आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरती आटोपून कर्मचारी चहासाठी जाताच आनंद इंडस्ट्रीजमध्ये अग्निकांड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिडको एमआयडीसीत गरवारे कंपनीच्या मागे असलेल्या वीस वर्षे जुन्या आनंद कूलर इंडस्ट्रीजला शुक्रवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आग लागली. दोन तास चाललेल्या अग्नितांडवात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. शुक्रवारी काम बंद असल्याने कंपनीत सर्व कर्मचारी उपस्थित नव्हते. घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. कंपनीतील कर्मचारी व शेजारील कंपनीतील कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आतील रसायनाच्या कॅन वेळीच बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. विशेष म्हणजे कंपनीतील कर्मचारी रसायनाच्या कॅन बाहेर काढण्यासाठी मदतीचा धावा करत असताना घटनास्थळी हजर तरुण आणि अन्य नागरिक सेल्फी काढण्यात आणि मोबाइलवर व्हिडिओ शूटिंग करण्यातच मग्न होते. 


कुंदन रेड्डी यांच्या या कूलर कंपनीत छोट्या आकारच्या कूलरपासून सर्वात मोठ्या आकाराच्या कूलरची निर्मिती केली जाते. शुक्रवारी वीजपुरवठा बंदचा दिवस असल्याने एमआयडीसीतील बहुतांश कंपन्या बंद असतात. शुक्रवारी अकाउंटंट व काही कर्मचारी सकाळी कंपनीत गेले होते. गणपतीची आरती झाल्यानंतर कर्मचारी दुपारी साडेअकराच्या सुमारास कंपनीसमोरील टपरीवर चहा पिण्यासाठी गेले. तेव्हा त्यांना कंपनीच्या मुख्य भागाने पेट घेऊन धुराचे मोठे लोट निघताना दिसले. त्यांनी तत्काळ रेड्डी व इतरांना ही बाब कळवली. मसिआ संघटनेचे पदाधिकारी भगवान राऊत यांनी गरवारे कंपनीच्या अनिल भालेराव यांना माहिती दिल्यानंतर ही कंपनी गरवारेसमोरच असल्यामुळे या कंपनीचे अग्निशमन बंब लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली.

 

काही वेळातच मनपाचे तीन व शेंद्रा एमआयडीसीचा एक असे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय आठ पाण्याचे टँकर मागवण्यात आले होते. अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी आर. के. सुरे, डी. डी. साळुंके, अब्दुल अजीज, संजीव कुलकर्णी, व्ही. बी. कदम यांच्यासह एकूण ४० कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन तास परिश्रम करून आगीवर नियंत्रण मिळवले. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक उपनिरीक्षक एस. बी. केदारे, विक्रम वाघ यांच्यासह इतर कर्मचारीही घटनास्थळी आले. आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे, डायरीबाहेर काढण्यासाठी कर्मचारी, रेड्डीच्या मित्रांनी कंपनीत धाव घेतली होती. 


नव्यानेच केली होती साहित्य खरेदी
नुकताच उन्हाळा संपल्याने ऑर्डर कमी असल्या तरी जानेवारीपासून कूलरची मागणी सुरू होते. त्यासाठी ऑक्टोबरपासून निर्मिती पुन्हा सुरू करण्यात येते. त्यासाठी नुकतेच मोठ्या प्रमाणावर साहित्य काही दिवसांपूर्वीच खरेदी केले होते, असे रेड्डी यांनी सांगितले. 


रेझिन बाहेर काढले अन‌् मोठा अनर्थ टळला 
कूलरच्या बाहेरील बॉडीच्या कोटिंगसाठी वापरले जाणाऱ्या रेझिन केमिकलच्या १०० पेक्षा अधिक कॅनचा कंपनीत साठा होता. याशिवाय अनसॅच्युरेटेड पॉलिस्टर केमिकल, फायबर ग्लास मटेरियलसह मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कूलरचे तयार केलेले जुने-नवे भाग आदी होते. आग लागल्यानंतर कर्मचाऱ्यांसह जवळ असलेल्या लघु उद्योगचालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवून आतील रसायनाच्या कॅन बाहेर काढण्यासाठी सुरुवात केली. आग वाढण्याच्या आतच सर्व कॅन बाहेर काढल्या. त्यानंतर कंपाउंडमधील कॅन बाहेर काढल्या. उर्वरित सर्व साहित्य, सीलिंग, कागदपत्रे, रजिस्टर जळून खाक झाले. 


बघ्यांच्या गर्दीचा अग्निशमन दलाला ताप 
कंपनीतून निघणारे धुराचे लोट संपूर्ण शहरातून दिसत होते. कंपनीतील कॅन बाहेर काढण्यासाठी कर्मचारी, मालक कसरत करत होते. कंपनीजवळच दोन महाविद्यालये आहेत. आग लागल्याचे कळताच अनेक तरुण, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी गर्दी केली. अग्निशमन विभाग, टँकरचालकाला पाइप नेण्यास, आत जाण्यात गर्दीमुळे अडचण निर्माण झाली. परंतु तरीही अनेक जण मोबाइलवर सेल्फी काढण्यात, व्हिडिओ शूट करण्यात गुंग होते. या प्रकारामुळे रेड्डी यांच्या कुटुंबीयांचा संताप अनावर झाला होता. पोलिसांनी तत्काळ सर्वांना पांगवले. 


कारणांची चर्चा : शॉर्टसर्किट की अजून काही? 
भारनियमनामुळे एमआयडीसीतील कंपन्या शुक्रवारी बंद असतात. त्यामुळे कर्मचारीही कंपनीत नसतात. काही कर्मचाऱ्यांच्या मते, कंपनीत बसवलेल्या गणपतीची सकाळी आरती झाल्यावर ते थोडे काम करून बाहेर टपरीवर बसले होते. यादरम्यान अचानक काही वेळ वीजपुरवठा सुरू झाला होता. काहींच्या मते वीजपुरवठा बंदच होता. त्यामुळे शॉर्टसर्किटने आग लागली की अजून कशामुळे? याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते.

बातम्या आणखी आहेत...