आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सुरक्षेचे प्रात्यक्षिक दाखवताना आगीचा भडका; सिलिंडर बाहेर नेल्याने अनर्थ टळला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गरवारे स्टेडियमवरील कलाग्राममध्ये सुरू असलेल्या औद्योगिक अभियांत्रिकी प्रदर्शनात रविवारी गॅस सुरक्षा उत्पादनांचे प्रात्यक्षिक दाखवत असतानाच आगीचा भडका उडाला. विशेष म्हणजे संबंधित एजन्सीजचे कर्मचारी हातात लायटर घेऊन हे प्रात्यक्षिक दाखवत होते. सुदैवाने आग लागताच इतर स्टॉलधारक, प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या लोकांनी तत्काळ घरगुती वापराचे दोन सिलिंडर बाहेर काढून नेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. रविवारी दुपारी आगीची घटना घडल्याने आयोजकांनी खबरदारीचा उपाय म्हणून प्रदर्शनच गुंडाळले. रविवार असल्याने सायंकाळी प्रदर्शनाला गर्दी होण्याची शक्यता होती, परंतु प्रदर्शन बंद केल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. 

 

इंदूर येथील इन्फोलाइन आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे प्रदर्शन सामान्यांसाठी खुले होते. यात जवळपास ११० उद्योजकांनी सहभाग नोंदवला होता. 'कलाग्राम'वरील गरवारे मैदानाच्या संरक्षण भिंतीच्या बाजूने असलेल्या टी. एस. एजन्सीचा (डिस्ट्रिब्युटर ऑफ युनिव्हर्सल गॅस सेफ्टी डिव्हाइस) स्टॉल होता. यात कंपनीचे कर्मचारी गॅस सुरक्षा उत्पादनाचे प्रात्यक्षिक करून दाखवत होते. यादरम्यान अचानक आग लागली व पाहता पाहता स्टॉलला असलेला मंडप, टेबलवरील कापडाने पेट घेतला. क्षणार्धात स्टॉलच्या चारही बाजूंच्या मंडपाने पेट घेतला. स्टाॅल पाहायला आलेले नागरिक व इतर स्टॉलवरील कर्मचारी, कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जवळपासचे साहित्य हलवण्यास सुरुवात केली. 


काहींनी फायर एक्स्टिंग्विशरचा आगीवर मारा सुरू केेला. दहा मिनिटे स्थानिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग वाढू दिली नाही. तोपर्यंत अग्निशमन दलाचा बंब पोहोचला. मंडपाच्या वरच्या बाजूपर्यंत आग पोहोचलेली असताना अग्निशमन विभागाच्या इन्चार्ज एस. के. भगत, एस. ई. भोसले, अशोक वेलदोडे, अजिंक्य भगत यांच्या पथकाने तेथील आग आटोक्यात आणली आणि आग पसरणे थांबले. यात टी. एस. एजन्सीच्या जवळील रोटी मेकरच्या स्टॉलचेही नुकसान झाले. घटनेनंतर एमआयडीसी सिडको पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. 


भव्य मंडपात दोन घरगुती सिलिंडर, ना कोणी विरोध केला ना कोणी आक्षेप घेतला 
प्रदर्शनात होते ११० स्टॉल, आयोजकांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप 


प्रत्यक्षदर्शी : हातात लायटर होते 
प्रदर्शनात मंडप व इतर साहित्य लावण्याच्या व व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्टॉलवर आग संरक्षण उत्पादनाचे प्रात्यक्षिक सुरू होते. यासाठी त्यांनी दोन घरगुती सिलिंडर ठेवलेले होते. त्याच्या मदतीने ते आग लावून आगीवर नियंत्रण मिळवणे व त्यांच्या उत्पादनापासून कशी आग लागत नाही, हे सांगत होते. कर्मचाऱ्यांच्या हातात लायटरसुद्धा होते. आग लागलेली दिसताच प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या प्रदीप म्हस्के, डॉ. पवन जगदाळे व सतीश नागरे यांनी तेथील साहित्य बाहेर आणण्यास मदत केली. त्यानंतर इतर स्टाॅलवरील फायर एक्स्टिंग्विशर आणून मारा केला. परंतु बहुतांश एक्स्टिंग्विशर हे संपलेले होते. ते नावालाच ठेवले होते. 


स्टॉलधारकाचा पोबारा 
इतक्या मोठ्या प्रदर्शनात अशा प्रकारच्या आगीवर अवलंबून उत्पादनाच्या स्टॉलवर परवानगी देण्यावरून इतर सहभागी उद्योजकांनी आश्चर्य व्यक्त केले. रविवारी सुटी असल्याने चार वाजेनंतर पाहण्यासाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी अपेक्षित होती. परंतु आगीमुळे ऐनवेळेला प्रदर्शन गुंडाळावे लागले. यामुळे उद्योजकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. घटना घडल्यानंतर स्टॉलधारकाने पोबारा केला. तसेच आयाेजकांपैकी एकानेही भेट देऊन विचारपूस केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. 


बंब, पाण्याचे टँकर नव्हते 
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद मैदानावर फटाका मार्केटमध्ये आगीची मोठी घटना घडली. त्यातून कुठलाही धडा न घेता अद्यापही सार्वजनिक कार्यक्रमाला परवाना देताना आवश्यक अटींच्या पूर्ततेची पाहणी केली जात नाही. जवळपास ११० स्टॉल, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग व त्याच्या आकर्षणामुळे त्याला भेटी देणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक होती. हे मुद्दे लक्षात घेता येथे एक पाण्याचे टँकर, वाळू व अग्निशमन विभागाचा बंब असणे आवश्यक होते. प्रदर्शनामध्ये एकही बंब, पाण्याचे टँकर नव्हते. बहुतांश फायर एक्स्टिंग्विशरही संपलेले व अर्धे भरलेले होते, असे आग विझवण्यासाठी प्रयत्न केलेल्या सहभागींनी सांगितले. 
 

 

बातम्या आणखी आहेत...