आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Five Bags Of Empty Bottles Of Foreign Liquor Seized, Brought Cheap Liquor From Goa And Filled In Empty Bottles And Sold As 'branded'.

विदेशी दारूच्या पाच पोती रिकाम्या बाटल्या जप्त, गोव्यातून स्वस्त दारू आणून रिकाम्या बाटल्यांत भरून 'विदेशी' म्हणून विक्री

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे गोवा राज्यातील दारू चोरट्या मार्गाने आणून ती विदेशी दारूच्या बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा गोरखधंदा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता.२६) तिघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून विदेशी दारूच्या पाच पोते रिकाम्या बाटल्या व बुच जप्त केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गोवा राज्यातून स्वस्तात मिळणारी दारू चोरट्या मार्गाने जिल्ह्यात आणली जात आहे. त्यानंतर ही दारू विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून महागडी विदेशी दारू म्हणून त्याची विक्री केली जात आहे.

या प्रकरणात सुमारे एक महिन्यापूर्वी गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अधिक माहितीमध्ये अशा प्रकारे दारू विक्री करून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक करणारे जाळेच असल्याचे स्पष्ट झाले होतेे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे काही जण अशा प्रकारची दारू तयार करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगदिश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार संभाजी लकुळे, आशिष उंबरकर, सुनील अंभोरे, राजूसिंह ठाकूर, किशोर सावंत, दीपक पाटील, प्रशांत वाघमारे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे पिंपळदरी येथे छापा टाकून दारूचा साठा अाणि रिकाम्या बाटल्या जप्त केल्या अाहेत.

या प्रकरणी उपनिरीक्षक घेवारे यांच्या तक्रारीवरून विवेक पांपटवार (रा. आखाडा बाळापूर), शेख बुऱ्हाण शेख कासीम, गजानन दादाराव रिठ्ठे (दोघे रा. पिंपळदरी) यांच्या विरुध्द कळमनुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हा मुद्देमाल अाढळला

घटनास्थळावर गोवा राज्यातून आणलेली दारू तसेच इम्पेरियल ब्ल्यू, मॅकडॉल या दारूच्या रिकाम्या बाटल्या व बूच आढळून आले. याशिवाय दारू भरण्यासाठी टाकीदेखील सापडली आहे. पोलिसांनी ४५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...