीजींच्या तसबिरीवर कधी गोळ्या मारल्या जातात, तर कधी त्यांच्या खुन्यांना देशभक्त ठरवले जाते.  लोकांच्या मनातील बापूंची प्रतिमा कायमची मिटवण्याचे हे कटकारस्थान आहे. आता अस्थिरक्षांची खिल्ली उडवली जात आहे. पुन्हा अशी विटंबना होऊ नये यासाठी अस्थिरक्षा ताब्यात घेऊन त्याचे सन्मानाने विसर्जन करावे, असे ते म्हणाले. 
 

अाफ्रिकेतून आले नातेवाइकांचे फोन : मला दक्षिण अाफ्रिकेतून नातेवाइकांचे फोन आले. देशभरात जिथे अस्थी आहेत त्या विसर्जित करा. एका मनुष्याला देव कशाला बनवता, असा सवाल त्यांनी केला. 
साबरमतीच्या ३६ एकरांचे होतेय अधिग्रहण : साबरमती आश्रमला १५ दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून नोटीस आली आहे. या परिसरातील गांधीवाद्यांचे निवासस्थान असलेली ३६ एकर जागा सोडण्याचे आदेश यात आहेत. तेथे जागतिक दर्जाचे स्मारक उभे राहील. वास्तविक अहमदाबादेतील ही जमीन म्हणजे सोन्यापेक्षाही मौल्यवान असून त्यासाठी ही धडपड सुरू आहे. याबाबत गांधीवादी संस्थाही गप्प आहेत असा आरोप त्यांनी केला. 
 

नव्या इंडियाने शोधला ‘नवा राष्ट्रपिता’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी  पंतप्रधान मोदींचा ‘फादर अॉफ द नेशन’ असा उल्लेख केला होता. याकडे तुषार गांधींचे लक्ष वेधले असता महात्मा गांधी हे ‘नवीन इंडियाचे फादर’ होऊ शकत नाहीत, अशा तिखट शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. इथे बापूंच्या स्वप्नाचा विचार केला जाणार नाही.  नव्या इंडियाला ‘नवा फादर’ लागणार आहे. त्यासाठीच हे नियोजन करण्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.
 

बातम्या आणखी आहेत...