Icc World Cup / इंग्लंड पहिल्यांदाच विश्वविजेता, वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच फायनल व सुपर ओव्हर टाय

न्यूझीलंडचा कर्णधार विलीयम्सन मालिकावीर, इंग्लंडचा स्टाेक्स सामनावीर ठरला

दिव्य मराठी नेटवर्क

Jul 15,2019 09:09:00 AM IST

लाॅर्ड‌्स - क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लाॅर्ड‌्स मैदानावर कर्णधार इयान माॅर्गनच्या कुशल नेतृत्वाखाली इंलंड संघाने ऐतिहासिक यशाला गवसणी घातली. इंग्लंडने यंदाचा विश्वचषक जिंकून इतिहास रचला. इंग्लंडचा संघ पहिल्यांदा विश्वविजेता ठरला.


इंग्लंड संघाने रविवारी फायनलमध्ये न्यूझीलंडचा सुपर आेव्हरमध्ये पराभव केला.
गत उपविजेत्या न्यूझीलंड संघाने रविवारी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये यजमान इंग्लंडसमाेर २४२ धावांचे टार्गेट ठेवले. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना आठ गड्यांच्या माेबल्यात २४१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने २४१ धावा काढून सामना टाय केला. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर आेव्हरमध्ये लावण्याचा निर्णय घेतला.


सुपर ओव्हरमध्ये यजमान इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना बिनबाद १५ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडनेही १५ धावा काढून पुन्हा सामना टाय केला. मात्र, बाऊंड्रीच्या बळावर इंग्लंडच्या नावे विश्वविजेतेपद नाेंद झाले.इंग्लंडच्या नावे २४ बाऊंड्री आहेेे. यासह इंग्लडला तीन फायनल गमावल्यानंतर आता प्रथमच विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवता आला. यामुळे क्रिकेटच्या विश्वाला नवा चॅम्पियन संघ मिळाला.विलीयम्सनच्या नावे विक्रम :
न्यूझीलंडकडून कर्णधार विलियम्सनने (३०) शानदार खेळी केली. यादरम्यान विलियम्सनने विक्रमाला गवसणी घातली. आता ताे विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा जगातील पहिला कर्णधार ठरला. तसेच इंग्लंडच्या संघाला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये चाैथ्यांदा प्रत्युत्तरात खेळावे लागले. यापूर्वीच्या तिन्ही वेळा इंग्लंडला प्रत्युत्तरात पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या वाेक्स (३/३७) व प्लंकेट (३/४२) यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या.


टेलर १०००+ धावा काढणारा दुसरा :
न्यूझीलंडच्या राॅस टेलरला आता फायनलमध्ये माेठी खेळी करता आली नाही. ताे १५ धावांवर बाद झाला. मात्र, यासह त्याच्या नावे विश्वचषकात सर्वाधिक १०००+ धावांच्या विक्रमाची नाेंद झाली. असा पराक्रम गाजवणारा ताे दुसरा फलंदाज ठरला. स्टीफन फ्लेमिंग हा (१०७५) अव्वल स्थानावर आहे. मार्टिन गुप्टिलची (९९५) संंधी थाेडक्यात हुकली.

विश्वचषकाच्या इतिहासात फायनल रंगली सुपर ओव्हरमध्ये
विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच फायनल ही सुपर ओव्हरमध्ये रंगली आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २४१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात यजमान इंग्लंड संघानेही २४१ धावा काढून सामना बराेबरी आणला. त्यामुळे सुपरआेव्हरचा आधार घ्यावा लागला. मात्र, त्यानंतरही सुपर ओव्हरचा सामना टाय झाला. त्यामुळे फायनलचा निकाल डावातील सर्वाधिक बांऊड्रीच्या आधारे लागला. त्यात इंग्लंडचा विजेता ठरला.


रुटचे सर्वाधिक झेल
यंदाच्या विश्वचषकात यजमान इंग्लंडच्या ज्याे रुटचे आपल्या घरच्या मैदानावरील क्षेत्ररक्षण अधिक लक्षवेधी ठरले. त्याने फायनलमध्ये जेम्स निशामचा झेल घेतला. यासह त्याच्या नावे विश्वचषकात सर्वाधिक १३ झेलची नाेंद झाली. २००३ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगने ११ झेल घेतले हाेते.


विलियम्सनच्या ५७८ धावा
न्यूझीलंडच्या कर्णधार विलियम्सनने ३० धावांची खेळी केली. यासह त्याच्या नावे विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा पहिला कर्णधार हाेण्याचा विक्रम नाेंद झाला. त्याच्या यंदाच्या विश्वचषकात कर्णधाराच्या भूमिकेत ५७८ धावा झाल्या. यात प्रत्येकी दाेन शतकांसह अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वी २००७ मध्ये श्रीलंकेच्या कर्णधार जयवर्धनेने ५४८ धावा काढल्या हाेत्या.

डेटा पॉइंट
> न्यूझीलंड संघाच्या डावातील ४९ व्या षटकात क्रिस वाेक्सचा चेंडू कमरेपेक्षा उंच असल्याने नाे बाॅल देण्यात आला. या स्पर्धेत इंग्लंड संघाचा हा पहिला नाे बाॅल ठरला. हाॅलंडचा (१९९६ मध्ये) संघ एकमेव ठरला, ज्या टीमने एकही नाे बाॅल टाकला नाही.


> इंग्लंड संघाने सर्वाधिक वाइड बाॅल देण्याचा लाजिरवाणा विक्रम नाेंद झाला. टीमने अंतिम सामन्यात १७ वाइड बाॅल टाकले. यापूर्वी २००३ मध्ये टीम इंडिया व २००७ मध्ये श्रीलंकेने फायनलमध्ये प्रत्येकी १६ वाइड बाॅल टाकले हाेते.

X
COMMENT