आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात आधी अपशब्द, नंतर आशिष शेलारांनी मागितली माफी

एका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • असे होते वक्तव्य : ‘कायदा लागू न करण्यास राज्य तुझ्या बापाचे आहे काय?’
  • आशिष शेलार यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांची निदर्शने
  • आमची खोपडी सरकली तर शेलारला मुंबईत येऊन ठोकू : चंद्रकांत खैरे

मुंबई - रविवारी नालासोपारा येथील एका कार्यक्रमात बोलताना, हा कायदा केंद्राचा आहे, कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही म्हणता, म्हणजे हे राज्य काय तुझ्या बापाचे आहे काय? अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांनी केली. त्यानंतर चहुबाजूने त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाल्यानंतर आशिष शेलार यांनी, कोणाचाही एकेरी उल्लेख केला नाही, मुख्यमंत्र्यांचा तर मुळीच नाही असे सांगत भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो असे म्हणत माफी मागितली. आशिष शेलार यांच्या वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या पुतळ्याची विटंबना करून त्यांचा निषेधही केला.आशिष शेलार यांच्या या वक्तव्यावर टीका करताना जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी,  भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणले तर मुंबईत फिरणे अशक्य होईल, असा थेट इशारा भाजपला दिला. ते पुढे म्हणाले, भाजपने इतके घसरण्याची गरज नाही. मला वाटतो त्यांना आशा होती, ती पूर्ण झाली नाही. कुणीही काहीही बोलत आहे.  म्हणूनच भाजप चिडली आहे आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेली. मात्र, इतकी पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली यावर भाजपने आत्मचिंतन करावे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. 

शिवसैनिकांची मुंबईत निदर्शने:


आशिष शेलार यांच्या वक्तव्यावर चिडलेल्या शिवसैनिकांनी वांद्रे येथे आशिष शेलार यांच्या मतदारसंघात निदर्शने केली. यावेळी आशिष शेलार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बांगड्या भरून शाई फासली. तसेच काही शिवसैनिकांनी चपलांनीही पुतळ्याला मारहाण केली. या प्रकरणांमुळे आता शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर आशिष शेलार यांनी माफी मागत, मी कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक व एकेरी उल्लेख केलेला नाही, मुख्यमंत्र्यांचा तर नाहीच नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे. आम्ही त्यावर ठाम आहोत. तसेच त्या सवालातील भाषेमुळे कुणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो असे म्हटले.  हा वाद काही दिवसांत आणखी पेटण्याची शक्यता असल्याचे सध्या तरी दिसत आहे.हे मराठी मनाचे राज्य : आव्हाड
 
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, आशिष शेलार जे बोलले ते मला खूप आवडले. मी त्यांना आजच सांगतो की होय हे उद्धव ठाकरेंच्या बापाचेच राज्य आहे. हे जितेंद्र आव्हाडच्या बापाचेच राज्य आहे. काळ्या मातीला सह्याद्रीच्या पर्वताला मानणारे आम्ही काळ्या मातील आई मानतो आणि मराठी माणसाला आमचा बाप मानतो. हे मराठी मनाचे राज्य आहे, असे देशभरात-जगभरात सांगणाऱ्यांची आम्ही औलाद आहोत. आम्ही आमचा बाप गुजरातमध्ये शोधायला जात नाही अशी टीकाही त्यांनी आशिष शेलार यांच्यावर केली.
 

आमची खोपडी सरकली तर शेलारला मुंबईत येऊन ठोकू : चंद्रकांत खैरे

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आहोत, तेव्हा पक्षप्रमुख उद्धव, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना भाजपच्या नेत्यांनी भान ठेवावे. शिवसैनिकांची खोपडी सरकली तर आशिष शेलार यांना मुंबईत येऊन ठोकून काढू, असा इशारा शिवसेना नेते व चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद येथे दिला. अॅड. आशिष शेलार यांनी नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...