आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Five Months Ago, Candidates Appreciate To Each Other Is Now Contest Election Against Each Other

पाच महिन्यांपूर्वी एकमेकांचे गोडवे गाणारे आता एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदार जोशी, प्रदीप अमृतराव  

तुळजापूर - उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास थांबला आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबाद आणि तुळजापूर मतदार संघात निधी आणि विकास कामे करण्यात तेथील लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याचे जाणवले. त्यामुळे अनेक दिवस विचार करून मनातील द्वंद संपवून मी पक्ष बदलला आणि भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरलो, असे राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलतांना सांगितले.  तर गेल्या अनेक वर्षात ज्यांना तेर या स्वत:च्या गावातील  संत गोरोबा काका यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी एक विटही रचली नाही, त्यांनी विकासाची भाषा करूच नये, असा आरोप काँग्रेसचे विद्यमान आमदार व उमेदवार मधुकर चव्हाण यांनी केला आहे. विशेष म्हणजे पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लाेकसभा निवडणुकीत एकाच व्यासपीठावर एकाच पक्षात असताना एकमेकांचे गाेडवे गाणारे राणा पाटील आणि आ. चव्हाण आता तुळजापुरातून विराेधात उभे ठाकले आहेत.  राणा जगजितसिंह यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात राणा यांना शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर राणा यांनी भाजपत प्रवेश केला.  त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून काँग्रेसचा गड राखण्यात यशस्वी राहिलेल्या मधुकर चव्हाण यांच्यासमोर मोठे आव्हान उभा राहिले आहे. त्यामुळे या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. 

विकासाबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, जिल्हा रुग्णालय, पाणीपुरवठा योजना, गाव तेथे साठवण तलाव अशी अनेक कामे सरकारच्या पाठीमागे लागून केली. पद्मसिंह पाटील यांच्याकडे पाटबंधारे खात्याचा कारभार होता तरी जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न होता. गेल्या १५ वर्षांत तो आम्ही बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात यशस्वी झालो आहे. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख  यांनी या भागाला उजनी धरणातील पाणी  मिळावे यासाठी प्रयत्न केले होते. त्याला यशही मिळाले.  आम्ही हा प्रश्न लावून धरला त्यामुळे पुढील वर्षात तुळजापूरला हे पाणी मिळणे निश्चित आहे. त्यामुळे याचे श्रेय भाजपने किंवा त्यांच्या उमेदवाराने घेण्याचा प्रयत्न करू नये. असे चव्हाण सांगतात.   
 

वंचित, प्रहार, मनसेही रिंगणात 
तुळजापूर मतदार  संघात वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे, प्रहार जनशक्तीचे महेंद्र धुरगुडे आणि मनसेचे प्रशांत नवगिरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे.   देवानंद रोचकरी यांची भूमिकाही महत्वाची आहे. यावेळी ते भाजपत असून ते राणा यांचा प्रचार करीत आहेत. विशेष म्हणजे  पाचही उमेदवार हे मराठा समाजातील आहेत. मत विभाजनासाठी ही खेळी नेमकी कोणी आहे हे कोडे आहे. तुळजापूर मतदार संघात १०८ ग्रामपंचायती आणि १९५ गावे आणि ५८ तांडे आहेत. यापैकी ७२ गावे ही उस्मानाबाद तालुक्यात आहेत. एकूण ३ लाख ५१ हजार ३६१ मतदार असून उमेदवारांच्या मते १ लाख २३ हजार मराठा, ५९ हजार दलित,  ४५ हजार लिंगायत, ३५ हजार मुस्लीम, २५ हजार धनगर आणि २२ हजार बंजारा समाजाचे मतदार आहेत. 

राज्यातील ज्येष्ठ उमेदवार 
मुधकर चव्हाण हे राज्यातील सर्वांत ज्येष्ठ उमेदवार आहेत. वयाच्या ८४ व्या वर्षी देखील ते निवडणूक लढवत आहेत. आता पर्यंत २५ वर्ष ते आमदार राहिले आहेत. त्यांनी आतापर्यंत दुग्ध विकास, पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि परिवहन मंत्री म्हणून जवाबदारी सांभाळली आहे. वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आणि शिखर बँकेचे संचालक म्हणूनही त्यांची जवाबदारी सांभाळली आहे. दहावी अनुत्तीर्ण असूनही त्यांनी या खात्याची जवाबदारी समर्थपणे सांभाळल्याचे समर्थक सांगतात. त्यांची सुनील आणि बाबूराव ही दोन मुलेही राजकारणात सक्रिय आहे. तिसऱ्या पिढीतील रणवीर सुनील चव्हाणही  या वेळी प्रचारात उतरले आहेत. तर  डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजित सिंह पाटील हे ५५ वर्षांचे आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. मुंबईत त्यांचे व्यवसाय आहेत. पत्नी अर्चना पाटील आणि  तिसऱ्या पिढीतील मल्हार पाटील हे  राणा यांच्या प्रचाराची सूत्रे सांभाळत आहेत.
 

जुना भिडू, नवा पक्ष, नवीन मतदारसंघ 
राणा जगजितसिंह तसे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जुनेच. आजवर युतीच्या विरोधात तोफ डागणारे नेते. अगदी मोदी लाटेतही बाप-लेकाने हा गड कायम राखला. त्यामुळे जुना भिडू नवा पक्ष आणि नवीन मतदार संघ असे चित्र  आहे. उस्मानाबाद होम पिच असलेले राणा यावेळी तुळजापूर मतदार  संघातून निवडणूक लढवत आहेत.  यावेळी मात्र राणा आणि त्यांचे समर्थक यांना गावागावांत जाऊन आपले निशाण आता कमळ आहे, असे सांगावे लागत आहे. निवडून आलो आणि उजनीचे पाणी जर तुळजापुरात आणू शकलो नाही तर राजकीय संन्यास घेईल, असेही राणा सांगतात. या शिवाय रोजगार, आरोग्य, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी आदी मुद्देही ते मांडत आहे.    

यांनी तर विकासाची भाषा करू नये
ज्यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून या जिल्ह्याचे नेतृत्व होते. ज्यांच्या घरात राज्याची मंत्रिपदे होती त्यांनी या मतदार संघाला किती न्याय दिला याचा विचार करायला हवा, असा आरोप मधुकर चव्हाण यांनी केला आहे.  ते म्हणाले राणा यांचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे  मूळ गाव आहे. या गावात जिल्ह्याचे आदरस्थान असलेले संत गोरोबा काका यांचे मंदिर आहे. त्याच्या जीर्णोद्धारासाठी यांनी कधी एक विट देखील रचली नाही, त्यांनी विकासाची भाषाच करू नये, असे चव्हाण सांगतात.