आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहायता निधी धनादेशावर पहिली सही; मुख्यमंत्र्यांचा प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर मुख्यमंत्री सहायता कक्ष बंद झाल्याने अडचणीत आलेल्या रुग्णांना पहिला दिलासा देऊन लोकांमधील आपली प्रतिमा पूर्ववत करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी केला. सिंचन घोटाळ्याचे उदाहरण देऊन अजित पवारांवर चिखलफेक करणाऱ्या फडणवीसांनी सत्तास्थापनेसाठी अजित पवारांसोबत हातमिळवणी केल्याने पहिल्या पंचवार्षिकातील त्यांच्या निर्मळ' प्रतिमा शपथविधीच्या दिवशीच मलिन झाली होती. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे रखडलेले धनादेश मंजूर करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जनमानसातील ही प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला.

समस्याग्रस्त नागरिकांना थेट मदत करता यावी या उद्देशाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीची स्थापना करण्यात आली होती. धर्मदाय न्यास म्हणून कार्यरत या निधीचे अध्यक्ष पदसिद्ध मुख्यमंत्री हे असतात. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू होताच या कक्षाला कुलूप ठोकण्यात आले होते. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून या कक्षाकडे ६ हजार अर्ज प्रलंबित होते. देणगीरूपाने या कक्षाकडे येणारा निधी आणि साखर कारखान्यांच्या सेसमधून संकलित होणारा निधी आटल्याने या कक्षाकडील गंगाजळी कमी झाल्याचे दिव्य मराठी'ने याबाबत प्रकाशित केलेल्या वृत्तात राज्याच्या सचिवांनी सांगितले होते.


परिणामी, अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या कक्षाकडे मदतीचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी खेटे घालत होते. दरम्यान, राष्ट्रपती राजवट उठताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारताच पहिली स्वाक्षरी या निधीच्या धनादेशावर केली.

स्वाक्षरीचे ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न


दादर येथील कुसुम वेंगुर्लेकर यांच्या कर्करोगावरील उपचारांसाठी १ लाख वीस हजार रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. इतर वेळी थेट रुग्णालयाच्या खात्यावर हा निधी हस्तांतरित करण्यात येतो. मात्र, जनमानसात पहिल्या स्वाक्षरीचे ब्रँडिंग करण्याच्या उद्देेशाने हा धनादेश संबंधित रुग्णाच्या हाती सुपूर्द करण्यात आला. या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर सचिव मनोज सौनिक आणि प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.
 

बातम्या आणखी आहेत...