आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : राजधानीत अनाज मंडी भागात एका चार मजली इमारतीतील अवैध फॅक्टरीला रविवारी पहाटे आग लागली. आगीचे लोळ आणि प्लास्टिकच्या विषारी वायूमुळे ४३ जणांचा मृत्यू झाला. बहुतांश मृत्यू गुदमरून झाले आहेत. पोलिसांनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली.
बहुतांश मृत कामगार बिहारचे आहेत. आग लागली तेव्हा ते गाढ झोपेत होते. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे. ६२ लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दिल्ली सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येकी २ लाख, भाजपने प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. बिहार सरकारने १ लाखाची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, फॅक्टरीचा मालक रेहान व पार्टनर फुरकान यांना पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले. दिल्लीत १३ जून १९९७ रोजी उपहार सिनेमागृहात भीषण आग लागून ५९ लोकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची जबाबदारी ना केजरीवाल सरकार घेत आहे, ना भाजपशासित महापालिका; ही फॅक्टरी विनापरवाना चालत होती, एकेका खोलीत २५-३० मजूर होते.
मृत्यूपूर्वी तो शेवटचा कॉल... मुशर्रफने मित्राला सांगितले, मी तर जातोय... मला श्वासही घेता येत नाही.. कुटुंबाची काळजी घ्या...
या आगीत मुशर्रफ नावाचा मनुष्य अडकून पडला होता. आग आणि धूर यामुळे त्याला श्वासही घेता येत नव्हता. अशा अवस्थेत त्याने पहाटे ५ वाजता आपला मित्र मोनू यास फोन लावला. तो मित्राला म्हणाला,
मुशर्रफ : हॅलो मोनू, भय्या, मी आज मरतोय. आग लागली आहे. करोलबागला ये. वेळ खूप कमी आहे आणि बाहेर पडण्याचा मार्ग नाही. भय्या, मी संपलोय... कुटुंबाची काळजी घे. आता श्वासही घेता येत नाही.'
मोनू : आग कशी लागली?'
मुशर्रफ : काही कळत नाही. अनेक जण विव्हळत पडलेत.'
मोनू : फायर ब्रिगेडला फोन कर.'
मुशर्रफ : आता काहीच होऊ शकत नाही. माझ्या घराची काळजी घे. कुणाला एकदम हे सांगू नकोस. अगोदर मोठ्या माणसांना सांग (अल्लाह म्हणून कण्हत...) तुझ्याशिवाय माझा कुणावरच विश्वास नाही. माझ्या कुटुंबीयांना आणायला जा.'
सलाम : फायरमन राजेशने वाचवले ११ जणांचे प्राण
३० बंब घटनास्थळी होते. अरुंद गल्ल्या. १५० कर्मचारीही होते. यात फायरमन राजेश शुक्ला जळत्या इमारतीत सर्वात अगोदर घुसले. जिवाची पर्वा न करता शुक्लाने ११ जणांना वाचवले. दुखापत झाली होती तरी ते डगमगले नाहीत.
सावध व्हा... अजूनही येथे अनेक अवैध कारखाने
अनाज मंडी भागात ही एकच अवैध फॅक्टरी नव्हती. असे अनेक कारखाने येथे आहेत. हजारो मजूर येथे दिवस-रात्र राबतात. त्यांना ५ हजारांहून अधिक मासिक प्राप्ती नाही. नाइलाजाने २०-२५ मजूर एकाच खोलीत राहतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.