आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या कारची उभ्या ट्रकला धडक, पाच ठार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आळंंद (जि. साेलापूर) - तिरुपतीहून श्रावण सोमवारी कलबुर्गींच्या श्री शरणबसवेश्वराचे दर्शन घेऊन स्वग्राम चिंचपूर (ता. सोलापूर) येथे आळंंदमार्गे जात असताना कलबुर्गी शहराबाहेरील सावळगी फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकला भाविकांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील पाच जण जागीच ठार झाले. हा अपघात साेमवारी रात्री घडला. संजयकुमार अशोक चडचण (२९), राणी अशोक चडचण (२६), श्रेयस संजयकुमार चडचण (३), भाग्यश्री भीमाशंकर आळगी (२२), धीरज संगण्णा हत्तरसंग (२) हे जागीच ठार झाले.  तर  शिवराज संजयकुमार चडचण (८) शीतल संगण्णा हत्तरसंग (२०) व भीमाशंकर आळगी (२८) हे जबर जखमी झाले असून जखमींना कलबुर्गींच्या युनायटेड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिस ठाण्याचे निरीक्षक शांतिनाथ भुते यांनी दिली.  त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.  

चिंचपूरवर शोककळा
चिंचपूर व कोरसेगावचे प्रवासी एकूण तीन प्रवासी वाहनांमधून तिरुपतीला बालाजीच्या दर्शनासाठी गेले होते. येताना श्रावणी सोमवारचा योग असल्यामुळे कलबुर्गींच्या शरण बसवेश्वरांचे दर्शन घेऊन सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आळंंदमार्गे अक्कलकोटकडे निघाले असता कलबुर्गी शहरापासून जवळच असलेल्या सावळगी फाट्यावर आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला स्कॉर्पिओने जोदार धडक दिली.  धडक एवढी जोरदार होती की यात स्काॅर्पिओचा अक्षरश: चेंदामेंदा झाला व आतील आठपैकी पाच जण जागीच ठार झाले, तर तीन जण जबर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतांत एकाच कुटुंबातील तीन जण
मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन जण आहेत. अपघाताची माहिती मिळताच कलबुर्गीचे पोलिस उपायुक्त डी.किशोरबाबू, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रसन्न देसाई, वाहतूक शाखेचे पीआय शांतिनाथ भुते यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींना कलबुर्गीकडे उपचारासाठी त्वरित हलवले.  वाहतूक पोलिस ठाणे क्र. २ मध्ये या अपघातप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इतर दोन वाहनांतील सहप्रवाशांनी या भीषण अपघाताचे दृश्य पाहून हंबरडा फोडला. त्यानंतर मृतदेह त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...