आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्ह्यातील सहापैकी पाच लढती बनल्या रंगतदार; एक 'मॅनेज'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर : लातूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सहा मतदारसंघांपैकी लातूर ग्रामीण वगळता पाचही ठिकाणच्या लढती रंगतदार बनल्या आहेत. काँग्रेससाठी एकतर्फी वाटणाऱ्या लातूर शहर आणि भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या निलंग्यातही शेवटच्या टप्प्यात चुरस निर्माण झाली आहे. लातूर ग्रामीण या मतदारसंघात मात्र काँग्रेसच्या धीरज देशमुखांविरोधात शिवसेनेच्या सचिन देशमुख या उमेदवाराने प्रचारच केला नसल्यामुळे तेथे नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळण्याची चिन्हे आहेत.

लातूर शहर मतदारसंघात भाजपने मागील वेळी पराभूत झालेल्या शैलेश लाहोटींना उमेदवारी दिल्यानंतर अमित देशमुख यांच्या गोटात यंदाची निवडणूक एकतर्फी असल्याची भावना झाली आहे. प्रारंभीचे चित्रही तसेच होते. परंतु लाहोटींनी गेल्या चार दिवसांत धडाक्यात प्रचार यंत्रणा राबवली अाहे. त्याचबरोबर भाजप नेत्यांच्या प्रचाराचा धुरळाही उडाला आहे. हे कमी म्हणून की काय वंचित बहुजन आघाडीच्या राजा मणियार यांनी मुस्लिम आणि दलित वस्त्यांमध्ये जोरदार प्रचार केला. चार वेळा वेगवेगळ्या प्रभागांतून निवडून आलेल्या राजा मणियार यांनी छुपी प्रचारयंत्रणा राबवली आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. एरवी काँग्रेसचा हक्काचा असलेला मुस्लिम आणि दलित मतदार राजा मणियार यांना किती प्रमाणात वळवू शकतात यावर लातूरचा निकाल अवलंबून असणार आहे.

औसा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या विरोधात भाजपच्या अभिमन्यू पवारांनी आव्हान उभे केले आहे. त्यामुळे हॅट्ट्रिकच्या तयारीत असलेल्या पाटील यांची दमछाक होत आहे. भूमिपुत्र या नावाने भाजपचे बंडखोर बजरंग जाधवही रिंगणात आहेत. त्यांना पालकमंत्री निलंगेकरांच्या गटाचा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे औशाची निवडणूक टोकदार झाली असून तेथे जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

अहमदपूरमध्ये भाजपच्या विनायक पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील, भाजपचे बंडखोर दिलीप देशमुख आणि भाजपतून वंचित आघाडीत गेलेल्या अयोध्या केंद्रे यांनी आव्हान उभे केले आहे. तेथे चौरंगी लढत होत आहे. भाजपच्या मतांची फाटाफूट होऊन राष्ट्रवादीचे पाटील विजयी होतात की अपक्ष आमदार निवडून देण्याची परंपरा अहदमपूरकर कायम ठेवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विनायक पाटील यांच्यासाठी पालकमंत्री संभाजी निलंगेकरांनी चांगलाच जोर लावला आहे.

उदगीरमध्ये भाजपचे डॉ. अनिल कांबळे आणि राष्ट्रवादीचे संजय बनसोडे यांच्यात लढत होत आहे. गेल्या वेळी पराभव होऊनही सलग पाच वर्षे मतदारांच्या संपर्कात राहिलेल्या बनसोडे यांच्यासाठी ही बाब फायदेशीर ठरत आहे. तर परभणीत वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. अनिल कांबळे उदगीरमध्ये राहत नसल्यामुळे त्यांच्यावर परकेपणाचा ठपका बसत आहे. त्यांच्या मागे भाजपची स्थानिक मंडळी ताकदीने उभी आहे, ही त्यांची जमेची बाजू ठरते आहे.

निलंगा मतदारसंघ प्रारंभी पालकमंत्री संभाजी निलंगेकरांसाठी एकतर्फी वाटत होता. त्यामुळे एक लाख मतांची आघाडी घेऊन निवडून येण्याचे स्वप्न निलंगेकरांनी पाहिले होते. परंतु काँग्रेसच्या अशोक पाटील निलंगेकरांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचे डॉ. अरविंद भातांब्रे यांनीही तेथे आव्हान निर्माण केले आहे. भातांब्रे यांच्या मागे दलित, मुस्लिम समाजासह लिंगायत समाजही मोठ्या प्रमाणात उभा ठाकला आहे. शिरूर अनंतपाळ, देवणी, वलांडी, साकोळमध्ये ५० हजारांहून अधिक मतांची संख्या असलेल्या लिंगायत समाजामुळे भाजपचे संभाजी पाटील निलंगेकरही अस्वस्थ असून त्यांनी अंतिम टप्प्यात 

प्रचाराचा जोर वाढवला आहे.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत एकूणच महायुतीविरुद्ध महाआघाडी अशीच लढत असून येत्या २४ तारखेला जिल्ह्यावर कुणाचे वर्चस्व राहील, हे कळेल.
अमित देशमुख
अनिल कांबळे

लातूर ग्रामीणमध्ये 'नोटा फॉर्मात'
लातूर ग्रामीण या मतदारसंघात काँग्रेसचे धीरज देशमुख नशीब आजमावत अाहेत. भाजपने रमेश कराडांसारखा तगडा उमेदवार असतानाही हा मतदारसंघ शिवसेनेला बहाल करून टाकला. शिवसेनेने तेथून सचिन देशमुख यांना उमेदवारी दिली. परंतु अर्ज दाखल करून गेलेले सचिन देशमुख सार्वजनिक जीवनात पुन्हा दिसलेच नाहीत. त्यांच्या प्रचारसभाही झाल्या नाहीत. त्यामुळे हा मतदारसंघ मॅनेज झाल्याची चर्चा अाहे. त्यामुळे काँग्रेस विरोधक मंडळींनी येथे नोटाला मतदान करण्याच निर्णय घेतला आहे. परीणामी लातूर ग्रामीणमध्ये नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळू शकतात, अशी चिन्हे आहेत. तसे झाले तर हे केवळ राज्यातलेच नव्हे तर देशातले आगळे-वेगळे उदाहरण ठरणार आहे.

उमेदवार...
शैलेश लाहोटी
संजय बनसोडे
बसवराज पाटील
संभाजी पाटील
अभिमन्यू पवार
अशोक पाटील
विनायक पाटील
धीरज देशमुख
बाबासाहेब पाटील
सचिन देशमुख
 

बातम्या आणखी आहेत...