वटवृक्ष जगवा / बीडच्या पालवनमध्ये पहिल्या जागतिक वृक्ष संमेलनाला सुरुवात, सयाजी शिंदे यांनी मांडले वडाचे भाषण

  • वृक्षप्रेमी मित्रांंनो, मी वड बोलतोय, अध्यक्ष वड
  • वृक्षांची संमेलनस्थळी पाल‌खीत मिरवणूक

प्रतिनिधी

Feb 14,2020 07:55:00 AM IST

बीड - चक्क एक वडाचं झाड बीडमधील वृक्षप्रेमींशी संवाद साधत होतं. हातवारे करत होतं.. आपली व्यथा मांडत होतं.. बाजारात आपला कसा लिलाव केला गेला.. विकासाच्या नावावर कशी त्याच्या अंगाखांद्यांवर कुऱ्हाड चालवली गेली हे सांगत होतं.. त्याच्या शब्दा-शब्दात ताकद होती.. त्याने सांगितलं त्याच्या फांद्या कशा तोडल्या गेल्या. त्याच्या अनेक नातेवाइकांची कशी कत्तल केली गेली. तो लोकांना सावली द्यायचा. ती लोकंच त्याच्या मुळावर उठली. त्याला मुळासकट उद्ध्वस्त केलं..


ते झाड बोलत होतं आणि वृक्षप्रेमींच्या डोळ्यातून पाणी झिरपत होतं. त्याचं ते अध्यक्षीय भाषण मनाला चटका लावून गेलं. त्याची आजही किती गरज आहे आणि त्याच्याशिवाय आपण कसे जगूच शकत नाहीत हे मात्र ते आपल्या भाषणाच्या माध्यमातून अधोरेखित करून गेलं.


बीडमधील पालवन येथे आयोजित दोन दिवसीय पहिल्या जागतिक वृक्ष संमेलनाला गुरुवारपासून प्रारंभ झाला. प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी याप्रसंगी अरविंद जगताप यांनी लिहिलेलं वडाच्या झाडाचं भाषण उपस्थितांच्या पुढ्यात मांडलं. स्वत: वड होऊन अनुभवल्याशिवाय त्याच्या व्यथा कळणार नाहीत हे त्यांनी उपस्थितांसमोर स्पष्ट केलं. वडाचं झाड संमेलनाचं अध्यक्ष हे ऐकूनच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आता त्याचे भाषण कसे असेल याची उत्सुकता साऱ्यांना लागली होती. सयाजी शिंदे यांनी मात्र साक्षात वड साकारत त्याच्या म्हणण्याला जिवंतपणा दिला.

आज आनंद वाटताे


रस्त्याच्या रुंदीकरणात आम्ही म्हणे आडवे येत आहाेत, त्यामुळे आमचा पाच-पन्नास रुपयांमध्ये लिलाव झाला आणि आमच्यावर बुलडोझर चालवले. आम्ही आमचा धर्म साेडणार नाही, आम्ही वाढतच राहणार आहाेत. आज आनंद वाटताे आहे, संमेलनाचे अध्यक्षपद मला मिळाल्याने ही बाब आमच्या नातेवाइकांसाठी आनंदाची आहे. आम्ही वाढत राहू, सावली देत राहू, आॅक्सिजनही पुरवू, काेणी त्रास दिला तरी त्याची तक्रार न करता त्याला मदतच करू हेच आमचे ध्येय असल्याचे संमेनलनाचे अध्यक्ष वडाच्या झाडाने भाषणातून मांडले.

वृक्षांची संमेलनस्थळी पाल‌खीत मिरवणूक :

पालवन येथील सह्याद्री देवराई या संमेलनस्थळी गुरुवारी संमेलनाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या उपस्थितीत पालखीत झाडे ठेवून मिरवणूक काढली. विद्यार्थ्यांनी वडाच्या नावानं चांगभलं, पिंपळाच्या नावानं चांगभलं, झाडाच्या नावानं चांगभलं, झाडाचा मित्र सयाजी शिंदे अशा घाेषणा दिल्या. वडाच्या झाडाच्या ठिकाणी ही पालखी अाल्यानंतर पुन्हा काही वृक्ष ठेवण्यात अाले. या वेळी विद्यार्थ्यांनी घाेषणा दिल्या.

X