आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

२४ तासांत दोन तिकिटे; आधी ‘आप’ची उमेदवारी, आता वंचितच्या यादीत नाव!

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई  - वंचित आघाडीने मंगळवारी २२ मतदारसंघांतील उमेदवारांची जातनिहाय नावे जाहीर केली. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातून एक दिवसापूर्वी ज्या उमेदवाराला सोमवारी आम आदमी पक्षाने तिकीट दिले होते, चक्क त्याच उमेदवाराला मंगळवारी वंचित आघाडीनेसुद्धा त्याच मतदारसंघात तिकीट जाहीर केले. त्यावर ‘आमचा उमेदवार वंचितने पळवला’ असा आरोप ‘आप’ने केला आहे. 

डाॅ. आनंद गुरव हे गगनबावडा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी आप आणि वंचित बहुजन आघाडी असे दोन्हीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न चालवले होते.  सोमवारी आपने ८ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात डाॅ. गुरव यांचे नाव होते. मंगळवारी वंचितने पहिली यादी जाहीर केली, त्यातही डाॅ. गुरव यांचे नाव आहे.  याप्रकरणी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता, ‘डाॅ. गुरव वंचितचे उमेदवार आहेत. ते वंचितच्या एबी फाॅर्मवरच उमेदवारी दाखल करणार आहेत’, असे सांगितले. तर ‘आप’चे राष्ट्रीय सहसचिव रुबेन मस्करनेस यांनी सांगितले की, ‘ डाॅ. गुरव यांनी ‘आप’चा विश्वासघात केला आहे. वंचितच्या पूर्वी आम्ही यादी जाहीर केली होती. हा प्रकार दुर्दैवी आहे.’

याप्रकरणी डाॅ. गुरव म्हणाले, मी एक वंचित समूहातून आलेलो आहे. मी ‘आप’कडे प्रयत्न केले होते. पण, आप पक्ष पांढरपेशा लोकांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे आपण वंचितच्या तिकिटावर उमेदवारी दाखल करणार असल्याचे त्यांनी दिव्य मराठीला सांगितले.
 

यादीतील उमेदवारांच्या नावापुढे जातीचाही उल्लेख
हे आहेत वंचित आघाडीचे उमेदवार
शिराळा (सुरेश जाधव) 
करवीर (डाॅ. आनंद गुरव) 
दक्षिण कोल्हापूर (दिलीप कावडे) 
कराड-दक्षिण (बाळकृष्ण देसाई)
कोरेगाव ( डाॅ. बाळासाहेब चव्हाण) 
कोथरूड (दीपक शामदिरे) 
शिवाजीनगर (अनिल कुऱ्हाडे) 
कसबा पेठ (मिलिंद काची) 
भोसरी (शहानवाला शेख) 
इस्लामपूर (शाकीर तांबोळी) 
पाथर्डी-शेवगाव (किसन चव्हाण) 
कर्जत-जामखेड (अरुण जाधव) 
औसा (सुधीर पोतदार) 
ब्रह्मपुरी (चंदुलाल मेश्राम) 
चिमूर (अरविंद सांडेकर) 
राळेगाव (माधव कोहळे), 
जळगाव (शेख शफी अब्दुल नबी शेख) 
अहेरी (लालसू नागोटी) 
लातूर शहर (राजासाब मणियार) 
मोर्शी (नंदकिशोर कुयटे) 
वरोरा (आमोद बावने) 
कोपरगाव (अशोक गायकवाड). 

१ वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीत २२ उमेदवार असून ते सर्व अलुतेदार (गोंधळी, गुरव, रामोशी, सोनार, तांबोळी आदी जातगटातील) आहेत.

२ वंचितने विधानसभेला १०० उमेदवार धनगर देणार असल्याचे जाहीर केले होते. आज मात्र या प्रश्नाला प्रकाश आंबेडकर यांनी खुबीने बगल देत चक्क घूमजाव केले.

३ धनगर समाजाचे नेते व वंचितचे राष्ट्रीय सचिव गोपीचंद पडळकर (सांगली) लवकरच भाजपत घरवापसी करणार आहेत. मात्र पडळकर वंचितबराेबर असल्याचा दावा आज आंबेडकर यांनी केला.