आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साध्वी प्रज्ञाच्या वक्तव्यानंतर २६/११ तील शहीद हेमंत करकरे यांची मुलगी जुईची 'दिव्यमराठी'ने घेतलेली मुलाखत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाेपाळ मतदारसंघातील भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहीद व महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावर करकरे यांची मुलगी जुई यांनी प्रथमच जाहीर भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘पित्याच्या हौतात्म्यावर  ११ वर्षांनंतर कुणीतरी आक्षेपार्ह बोलत आहे. अशा नेत्यांना मला काहीच सांगायचे नाही. कारण, त्यांना कळणारही नाही. या लोकांबद्दल बोलून मला त्यांना महत्त्वही द्यायचे नाही.’ बोलताना जुईंचा आवाज कधी वाढत होता. कधी संतापाने तो आणखी चढत होता. विशेष प्रतिनिधी मनीषा भल्ला यांनी अमेरिकेत बोस्टनमध्ये वास्तव्यास असलेल्या जुईंशी दूरध्वनीवरून संवाद साधला. याचा संपादित भाग...

 

प्रश्न - साध्वी प्रज्ञांनी तुमचे वडील हेमंत करकरे यांच्याबद्दल काही भाष्य केले. तुम्ही ते ऐकले आहे का?
> मी ते ऐकले तेव्हा आईच्या एका कवितेच्या ओळी आठवल्या. आई म्हणत असे, ‘पती शहीद झाल्याचे मला दु:ख आहे पण खेद नाही... तरी काही प्रश्न मनात येतात. याची उत्तरे मिळत नाहीत. मग मनच समजूत काढते... वेड्या तू कुणाला प्रश्न विचारत आहेस... मालेगाव स्फोटाचा तपास माझ्या पतीने पूर्ण केला आहे... करकरे, कामटे आणि साळसकर शहीद झाले. आता राजकारण सुरू आहे.’ आई सांगत असे, की काही लोक तर म्हणत, हिच्या पतीला हीरोगिरीचा छंद होता म्हणूनच असे झाले.  पण त्यांची देशभक्ती अमर आहे. शेवटी साध्वी प्रज्ञा तरी कुणासाठी हे बोलत आहे...?
 

> परंतु हेमंत करकरेंच्या हौतात्म्यावर आता राजकारण केले जात आहे...
- अशा नेत्यांना काय बोलणार. बोलून उपयोग तरी काय... पण मतदार हुशार आहेत. शहिदांचा अवमान करणाऱ्यांची ही चाल कधीच उपयोगी ठरणार नाही.

 

> वडील, आई दोघेही गेल्यावर आता जीवनाबद्दल काय वाटते?
- मी बोस्टनमध्ये पती व दोन मुली ईशा (८) तसेच ऋतुजा (५) यांच्यासोबत राहते. पती बँकिंगमध्ये आणि मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 

 

> तुमची धाकटी बहीण शायली आणि आकाश?
- त्यांच्याबद्दल बोलणार नाही. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोघेही कुणाला भेटत नाहीत. 

 

> २६/११च्या दिवशी तुम्ही वडिलांसोबत मुंबईत होतात की अमेरिकेत?
११ वर्षांपूर्वीचे ते दिवस आहेत. माझी नणंद बोस्टनला आली होती. आम्ही नवीन ठिकाणे पाहत फिरत होतो. लग्नानंतर मी आणि पती प्रथमच भारतात जाणार होतो. २६ नोव्हेंबरला बहिणीचा फोन आला... पापा टीव्हीवर दिसताहेत. ते हेल्मेट व बुलेटप्रुफ जॅकेट घालत आहेत. मी घाईने घरी गेले. टीव्ही लावला. मी, आई, भाऊ आणि पती कॉन्फरन्सिंगवर होतो. तेवढ्या फ्लॅश आला... हेमंत करकरे जखमी झाले आहेत...आम्हाला वाटले फार गंभीर नसेल. परंतु, लगेच बातमी आली की करकरे शहीद झाले. आमच्या कुटुंबावर शोककळा पसरली. 

 

> वडिलांच्या बलिदानावर आजही अनेक प्रश्न उपस्थित होतात?
शहीद अशोक कामटेंच्या पत्नी विनिता आणि माझ्याकडे वडिलांचे तसेच कामटेसाहेबांचे शेवटचे कॉल डिटेल्स आहेत. वडिलांनी कंट्रोल रूमला सांगितले होते, की आम्हाला लष्कराची मदत हवी. जेणेकरून कामा रुग्णालयास वेढा देता येईल. अतिरिक्त पोलिस आयुक्त कंट्रोल रूममध्ये असायला हवे होते. परंतु, ते तेथे नव्हते. तिन्ही अधिकारी (हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर) धाडसी, अनुभावी होते. तरी वाईट घडलेच. आजपर्यंत मी यातून सावरू शकलेले नाही.

 

> करकरेंची कोणती गोष्ट आजही मनात ठसलेली आहे?
- त्यांचे संस्कार. पापा लहान होते तेव्हा बाहेर खेळायला गेले. त्यांनी एक शिवी ऐकली. तीच घरी आल्यावर दिली. आजीने त्यांना पाण्याच्या गुळण्या करून तोंड स्वच्छ करायला लावले. त्यानंतर आजीने त्यांना संस्कृत श्लोक शिकवणे सुरू केले. रामरक्षाही शिकवली.

 

> असे ऐकले आहे की पापांनी तुमच्या आईचे नाव बदलून कविता ठेवले होते...
- हो, पापांना कविता खूप आवडत. म्हणून ते आईला ज्योत्स्नाऐवजी कविता नावाने हाक मारू लागले. 

 

> पोलिस अधिकारी म्हणून वडिलांची कोणती गोष्ट प्रभावित करते?
- त्यांची संवेदनशीलता. चंद्रपूरमध्ये एसपी असताना ते लोकांना नक्षलवाद्यांना घाबरू नका, असे सांगत. परंतु, कधीच त्यांनी नक्षल्यांवर गोळ्या चालवल्या नाहीत. नक्षलवादाची एक विचारसरणी आहे. ती गोळ्यांनी संपणार नाही, हे त्यांना माहिती होते. 

 

> चांगला पर्याय देण्यासाठी राजकीय क्षेत्रात याल?
तूर्त तरी नाही. मुली मोठ्या व्हायच्या आहेत. कुटुंबाची जबाबदारी आहे. वडिलांप्रमाणेच माझ्या मुलींना वाढवायचे, घडवायचे आहे.

बातम्या आणखी आहेत...