आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Five month Inquiry, 105 page Report, Direction Of Inquiry On Complainant's Application At Tuljapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाच महिने चौकशी,105 पानांचा अहवाल, तक्रारदारांच्या अर्जावर तपासाची दिशा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या धार्मिक व्यवस्थापकपदाचा पदभार हस्तांतरण करताना रजिस्टरला नोंदीस असलेल्या अनेक मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार आल्यानंतर नेमलेल्या समितीने ५ महिने चौकशी केली. या समितीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि दोन उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. समितीने १०५ पानांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला अाहे. विशेष म्हणजे सुरुवातीला पदसिद्ध विश्वस्त असलेल्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी लावण्यात आली होती. मात्र, पुजाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विश्वस्त नसलेल्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. दरम्यान, आता हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे पाठवण्यात आल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचाराची मालिका कायम आहे. जमीन घोटाळ्यानंतर दानपेटी प्रकरण समोर आले. त्यानंतर देवीला दिलेली मौल्यवान भांडीही गायब झाल्याचे प्रकरण समोर अाले. त्यानंतर मंदिराच्या रजिस्टरला नोंद असलेल्या मौल्यवान दागिन्यांचा तपास लागत नसल्याची बाब समोर आली. पुजारी किशोर गंगणे यांनी यासंदर्भातील तक्रार जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दीपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे केली. मुंढे यांनी सुरुवातीला हे प्रकरण तुळजापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिले. गंगणे यांनी यावर आक्षेप नोंदवत विश्वस्त अधिकाऱ्यांकडून प्रकरण काढून विश्वस्त नसलेल्या अधिकाऱ्यांकडे साेपवण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दोन उपजिल्हाधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली. या समितीने मे महिन्यापासून चौकशी सुरू केली. समितीचा अहवाल पाच महिन्यांत पूर्ण झाला. त्यानुसार संबंधित स्थानिक अधिकाऱ्यांना दोषी धरण्यात आले आहे. यामध्ये तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडींसह विद्यमान धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले व दोन प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदारांवर ठपका ठेवला अाहे. या प्रकरणात आता गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) तपास करणार आहे.

काय आहे प्रकरण? 
श्री तुळजाभवानी मंदिर देवस्थानात गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी सेवानिवृत्तीनंतर त्यांचा पदभार नूतन धार्मिक व्यवस्थापक एस. एस. इंतुले यांच्याकडे १६ ऑगस्ट २०१८ रोजी सोपवला होता. या पदभार हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तिघांची समिती नेमून त्यांच्या देखरेखीखाली हा पदभार हस्तांतरित करण्याचे आदेश होते. त्यानुसार पदभाराची देवाण-घेवाणही झाली. मात्र, मंदिर देवस्थानच्या दप्तरी नोंद असलेले अनेक मौल्यवान, ऐतिहासिक दागिने चार्जपट्टीमध्ये नोंदीस न आल्याने संशय निर्माण झाला. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी अॅड. शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून गहाळ दागिने प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, अपर जिल्हाधिकारी व दोन उपजिल्हाधिकारी यांच्या समितीने केलेल्या चौकशीत गंगणे यांनी केलेल्या तक्रारींपैकी अनेक मुद्द्यांमध्ये तथ्य समोर आले. समितीच्या अहवालात तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, विद्यमान धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले या चार्ज घेणाऱ्या-देणाऱ्यांसह २००१ मध्ये सर्वप्रथम नाईकवाडींनी ही जबाबदारी बेकायदेशीर व चुकीच्या पद्धतीने स्वीकारल्यानंतर त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या तत्कालीन तहसीलदार व दोन प्रशिक्षणार्थी नायब तहसीलदारांवरही ठपका ठेवत गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून कार्यवाही करण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार, जिल्हाधिकारी मुंढे यांनी १९ नोव्हेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला पत्र व अहवाल देऊन सखोल चौकशी करून दोषींवरील कार्यवाही अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

समितीने या मुद्द्यांवर ठेवले बोट
- देवीच्या दागिन्यांतील खडाव जोड, मुकुटातील माणिक गायब नाईकवाडींकडून इंतुलेंकडे पदभार देताना चार्जपट्टीत अनेक रेकॉर्डवरील दागिन्यांचा उल्लेखच नाही.
- सोने, चांदीसह पुरातन भांडी, पुरातन नाणे गायब. राजा, संस्थानिकांनी भेट, वाहिक केलेल्या नाण्यांची जुन्या रेकॉर्डला नोंद, हस्तांतरणात उल्लेखच नाही.
- तत्कालीन व्यवस्थापक दीक्षित यांच्या मृत्यूनंतर नाईकवाडी यांनी बेकायदेशीरपणे पदभार घेतला. त्रुटींबाबत वरिष्ठांनाही कळवले नाही.
- स्ट्राँग रुमला १२ चाव्या, चार्जपट्टीत ८ चीच नोंद.
- महंतांकडील वस्तू, दागिन्यांची चार्जपट्टीत नोंदच नाही, वरिष्ठांकडेही माहिती सादर नाही. तक्रारीच्या मुद्द्यांवरच फिरला तपास, दोष सिद्ध.
 

बातम्या आणखी आहेत...