आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील भारत पेट्रोलियमच्या प्रकल्पात स्फोट; ४३ जखमी, २ गंभीर; चेंबूर-सायन परिसर हादरला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- चेंबूर या पूर्व मुंबईतील उपनगरात असलेल्या भारत पेट्रोलियमच्या तेल शुद्धीकरण व वायू प्रकल्पात (बीपीसीएल) बुधवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. यात ४३ कामगार जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या स्फोटामुळे चेंबूर, सायन परिसर हादरला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला सायंकाळपर्यंत यश आले. प्लँटच्या हायड्रोक्रॅकर कॉम्प्रेसर शेडमध्ये आग लागून ती पसरली, असे भारत पेट्रोलियमच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. 


आग लागताच मोठे स्फोट झाल्याने ते भूकंपाचे धक्के असावेत म्हणून लोक घराबाहेर सैरावैरा पळाले. धूर व आगीच्या लोळांनी त्यात भर पडली. कंपनीच्या अग्निशमन दलाने तत्काळ आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर लगेच मुंबई अग्निशमन दलाच्या १५ गाड्याही घटनास्थळी आल्या. प्रकल्पात प्रचंड उष्णता असल्यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. परंतु, दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले. कंपनीत ७०० कामगार काम करतात. अग्निशमन दलाने कामगारांना बाहेर काढले. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील घरांच्या काचा तडकल्या आहेत. घरांना तडे गेले. आग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. 


प्रकल्प नेमका काय? 
भारत पेट्रोलियमचा हा तेलशुद्धीकरण प्रकल्प मुंबईत १९७५ पासून कार्यरत आहे. तेल आणि गॅस शुद्धीकरण करणाऱ्या या कंपनीची क्षमता वार्षिक १३ मेट्रिक दशलक्ष टन इतकी आहे. विशेष म्हणजे, डीडीसीएस, ओएचएसएएस, एनएबीएलसारख्या जगविख्यात प्रमाणक संस्थांकडून या प्रकल्पाला विविध सुरक्षेसंबंधीची प्रमाणपत्रे प्राप्त आहेत. असे असूनही प्रकल्पात अशी घटना घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 


फोन लागत नसल्याने पसरले चिंतेचे वातावरण 
आगीनंतर या परिसरातील लोकांचे मोबाइल फोन लागत नव्हते. कामगार प्रकल्पात अडकलेले असल्याने त्यांचे नातेवाईक चिंतेपोटी त्यांना फोन लावत होते. परंतु, फोनच लागत नसल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली. दरम्यान, या आगीच्या चौकशीची मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली आहे. या परिसरात निवासी वस्ती असून येथील कंपन्यांचे फायर आॅडिट करण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. 


दोन कामगारांची प्रकृती गंभीर, परिसर वाचला 
या घटनेत सुशील भाेसले व नानादीप वाळवे या कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकल्पाच्या बाजूला हिंदुस्थान पेट्रोलियम, टाटा, नाफ्ता व ऑइलच्या विशाल टाक्या आहेत. या परिसरात गव्हाणपाडा, विष्णुनगर, माहुल ही गावे असून येथून मोनोरेल व मुक्त मार्गही जातो. त्यामुळे आगीची बातमी कळताच या भागातील नागरिक व प्रशासन मोठ्या चिंतेत पडले होते. सुदैवाने आग वेळीच आटोक्यात आल्याने हा परिसर बचावला. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, कंपनी परिसरातील भीषण आगीचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...