आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या पाच नगरसेवकांना चार तासच ठाण्यात ठेवले, जबाब नोंदवून सोडून दिले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणारा एमआयएम नगरसेवक सय्यद मतीनला मनपा सभागृहात बेदम मारहाण करणाऱ्या भाजपच्या पाच नगरसेवकांच्या अटकेचा सोपस्कार सोमवारी पोलिसांनी पार पाडला. दुपारी साडेतीनच्या सुमारास पाचही जणांना अटक करून सायंकाळी साडेसातपर्यंत या पाचही जणांना सोडून देण्यात आले. या प्रकरणात लावण्यात आलेली सर्व कलमे जामीनपात्र असल्याने पोलिस ठाण्यातच त्यांना जामीन देण्यात आला, अशी माहिती पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांनी दिली. 


भाजपचे उपमहापौर विजय औताडे तसेच नगरसेवक राज वानखेडे, प्रमोद राठोड आणि माधुरी अदवंत यांनी १७ ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्याने मतीनला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. यानंतर मतीन समर्थकांनी मनपाबाहेर वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात मतीनविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मतीनच्या तक्रारीवरून उपमहापौरांसह भाजपच्या चार नगरसेवकांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी सिटी चौक पोलिसांनी उपमहापौरांसह चारही नगरसेवकांना अटक केली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. 


मतीनला पक्षानेच फटकारले 
सय्यद मतीनला मात्र स्वपक्षानेच फटकारले आहे. नगरसेवकाला सभागृहात मारहाण करणे चुकीचे असून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार इम्तियाज जलील यांनी केली. मात्र, श्रद्धांजलीला विरोध करणे हा पक्षाचा निर्णय नव्हता. पक्षाचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवेसीदेखील नाराज असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत मतीनला अनेक वेळा समजावून सांगितले तरी फरक पडला नाही, असे ओवेसी सांगत असल्याचे फोनवरील संभाषण व्हायरल झाले आहे. 


नगरसेवकांवर लावलेली कलमे 
भाजपच्या पाच नगरसेवकांवर मतीनच्या फिर्यादीवरून कलम १४६, १४७, १४९, ३२३, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कलमे जामीनपात्र आहेत. तर मतीनच्या विरोधात विजय औताडे यांच्या फिर्यादीवरून १४३, १४७, १४८, १४९, ३३७, १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सर्व कलमे अजामीनपात्र असून जामिनासाठी न्यायालयात हजर व्हावे लागते. मतीनला आता कार तोडफोडीच्या गुन्ह्यात हर्सूल कारागृहातून हस्तांतरित करण्यात आले असून, त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाईल. 

 

दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूद 
पोलिसांनी तपासाच्या पहिल्या टप्प्यात मारहाण प्रकरणाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच जबाब नोंदवण्यात येत आहेत. या प्रकरणाचा सविस्तर तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाईल. लावण्यात आलेल्या कलमानुसार ते दोषी आढळले तर या कलमांमध्ये दोन वर्षांच्या शिक्षेची तरतूददेखील आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिनगारे यांनी दिली. 


भाजपचे सर्व पदाधिकारी पोलिस ठाण्यात हजर 
पाच नगरसेवकांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळताच शहरातील भाजपचे सर्व नेते सिटी चौक पोलिस ठाण्यात आले. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, संजय केणेकर, बापू घडामोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी नगरसेवकांसोबत चर्चा करून त्यांचा जामीन घेतला. 


क्राइम मीटिंग होताच कारवाई 
सोमवारी पोलिस आयुक्त कार्यालयात सर्व पोलिस निरीक्षकांची क्राइम मीटिंग होती. दुपारी दोनच्या सुमारास ही मीटिंग संपताच पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांच्या पथकाने पाचही नगरसेवकांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाचादेखील या कारवाईत सहभाग होता. 

बातम्या आणखी आहेत...