आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विखेंविरुद्ध तगडा उमेदवार शोधणे, हेच काँग्रेससमाेरील मुख्य आव्हान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी (जि. नगर) : साईभक्तांचे श्रद्धास्थान शिर्डी क्षेत्रातील बदललेले राजकीय समीकरण काँग्रेससाठी चिंताजनक आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपचे 'कमळ' आपलेसे केल्यामुळे एक प्रकारे काँग्रेसचे 'हात' दुबळे झाले आहेत. सलग ५ वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेल्या विखेंच्या कुटुंबाचे सर्व क्षेत्रातील वर्चस्वामुळे भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे विखेंना शह देण्यासाठी काँग्रेसला तुल्यबळ उमेदवार शोधावा लागेल. यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांना आपल्या कुटुंबातील सदस्य रिंगणात उतरवावा लागण्याची शक्यताही वर्तवली जातेय. शिक्षण, सहकार व ग्रामविकासाचे माॅडेल अशी नवीन अाेळख असलेल्या शिर्डी मतदारसंघात शेती हा प्रमुख व्यवसाय. शिर्डीसह लाेणी, राहाता, काेल्हार, आश्वी या बाजारपेठांच्या या मतदारसंघावर गेल्या ४० वर्षांपेक्षा जास्त विखे कुटुंबाचे वर्चस्व आहे. ९५% स्थानिक स्वराज्य संस्थांवर विखेंचा वरचष्मा आहे. ते काेणत्याही पक्षात असले तरी कार्यकर्त्यांसाठी 'विखे' या नावाचा एकमेव पक्ष झाला आहे.

विखेंचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये केवळ तांत्रिकदृष्ट्या...
गेल्या काही वर्षांत अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विखेविराेधक नसल्याने त्यांचेच कार्यकर्ते एकमेकांच्या विराेधात निवडणूक लढवत आहेत. सध्या मतदारसंघातील काँग्रेसची ताकद केवळ तांत्रिकदृष्ट्या टिकून असल्याचे दिसते. मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. तसेच माळी व मुस्लिम समाजासह इतर समाजांचा समावेश आहे. त्यामुळे जातीय समीकरणांनुसार मराठा समाजाचा उमेदवाराला अधिक संधी दिसते.

तांबेंच्या उमेदवारीने लढत
विखे परिवाराप्रमाणेच परिसरातील अन्य मातब्बर कुटुंबे गेल्या काही वर्षांत राजकारणापासून दूर गेली आहेत. त्यामुळे विखेंना शह देण्याचे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांच्यापुढे आहे. थाेरात यांच्या कुटुंबातून काेणी पुढे आल्यास चुरस निर्माण हाेईल. सध्या विशिष्ट असे नाव निश्चित नसले तरी काँग्रेसकडून आमदार सुधीर तांबे अथवा सत्यजित तांबे, अरुण कडू यांच्या नावांची चर्चा आहे. युती न झाल्यास शिवसेनेकडून तालुकाप्रमुख कमलाकर काेते हे उमेदवार असू शकतात.
शिर्डी मतदारसंघात विखे कुटुंबाचे ४० वर्षांपेक्षा अधिक काळ वर्चस्व, ९५ % पेक्षा जास्त स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात
पक्ष बदलानंतरही साईबाबांचा आशीर्वाद राधाकृष्ण विखे यांच्या पाठीशी राहणार का? एवढीच चर्चा मतदारसंघात आहे.

जातीय समीकरण
एकूण मतदार 2.57 लाख
पुरुष मतदार 1.33 लाख
महिला मतदार 1.23 लाख
मराठा : 55%
माळी : 15%
मुस्लिम : 15%
इतर समाज : 15%

सरकारी धाेरणावर नाराजी
प्रवरा व गाेदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील बागायती मतदार- संघ अाेळखला जाताे. परंतु काही भागात पाणी पाेहोचू शकले नाही.
 


निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी शेतकरी आस लावून आहेत. कालव्यांची निर्मिती हाेऊन सिंचनासाठी उपयाेग व्हावा.
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव न मिळल्याने नाराजीचा सूर आहे. श्रमाचा याेग्य माेबदला मिळावा अशी रास्त अपेक्षा आहे.
साईबाबा समाधी शताब्दी विकास आराखडा ३२०० काेटी मंजूर हाेऊनही एकही काम झाले नाही.