आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या कुटुंबात प्रथमच पराभव; शेकापची रसद कामाला नाही आली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - गेल्या अर्धदशकात शरद पवार घराण्याच्या राजकीय वाटचालीत पवारांशी संबंधातील एकालाही कोणत्याच निवडणुकीत पराभव पत्करावा लागला नाही. त्यांची विजयाची परंपरा रोखण्याची धमक कोणत्याही राजकीय धुरिणांमध्ये नव्हती. मात्र, मोदी लाटेच्या तडाख्यामध्ये मावळ लोकसभा निवडणुकीत नातू पार्थ पवारांना पहिल्याच प्रयत्नात लाखोंच्या मताधिक्याने पत्करावा लागला आहे. विजयाची खात्री नसलेल्या जागेवर शरद पवारांचा पार्थ प्रयोग फसला आहे. समोरच्या उमेदवाराचा लाखो मताधिक्याने पराभव करणारे आजोबा पवार नातू पार्थला पराभवापासून वाचवू शकले नाहीत. १९६७ मध्ये शरद पवारांनी राज्याच्या राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर १९७८ मध्ये अवघ्या तीस वर्षांच्या उमद्या वयात ते राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. गेल्या पन्नास वर्षांत त्यांचा विजयाचा वारू कोणी रोखू शकला नाही. मात्र, मावळमधील पराभवाने पवारांच्या राजकीय विजयी परंपरेच्या ठिकऱ्या-ठिकऱ्या झाल्या. त्यामुळे यापुढे पवारांचे राजकीय घराणे अजातशत्रू बिरुदावली मिरवू शकणार नाही.


गेली ४० वर्षे सांसदीय राजकारणात घालवणाऱ्या पवारांनी कधीही पराभवाचे ताेंड पाहिले नाही.  पवारांचे लाडके पुतणे अजित पवारदेखील आपल्या राजकीय कारकीर्दीत नावाप्रमाणे ‘अजित’ आहेत. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री, जलसंपदामंत्री अशा महत्त्वाच्या पदावर राहिले. पवार कुटुंबातील इतर व्यक्तीदेखील वेगवेगळ्या संस्थांमध्ये विश्वस्त आहेत. ज्याच्या पाठीवर पवारांचा हात तो विजेता या धारणेला अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या दारुण पराभवाने तडा गेला. अजितदादांनी आपल्या सुपुत्राची खासदारकीची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण राजकीय बळ मावळात पणाला लावले. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची फौज मावळात कामाला जुंपली. मात्र, पार्थ पवारांच्या उमेदवारीवरून घराणेशाहीचा आरोप झाला.  पार्थ पवारांची मराठी बोलण्याची शैली तसेच आत्या सुप्रिया यांच्याप्रमाणे कोणतीही दीर्घकालीन तयारी न करता ते थेट लोकसभा निवडणुकीत उतरले अन् समोरचे अनुभवी दिग्गज उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याकडून पराभूत झाले. 


दरम्यान, या पराभवातून  आता पार्थ आणि पर्यायाने पवार कुटुंब देखील यातून धडा घेतील, यात आता कुणालाही  शंका नाही. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस  नव्या  जोमाने कामाला लागेल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून या वेळी सांगण्यात  आले आहे.

 

शेकापची रसद कामाला नाही आली
रायगड जिल्ह्यातून शेकापची रसद मिळाल्याने पार्थ पवारांचा विजय निश्चित मानला जात होता, तर पिंपरी-चिंचवडमधील राजकीय अधिपत्याच्या जोरावर पार्थला निवडून आणण्याचा अजित पवारांचा प्रयत्न होता. मात्र, पहिल्याच प्रयत्नात पार्थ पवारांना लाखोंच्या मतांनी पराभव पाहावा लागला. शरद पवारांचे दुसरे एक नातू रोहित पवारदेखील आगामी विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांच्याविरोधात जामखेड-कर्जत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. मावळातील पराभवाने रोहित पवारही सावध पावले टाकतील,  असे सध्या दिसत आहे.