आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Firing On Farmer Corporator Of Jalgaon Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संताेष पाटील यांच्यावरील गाेळीबार प्रकरण: मारेकरी मला ओळखतच नाहीत; दुसऱ्याने इशाऱ्याने दिली ओळख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गोळीबार करणारे तरुण मला ओळखत नव्हते. घटनेच्या काही मिनिटे आधीच ईश्वर तायडे नावाच्या तरुणाने हाताने इशारा करून माझी ओळख करून दिली. त्यानंतर आर्यन पार्क परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने माझ्यावर गोळी झाडली. म्हणजेच माझ्याशी जुने वाद असून त्या रागात गोळीबार केल्याचे पिंजारी या तरुणाने पोलिसांना दिलेले उत्तर खोटे आहे. हटकर गटाने बनावट स्टोरी करून पिंजारी नावाच्या मारेकऱ्याला पोलिसांसमोर शरण येण्यास सांगितले आहे, असा आरोप जखमी संतोष पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक तथा सध्याचे भाजप नगरसेविकेचे पती संतोष मोतीराम पाटील यांच्यावर ३१ डिसेंबर रोजी सकाळी गोळीबार करण्यात आला. २ अनोळखींसह बुधा दला हटकर, कैलास बुधा हटकर, आनंदा बुधा हटकर, लखन नारायण हटकर, राहुल सुरेश हटकर, ईश्वर तायडे या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. घटनेच्या दिवशी रात्री ९ वाजता अरबाज दाऊद पिंजारी हा पोलिसांना शरण आला. संतोष पाटील यांच्याशी जुने वाद असल्याने जिगर उर्फ भूषण रमेश बोंडारेच्या मदतीने त्यांच्यावर गोळी झाडली असे अरबाज याने पोलिसांना सांगितले आहे; परंतु अरबाज व जिगर यांना आपण ओळखत नाही. हटकर गटाने या दोघांना सुपारी देऊन माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पिंजारी हा ११ तासांनी पाेलिसांना शरण आला. तो हटकर गटाच्या संपर्कात होता, असा आरोप पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 

 

अरबाजला कोठडी :

सोमवारी रात्री ९ वाजेपासून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अरबाज याला मंगळवारी अटक केली. त्याला बुधवारी उपअधीक्षक डॉ.निलाभ राेहन, निरीक्षक दिलीप भागवत यांनी न्यायाधीश डी.बी. साठे यांच्या न्यायालयात हजर केले. अरबाजकडून माहिती घेऊन दुसरा संशयित जिगर यास अटक करायची आहे. अरबाज व जिगर सह हटकर गटातील ६ संशयितांनी गुन्ह्याचा कट कुठे रचला? याची माहिती घेऊन पुरावे गोळा करायचे आहेत. गोळीबार कुणी केला, त्याची माहिती घेऊन जिगरचा शोध घेणे. पिस्तूल कोठून आणले? दुचाकी कुणाची? याबाबत माहिती घ्यायची आहे. अरबाजच्या साह्याने जिगर तसेच हटकर गटातील सहा संशयितांचा शोध घेण्यासाठी अरबाजच्या ७ दिवसांच्या कोठडीची पोलिसांनी मागणी केली. युक्तिवादाअंती न्यायालयाने ७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

 

संशयित जिगरला केली अटक 
एलसीने संशयित जिगरला नाशिक येथून ताब्यात घेऊन जळगावात आणले. पाेलिस अधिक्षकांनी चाैकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

 

हल्लेखाेरांना अटक करा, अन्यथा बेमुदत उपोषण 
माझ्यावर गोळीबार करणारे तरुण चोऱ्या-चपाट्या करणारे आहेत. त्यांचे माझ्याशी किंवा माझे त्यांच्याशी काहीएक वैर नाही. हटकर गटाने त्यांना सुपारी देऊन माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाेलिसांनी हटकर गटातील सदस्यांना लवकर अटक करावी अन्यथा कुटुंबासह बेमुदत उपोषणास बसेल, अशी माहिती पाटील यांनी दिली.