आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच महिन्यांनंतर 'जहान'च्या मालकांवर गुन्हे दाखल प्रक्रिया, राज्यभरातील शेकडो भाविकांची फसवणूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक : हज-उमराह यात्रेचे आयोजन करतो असे सांगून शहरातील शेकडाे भाविकांकडून रक्कम जमा करून त्यांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तब्बल पाच महिने उलटल्यावर 'जहान' इंटरनॅशनल टूरच्या मालकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हज-उमराहसाठी जाणाऱ्या भाविकांकडून तिकिटापाेटी घेतलेल्या पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ७५ यात्रेकरूंनी आर्थिक गुन्हे शाखेकडे बुकिंग फसवणुकीसंदर्भात तक्रार केली होती. 


शहरातील वडाळारोडवरील रहेनुमा उर्दू शाळेजवळ असलेल्या 'जहान' इंटरनॅशनल टूरचा मालक अब्दुल मतिन मनियार, अजीज बनेमिया मनियार, जावेद हनीफ शेख, समीर मनियार यांनी १ आॅगस्ट २०१७ ते १ फेब्रुवारी २०१८ या कालावधीपर्यंत दीपालीनगर येथील अल-खैर टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सचे संचालक अश्फाक पठाण यांना काही प्रवासी विमानतळावर अडकले असल्याचे सांगत 'आम्ही अडचणीत आलो आहोत, तुम्ही त्यांचे तिकीट काढून द्यावे, आम्ही तुम्हाला तिकिटाच्या रकमेचे धनादेश देऊ,' असे सांगून एक कोटी ७५ लाख ११ हजार ३२८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शहरातील मुंबईनाका पाेलिस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर कोणत्याही प्रकारची वाट न पाहता संशयित अब्दुल मतिन मनियार व अजीज मनियार हे दोघे परदेशात पसार झाले तर इतर संशयित राज्यातच इतर ठिकाणी फरार झाले. 


यानंतर अचानक टूरचे ऑफिस बंद पडल्याने तसेच या फसवणुकीसंदर्भात नागरिकांना माहिती मिळाल्यानंतर काहींनी पोलिस ठाण्यात धाव घेत यासंदर्भात तक्रार नोंदवली. या सर्व प्रकरणादरम्यान टूरच्या माध्यमातून हज यात्रेला जाणाऱ्या तब्बल तीनशेहून अधिक भाविकांना हज यात्रेला न पाठवता त्यांचीही फसवणूक यावेळी करण्यात आली. तसेच या घटनेनंतर शहरातील हज व उमराहसाठी जाणाऱ्या शेकडो भाविकांनी एकत्र येऊन अब्दुल मतिन मनियार यांच्यासह त्यांच्या एजंटांविरोधात हज व उमराहचे पैसे घेऊनही यात्रेला न पाठवत फसवणूक केल्याची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मात्र, या तक्रारीनंतरही पोलिसांकडून हवा तसा तपास करण्यात आलेला नसल्याने अारोपींना पकडण्यात अपयश आल्याचे चित्र आहे. या प्रकरणानंतर तब्बल पाच महिने उलटल्यावर पोलिसांकडून या प्रकरणाला गती देण्यास सुरुवात करण्यात आली असून गुरुवारी (दि. ३१) यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांना आवाहन करत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 


राज्यभरातील शेकडो भाविकांची फसवणूक, मतिन मनियारचा जामिनासाठी अर्ज 
दरम्यान, एक कोटी ७५ लाख ११ हजार ३२८ रुपयांची फसवणूक प्रकरणी अब्दुल मतिन मनियार, अजीज बनेमियाँ मनियार, जावेद हनीफ शेख, समीर मनियार यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून जामीन अर्जावर सुनावणी झाली. मतीन मनियार परदेशात असला तरी त्याच्या वकिलाकडून यासंदर्भात युक्तिवाद केला जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. 


आणखी एक टूर कंपनीचालकाकडून ग्राहकांना फसवणूकीचा 'ताज' 
जहान इंटरनॅशनल या टूरच्या नावाने राज्यभरात काही एजंट अर्ध्या किमतीत म्हणजे, उमराहसाठी एक वर्ष आधी केवळ २८ हजार, २९ हजार व ३० हजारांपर्यंत बुकिंग करून त्यांना पंधरा दिवसांसाठी उमराहला पाठवले जात होते. तर हज यात्रेसाठी एक वर्ष आधी दीड लाख रुपये घेऊन बुकिंग करून त्यांना तीस दिवसांपासून हज यात्रेला पाठवले जात होते. 'जहान' प्रमाणेच शहरातील एका टुरचालकांनी अशाच स्किमच्या अामिष दाखवून ग्राहकांना फसवणुकीचा 'ताज' त्यांच्या डोक्यात घातल्याने ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जात अाहे. 


तक्रारीसाठी पुढे यावे... 
'जहान' इंटरनॅशनल टूरचा मालक अब्दुल मतिन मनियार यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बुकिंगसंदर्भातील गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. ज्या लोकांनी हज व उमराहसाठी बुकिंग केले आहे, त्यांनी तक्रारीसाठी पुढे यावे. - सुनील नंदवाळकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा 


हाजींची फसवणूक करणाऱ्यांना देशात आणा... 
हज-उमराह यात्रेचे आयोजन करतो असे सांगून शहरातील शेकडाे भाविकांकडून रक्कम जमा करून त्यांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्याला परदेशातून भारतात आणून त्याला शिक्षा द्यावी. जेणेकरुन ईतर कुठलाही टुरमालक श्रद्धेच्या नावाखाली अशा प्रकारे कोणाची ही फसवणूक करणार नाही. - अजिज पठाण, तक्रारदार 
 

बातम्या आणखी आहेत...