'त्र्यंबक रबर'च्या कामगार / 'त्र्यंबक रबर'च्या कामगार वसाहतीत आग, ४ खोल्यांत सिलिंडरचे स्फोट; ८ खोल्या भस्मसात, तासभर धगधगत होती आग

प्रतिनिधी

Feb 01,2019 10:51:00 AM IST


सिन्नर : मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील त्र्यंबक रबर कारखान्यात परप्रांतीय कामगारांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये इलेक्ट्रिक शॉटसर्किट होऊन लागलेल्या आगीमुळे चार घरगुती सिलिंडरचा स्फोट झाला. त्यात एका रांगेतील कामगारांच्या आठ खोल्या बेचिराख झाल्या. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तथापि, आठही खोल्यांतील संसाराेपयाेगी साहित्याची राखरांगोळी झाली.

एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
कामगारांसाठी असलेल्या निवासी खोल्यांमधील एका खोलीत शॉर्टसर्किट होऊन गुरुवारी संध्याकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास आग लागली. त्यातच त्या खोलीतील गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने त्याचा स्फोट झाला. त्यात आगीचा भडका उडाल्याने एकामागोमाग एक शेजारील खोल्यांतील आणखी तीन सिलिंडरचे स्फोट झाले. त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी जीव वाचवत सुरक्षितस्थळी धाव घेतली. आगीची माहिती सिन्नर नगरपालिका आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राला दिल्यानंतर दोन्हीही बंबांसह अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बंबांच्या सहाय्याने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. वेळेत आग नियंत्रणात आल्याने अनर्थ टळला. अन्यथा आग कंपनीपर्यंत पोहचली असती तर मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली असती.


आग आटोक्यात आणण्यासाठी एम.आय.डी.सी. अग्निशमन केंद्राचे सहायक अधिकारी पी. के. चौधरी, एन. ए. जाधव, एच. एस. कराड, पी. के. मलगंडे, एन. टी. पादिर, सिन्नर नगरपालिका अग्निशमन केंद्राचे लाला वाल्मीकी, नारायण मुंडे, जयेश बोरसे, हरिष पाटील आदींनी परिश्रम घेतले. घटनास्थळी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याचे निरीक्षक साहेबराव पाटील, उपनिरीक्षक लावणे, सहायक उपनिरीक्षक एल. पी. कडभाने, सुशील साळवे, एस. डी. जाधव, धुमाळ आदींसह कर्मचारी थांबून होते. त्यांनी रहिवाशांना सुरक्षितस्थळी नेले.

X
COMMENT