आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
धुळे- शहरातील जमनालाल बजाज रोड परिसरात असलेल्या एका दुकानाला मध्यरात्री आग लागली. यात दोन घरे व दुकाने जळाली. २५ अग्निशमन बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. घटनेबद्दल शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली.
जमनालाल बजाज रोडला लागून व शहर पोलिस चौकीपासून जवळच सुयोग मशनरी स्टोअर्स हे दुकान आहे. मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या दुकानाच्या गोडाऊनमधून धुराचे लोट निघत असल्याचे शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. यानंतर आकाश अग्रवाल नामक नागरिकाने याबाबत सुयाेग मशनरीचे मालक बालमुकुंद गौड यांना कळवले. तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलालाही कळवण्यात आले. तोपर्यंत धुरासोबत आगीचे लाेळही निघत हाेते. यानंतर शेजारील विजय सायकल मार्ट व इतर दुकानांनाही आग लागली. अग्निशमन दलाचे चार बंब पहिल्याच फेरीत आले. तर दुकान मालक बालमुकुंद व त्यांचे भाऊ सुनील गौड हे घटनास्थळी पोहाेचले. तोपर्यंत पोलिस, अग्निशमन दलाचे अधिकारी व स्थानिक नागरिक आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करीत होते. सतत पाण्याचा मारा केल्याने काही वेळाने आग आटोक्यात आली; परंतु यानंतर पुन्हा भडका होऊन आग पसरली. आगी रौद्ररूप घेत असल्याचे पाहून पुन्हा अग्निशमक दलाचे बंब बोलविण्यात आले. सूर्याेदय होऊनही आग घुमसत होती. तर पाण्याचा मारा व आगीत लाकडी साहित्य जळाल्यामुळे जुन्या घरांचीही पडझड झाली. नऊ वाजेपर्यत याठिकाणी पाण्याचा मारा केला जात होता. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविता आले.यानंतर दुकानमालक बालमुंकूद गौड यांनी दुकानात जावून पाहणी केल्यावर आतील साहित्य भस्मसात झाल्याचे आढळून आले. या घटनेत त्यांचे चार लाखांचे नुकसान झाले आहे. तर घटनेप्रकरणी बालमुंकूद गौड यांनी दिलेल्या माहितीवरुन धुळे शहर पोलिस ठाण्यात अग्नी उपद्रवची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कडाक्याच्या थंडीतही जपला शेजारधर्म
दुकान मालक गौड व अग्निशमन बंब यांना कळवण्यापर्यंत स्थानिक नागरिक थांबले नाहीत. तर पोलिस व अग्निशामक यंत्रणेला आग आटोक्यात आणण्यास मदत केली. त्यासाठी घरातील नळ सुरू करून आगीवर पाणी मारले जात होते. अग्निशामक बंबातील पाण्याच्या प्रवाहापुढे घरगुती नळाच्या पाण्याचा प्रयत्न छोटा होता. मात्र शेजाऱ्यांची दाखवलेला शेजारधर्मामुळे सकाळी दिवस उजाडल्यानंतरही आपल्या छतावरून आगीवर पाणी सोडले जात होते.
फटाक्याने आग लागल्याचा संशय
आग कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. तर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे; परंतु मध्यरात्री बारा वाजता थर्टी फर्स्टचा आनंद साजरा करताना रॉकेट अथवा उंचावरून फटाका गोडाऊन जवळ येऊन पडला असावा. या ठिकाणी असलेल्या प्लास्टिकच्या साहित्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जातो आहे.
५० फुटांचे दुकान...
आगीत भस्मसात झालेले सुयोग मशनरी हे दुकान सुमारे ५० फुटांचे आहे. या ठिकाणी विक्रीसाठी असणारे साहित्य व इतर वस्तू ठेवल्या होत्या. तर दुकानाच्या मागील भागात गोडाऊन होते. आगीत दुकानासह गोडाऊनमधील साहित्यही खाक झाले. त्यात पीव्हीसी पाइप, ठिबक सिंचनाचे साहित्य, पीव्हीसी फिटिंगचे साहित्य, पाण्याच्या टाक्या, सागाचे रॅक, फ्रिजचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.