मध्यरात्री फटाके उडवले; / मध्यरात्री फटाके उडवले; पहिला गुन्हा मुंबईत दाखल: सुप्रीम कोर्टाच्या अादेशाचे दाेघांकडून उल्लंघन

​विशेष प्रतिनिधी

Nov 08,2018 10:43:00 AM IST

मुंबई - पर्यावरण रक्षणासाठी फक्त रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्याचे निर्बंध सर्वाेच्च न्यायालयाने घालून दिले अाहेत. मात्र या अादेशाचे सर्रास उल्लंघन करुन फटाके उडवल्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील पीपीएल कॉलनीत कानठळ्या बसतील अशा आवाजाचे फटाके फोडल्याबद्दल दोन अज्ञात व्यक्तींविराेधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्रनगर येथील रस्त्यावर दोन अनोळखी व्यक्ती सुतळी बॉम्ब फोडत असल्याचा कॉल परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात केला. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांचे रात्र गस्तीचे पथक संबंधित ठिकाणी पोहोचले असता फटाके फोडणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी पलायन केले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने पाेलिस ठाण्यात दिलेल्या लेखी फिर्यादीवरुन दाेन अज्ञात व्यक्तींविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला.

भादंविच्या कलम १८८ नुसार ५ महिन्यांपर्यंत शिक्षा शक्य
भादंविच्या कलम १८८ नुसार लोकसेवकाद्वारे कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन आणि कलम ३४ नुसार गुन्हेगारी हेतूने प्रेरित होऊन एकापेक्षा अधिक व्यक्तींनी केलेली कृती या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी कलम १८८ मध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास किमान एक महिना ते पाच महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा दोनशे रुपये दंडाची तरतूद आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अाराेपीला अाेळखत नाहीत. त्यांनी आरोपींबाबतची जुजबी माहिती दिली असून त्याआधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपी सापडताच त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
यापूर्वी दिल्ली,

अहमदाबादेतही गुन्हा : शेजाऱ्याच्या घरापुढे जास्त प्रदूषण करणारे फटाके फोडल्याच्या आराेपावरून दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला हाेता. दिल्लीत फक्त ग्रीन फटाके फाेडण्यास परवानगी अाहे, मात्र ही व्यक्ती जास्त प्रदूषण करणारे फटाके फाेडत असल्याचा अाराेप अाहे. तसेच अहमदाबादेतही वेळेचे निर्बंध झुगारून फटाके उडवणाऱ्या दाेन व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले अाहेत.

X
COMMENT