आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्या प्रकरण : सुसाइड नोटमधील अक्षरांची शहानिशा होताच खासदार ओमराजेंविरुद्ध गुन्हा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - तालुक्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आर्थिक फसवणुकीमुळे शेतावर आलेली जप्तीची कारवाई व मानहानीमुळे १२ एप्रिल रोजी आत्महत्या केली होती.  या संपूर्ण प्रकरणाला ओमराजे निंबाळकरांसह तेरणा कारखान्याचे संचालक, जयलक्ष्मी शुगर्सचे संचालक व वसंतदादा बँकेचे संचालक जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीचा हस्ताक्षर तज्ञांचा सकारात्मक अहवाल प्राप्त होताच शिवसेनेचे  खा. ओमराजे निंबाळकर यांच्यासह वसंतदादा बँकेचे चेअमरन तथा भाजप नेते विजय दंडनाईक व वरील तीनही संस्थांच्या संचालकांविरुद्ध ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी १२ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी   लिहिलेल्या चिठ्ठीत ओमराजे निंबाळकर, तेरणा साखर कारखाना, वसंतदादा बँक व जयलक्ष्मी शुगर्सच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी संगनमताने आर्थिक फसवणूक केल्याने शेतजमिनीचा लिलाव निघाला आणि मोठी मानहानी झाल्याचे नमूद केले होते. तेव्हा पोलिसांनी ढवळे यांनी लिहिलेली चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञांकडे पडताळणीसाठी पाठवली होती. त्याचा सकारात्मक अहवाल प्राप्त होताच ढोकी ठाण्यातील सपोनि बी. जी. वेव्हळ यांनी सरकारी तक्रारदार हाेऊन फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत त्यांनी म्हटले की, आरोपी ओमप्रकाश राजेनिंबाळकर (खासदार), वसंतदादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक, आनंदीदेवी राजेनिंबाळकर (तेरणा कारखान्याचे तत्कालीन चेअरमन), रमाकांत टेकाळे (नायगाव), शाहुराजे धाबेकर (उस्मानाबाद), शेषेराव चालक (मंगरुळ) यांच्यासह तेरणाचे तत्कालीन सर्व संचालक, जयलक्ष्मी शुगर्सचे तत्कालीन सर्व संचालक व वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे तत्कालीन सर्व संचालक यांनी कटकारस्थान करून शेतकरी दिलीप ढवळेंच्या शेतावर कर्ज उचलून या कर्जाच्या परतफेडीची तेरणा साखर कारखान्याने हमी घेतली, परंतु कारखान्याने कर्जफेड न केल्याने वसंतदादा बँकेने ढवळे यांची जमीन लिलावात काढली.  दुसरीकडे ढवळे यांचे जयलक्ष्मी शुगर्सकडून ऊस वाहतुकीपोटी येणे असलेल्या बिलाची २ लाख ९३,५०० रुपयांची रक्कमही त्यांना दिली नाही. यातच थकीत कर्जापोटी बँकेने ढवळे यांच्या शेताचा लिलाव काढला. एकंदरीत ढवळे यांचा अन्यायाने विश्वासघात, बँकेकडून फसवणूक करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्यांनी गळफास घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वरील सर्वांविरोधात कलम ३०६,४०६,४०९,४२०, १२०(ब) व ३४ भादंविप्रमाणे ढोकी ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील करत आहेत.

काय आहे प्रकरण?
शेतकरी ढवळे हे ऊसतोड वाहतूक मुकादमही होते. तेरणा साखर कारखान्याने गाळप हंगामामध्ये ऊसतोड मुकादम व टोळ्यांना उचल देण्यासाठी ऊस वाहतूक मुकादमांच्या सातबाऱ्यावर वसंतदादा नागरी सहकारी बँक, उस्मानाबादकडून कर्ज घेऊन सदरील कर्जाची परतफेड कारखाना करेल, असे हमीपत्र व कारखान्याचे ठराव दिला होता. शेतकरी ढवळेंच्या सातबाऱ्यावर बोजा आला मात्र कर्जाची परतफेड झाली नाही. दुसरीकडे बँकेने ढवळेंसह अशा अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव काढला. या सर्व प्रकारामुळे अडचणीत आलेल्या ढवळे यांनी आर्थिक विवंचनेसह विश्वासघातामुळे झालेल्या मानसिक त्रासातून आत्महत्या करत याला वरील सर्व संचालक व पदाधिकारी जबाबदार असल्याची चिठ्ठी लिहिली होती. याप्रकरणी शिवसेनेसह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...