आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातपंचायतीच्या पाच जणांना अटक; बलात्काऱ्याला काेठडी, पीडित मुलीच्या अन्यायाला ‘दिव्य मराठी’ने फाेडली वाचा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे जिल्ह्यातील धोंगडेपाडा (ता. साक्री) येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या बाळा सहाने या बलात्काऱ्याला पिंपळनेर पेालिसांनी अटक केली. बुधवारी न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची काेठडीही सुनावली. त्याचबराेबरच गर्भपात करण्यासाठी या पीडितेला बहिष्कृत करणाऱ्या व पाेलिसात तक्रार दिली म्हणून दंड ठाेठावणाऱ्या जात पंचायतीच्या प्रमुखासह ५ जणांनाही बुधवारी पाेलिसांनी अटक केली.
धाेंगडेपाड्यातील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार आणि त्यानंतरही कथित जात पंचायतीने पीडतेला कुटुंबासह बहिष्कृत केले हाेते. त्याचबराेबर  ११ हजार ५१ रुपयांचा दंडही ठोठवला हाेता. आराेपीने बलात्कार केल्यानंतर पीडित मुलगी गर्भवती राहिली, तेव्हा गर्भपात करण्यासाठीही जात पंचायतीकडून तिच्यावर दबाव टाकला जात हाेता. 


दैनिक दिव्य मराठीने या पीडितेची व्यथा मांडली, त्यानंतर पाेलिस प्रशासन मात्र खडबडून जागे झाले. स्वत: पाेलिस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून जात पंचायतीच्या प्रमुखांना बाेलावून घेतले व चाैकशीत ते दाेषी अाढळल्याने गुन्हे दाखल करण्याचे अादेशही मंगळवारी दिले हाेते. तसेच पीडित मुलीची तक्रार घेण्यास व नराधमावर कारवाई टाळाटाळ करणाऱ्या पाेलिसांच्या चाैकशीचे अादेशही देण्यात आले हाेते. 


दरम्यान, मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आराेपी बाळा अब्राहम सहाने २१ मे पासून फरार हाेता. त्याच्या अटकेसाठीही पाेलिसांवर दबाव वाढला. त्यामुळे मंगळवारी रात्री १० वाजता पाेलिसांनी त्याला अटक केली. तर जात पंचायतीच्या पाच जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, पीडितेला मदत करावी व मनाेधैर्य याेजनेतून मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना आमदार नीलम गाेऱ्हे यांच्यासह अनेकांनी केली आहे. संरक्षणाची मागणी पाेलिस अधीक्षकांनी मान्य केली आहे.

 

जातपंचायतीचे हे पाच जण तुरुंगात
धाेंगडेपाड्यातील जातपंचायतीचे प्रमुख असलेल्या जयवंत श्रीपत सहाने ( सोनवणे), ब्यान्यामी बाबरा सोनवणे, प्रदीप अशोक सोनवणे, परशुराम माळी, ममता किशोर सोनवणे या पाच जणांवर गुन्हे दाखल करुन पाेलिसांनी बुधवारी दुपारी त्यांना अटक केली.