प्रतिनिधी
Mar 07,2019 12:27:00 PM ISTऔरंगाबाद - मोतीकारंजा भागातील एका कुलरच्या दुकानाला बुधवारी सकाळी आग लागून २०० कुलर्स जळून खाक झाले. कुलरला लावलेले गवताचे काड (वुडवूल) पेटल्याने आगीने क्षणार्धात संपूर्ण दुकानाला वेढा घातला. या घटनेत सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा दावा दुकान मालकाने केला आहे.
सय्यद अब्बास सय्यद रहीम यांच्या मालकीचे रॉयल डेझर्ट कुलर नावाने अभिनय टॉकीज रोडवर कुलरचे दुकान आहे. उन्हाळा सुरू झाल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावर कुलर्स खरेदी करून ठेवले होते. बुधवारी अब्बास हे आपला मुलगा सय्यद शाहबाज व फिटर इद्रिससोबत दुकानात होते. शाहबाज व इद्रिस कुलर्स फिटिंगचे काम करत होते. ११.५५ वाजता भिंतीवरील विद्युत मीटरमधून अचानक कुलरच्या गवतावर ठिणगी पडली. कुलरवरील गवत पूर्णपणे वाळलेले असल्याने क्षणार्धात आग वाढली आणि शेजारी असलेल्या कुलर्सलाही लागली. एका रांगेत कुलर्स ठेवलेले असल्याने २०० कुलर्स जळून खाक झाले. रॉयल डेझर्ट दुकानाच्या बाजूलाच मोहंमद जहीर यांचेही दुकान होते. जहीर यांच्या दुकानासमोर ठेवलेले ४२ कुलर्स देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाचे प्रमुख विजय राठोड यांच्यासह रमेश सोनवणे, श्रीकृष्ण होळंबे, सुभाष घरत, आकाश नेहरकर, बमणे, मोबीन, आबासाहेब गायकवाड, मोहन मुंगसे, ज्ञानेश्वर साळुंके, अब्दुल हमीद आदींनी आग विझविली.
वाहतूक खोळंबली : आग विझविण्यासाठी दाखल झालेले अग्निशमन विभागाचे बंब रस्त्यावरच उभे होते. तसेच मदतीसाठी जमलेल्या तरुणांची संख्याही अधिक होती. अशा वेळी या मार्गावरील वाहतूक बंद करायला पाहिजे होती. मात्र, जवळ पोलिस उभे असूनही त्यांनी आग विझेपर्यंत रस्त्यावरील वाहतूक बंद न केल्याने या भागात बराचवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
अब्बास यांना रडू कोसळले : आग विझविणे सुरूच असताना दुकानमालक सय्यद अब्बास यांना रडू कोसळले. उन्हाळा सुरू होतोय म्हणून पूर्ण सीझनभर पुरेल, एवढा माल भरून ठेवला होता. आगीमुळे काहीच शिल्लक राहिले नाही, असे म्हणत अब्बास यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. शेजारील व्यापाऱ्यांनी अब्बास यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.