आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारी देशांतील लाेकांना नागरिकत्व देण्यावरून त्रिपुरामध्ये गोळीबार; विधेयकाला तृणमूल काँग्रेस, शिवसेेनेनेही विरोध दर्शवला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक-२०१६ मंगळवारी पारित झाले. विधेयकात पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानच्या हिंदू, जैन, ख्रिश्चन,शीख, बौद्ध व पारशी लोकांना भारताचे नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. भारतात किमान सहा वर्षे राहण्याची त्यासाठी अट आहे. पूर्वी ही मर्यादा १२ वर्षे होती. नागरिकत्त्वासाठी कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्द्यावर निवेदन केले. हे विधेयक राज्यघटनेच्या विरोधात नाही. उलट आपल्या तीन शेजारी देशांतील अल्पसंख्यांकांना सुरक्षा प्रदान करणारे हे विधेयक आहे. त्यामुळे आसाममध्ये एनआरसीचा प्रभाव राहणार नाही. हे विधेयक केवळ आसामसाठी नाही. राजस्थान, पंजाब व दिल्ली सारख्या प्रदेशांत राहणाऱ्या स्थलांतरितांचा यात समावेश होतो, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस व तृणमूल काँग्रेसने विधेयकाला विरोध करत सभात्याग केला. माकप, सपा, आसाम गण परिषद व शिवसेनेने देखील त्यास विरोध केला. विधेयकाच्या विरोधात ईशान्येकडील राज्यांत प्रचंड निदर्शने करण्यात आली. त्रिपुरात पाच जण जखमी झाले. 

 

मुखवटा लावून निदर्शने 
संसदेच्या बाहेर तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी विधेयकाला विरोध केला. हे खासदार काळे कपडे परिधान करून आंदोलनात सहभागी झाले हाेते. एका खासदाराने नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घातला होता. त्याच्या हातात छडी होती. तो इतर सदस्यांना मारत असल्याचा अभिनय करत होता.

 

विरोधाचे कारण : धर्माचा आधार 
एआयएमआयएमच्या म्हणण्यानुसार नागरिकत्व दुरुस्तीसाठी धार्मिक आेळख हाच आधार मानला गेला आहे. ही गोष्ट संविधानाच्या मूळ भावनेच्या विरोधात आहे. बांगलादेशी हिंदूंना नागरिकत्व मिळवण्यासाठी आसाममध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. परंतु त्यामुळे आसाममधील मूळ निवासींचे संकट वाढले, असे एजीपीने म्हटले. या विधेयकामुळे एनआरसीच्या कामात अडथळा येणार आहे. 

 

निदर्शकांनी आसाम, अरुणाचल, नागालँड, मिझोराममध्ये महामार्ग ठप्प केला 
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक-२०१६ च्या विरोधात आसाममध्ये ११ तासांचा बंद होता. निदर्शकांनी राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. वाहनांची ताेडफोड करण्यात आली. गुवाहाटी व डिब्रूगडमध्ये रेल्वे रोखण्यात आली. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या घराला घेरण्यात आले. निदर्शक व पोलिसांत धुमश्चक्री झाली. ऑल आसाम स्टुडंट्स युनियनचा कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलाने निदर्शकांवर लाठीमार केला. संघटनेने बंदचे आवाहन केले होते. एजीपी, काँग्रेस, एआययूडीएफ व केएमएसएसने आंदोलनाचे समर्थन केले. एजीपीने सोमवारी भाजपच्या नेतृत्वाखाली सरकारचा पाठिंबाही काढला होता. त्रिपुराच्या खुमुलंगमध्ये पोलिसांसोबत झालेल्या धुमश्चक्रीत पाच निदर्शक जखमी झाले. दोन जणांना गोळी लागली. जखमींमध्ये विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांचा समावेश आहे. मिझोराम, अरुणाचल, नागालँडमध्ये निदर्शकांनी निर्णयाच्या विरोधात राष्ट्रीय महामार्ग ठप्प होता. संघटनेचे अध्यक्ष दीपांकर नाथ म्हणाले, आम्हालाे १०० संघटनांचा पाठिंबा आहे. 

बातम्या आणखी आहेत...