आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'फिर एक बार मोदी सरकार\'ची धुरा बुद्धिजीवींनी आपल्या खांद्यावर घ्यावी; शहांचे बुद्धिजीवींना आवाहन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- लोकसभेची आगामी निवडणूक ऐतिहासिक असून देशाला आर्थिक प्रगतीच्या दिशेने जायचे की घराणेशाही आणि भ्रष्टाचाराने बरबटलेल्या पक्षांच्या मागे जाऊन ७० वर्षांसारखी परिस्थिती ओढवून घ्यायची, असा सवाल करत येत्या निवडणुकीत बुद्धिजीवी वर्गाने केवळ आपले मतदान करून मौन बाळगू नये तर मोदी सरकारने केलेली कामगिरी इतरांना पटवून द्यावी आणि 'फिर एक बार मोदी सरकार' या भाजपच्या घोषणेचा भाग बनावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. 

 

लातूर येथे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेल्या अमित शाह यांनी रविवारी सायंकाळी दयानंद सभागृहात लातूरमधील उद्योग, व्यवसाय, कृषी, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रातील आघाडीच्या लोकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुनील गायकवाड यांची या वेळी उपस्थिती होती. 

भाजपचे पक्षाध्यक्ष म्हणून आपण आपली बाजू मांडताना त्रयस्थपणे मांडण्याचा प्रयत्न करू, असे सांगत अमित शाह यांनी आपला पक्ष त्रिसूत्री घेऊन निवडणुकीला सामोरे जात असल्याचे सांगितले. गरिबी निर्मूलन, देशाची सीमा सुरक्षा आणि जगात भारताचा वाढलेला सन्मान ही पाच वर्षांतील भाजप सरकारची प्रमुख कामगिरी आहे. अटलबिहारी वाजपेयींनी पंतप्रधानपद सोडले तेव्हा भारत आर्थिक क्षेत्रात जगात नवव्या स्थानावर होता. मधल्या दहा वर्षांत त्यात प्रगती झाली नव्हती. मागील पाच वर्षांत देशाने प्रगती साधत सध्या पाचवे स्थान बळकावले आहे. भारताने केलेल्या सर्वच क्षेत्रातील प्रगतीमुळे जगात भारताची पत आणि दरारा वाढल्याचे त्यांनी सांगितले. 

 

केवळ भाजपत लोकशाही 
देशात सुमारे १६२५ राजकीय पक्ष आहेत. त्यातील बहुतांश काँग्रेसच्याच पोटातून जन्माला आले आहेत. या सर्वांमध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे यातील प्रत्येक पक्ष हा कौटुंबिक वारसा सांगणारा आहे. केवळ भाजप आणि भाकप हे दोनच पक्ष घराणेशाहीपासून दूर आहेत. सोनिया गांधींनंतर काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे सगळ्या देशाला माहीत होते, माझ्यानंतर भाजपचा अध्यक्ष कोण हे मी सुद्धा सांगू शकत नाही. केवळ भाजपने अंतर्गत लोकशाही टिकवून ठेवली आहे, असे सांगत शाह यांनी भाजपचे वेगळेपण पटवून दिले.