आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव कारागृहातील कैद्यांकडून प्रशिक्षण घेऊन दरोड्याचा कट; पाच जणांना नेरीतून केली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर- बँकेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना जामनेर पोलिसांनी जेरबंद केले. पहूर रोडवरील नेरीजवळील पेट्रोल पंपापासून देवपिंप्री फाट्याकडे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतातून या दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस अन्य साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, त्यांनी जळगाव येथील कारागृहातील कैद्यांकडून प्रशिक्षण घेऊन बँकेवर दरोडा टाकण्याचा कट रचला होता. मात्र, तो पोलिसांनी उधळून लावला. 


जामनेर तालुक्यातील खादगावच्या जिल्हा बँकेवर दरोडा घालणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील यांना शनिवारी मिळाली होती. याबाबत वरिष्ठांशी चर्चा करुन पोलिस दरोडेखोरांच्या मागावर होते. सर्व दराेडेखाेर नेरीजवळ जमणार हे कळाल्यानंतर चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. शनिवारी रात्रीच नेरी- पहूर रोडवरील पेट्रोल पंपापासून देवपिंप्री फाट्याकडे रस्त्याच्या कडेला एका शेतात हे दराेडेखाेर एकत्र अालेे होते. तेथून पाचही दरोडेखोरांना ताब्यात घेऊन त्यांची झाडाझडती घेतली. त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस, त्रिशूलसारखे धारदार चॉपर, नऊ मोबाइल, दोन रेसर बाइक, यासह पहाना, स्क्रू-ड्रायव्हर, काळ्या रंगाचे पोषाख, मुखवटे असे साहित्य मिळून आले. 

 

यात अमोल गोकुळ पाटील (मोहाडी, ता. जामनेर), ज्ञानेश्वर श्यामलाल कुमावत (हिंगणे बुद्रूक, ता. जामनेर),सलमान अहेमद खान, सैयद सलमान सैयद कासीन व आरिफ जहांगीर देशमुख(रा. जळगाव) या संशयित दराेडेखाेरांना अटक केली. यातील ज्ञानेश्वर कुमावत हा १७ वर्षीय अल्पवयीन दराेडेखाेर अाहे. दरम्यान, दरोडेखोरांना जामनेर न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. पत्रकार परिषदेच्यावेळी पाचोरा उपविभागाचे उपअधीक्षक केशव पातोंड, पोलिस निरीक्षक प्रकाश इंगळे उपस्थित होते. विकास पाटील यांना जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस नायक सचिन पाटील, सचिन चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल तुषार पाटील, वाहनचालक काळे यांनी सहकार्य केले. 


खादगावची बँक लुटण्याचा होता प्लॅन
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी, पहूर व खादगाव या जिल्हा बँकेच्या शाखांची रेकी करून खादगावची बँक लुटण्याचा प्लॅन या दरोडेखोरांनी केला होता. मात्र, तत्पूर्वीच हा प्रकार उघडकीस आला. घरी एक मोटारसायकल असताना दुसरी आली कशी? या संशयावरुन हा कट उघडकीस आला. ही मोटारसायकल चोरीची असल्याचे तपास अधिकारी विकास पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 


असा रचला कट : ६ महिन्यांपूर्वी रावेरातून पिस्तूल खरेदी 
सहा महिन्यांपूर्वी ज्ञानेश्वर श्यामलाल कुमावत या अल्पवयीन आरोपीने रावेर येथील एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल विकत घेतले होते. गुजरातमध्ये वडिलांसह फोटोग्राफी करणाऱ्या माेहाडी येथील अमोल गोकुळ पाटील याच्याशी ज्ञानेश्वरची गेल्या १५ दिवसांपूर्वीच ओळख झाली होती. तेथून गावाकडे परतलेल्या अमोल व ज्ञानेश्वर यांनी जळगाव जेलमध्ये ओळख झालेल्या सराईत गुन्हेगारांच्या मदतीतून जामनेर तालुक्यातील बँक लुटीचा कट आखला होता. 


मोहाडी (ता. जामनेर) येथील अमोल हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या वडिलांचा गुजरातमध्ये फोटो स्टुडिओ आहे. अमोल बऱ्याचवेळा गुजरातला वडिलांकडे जातो. तर हिंगणे बुद्रूक येथील ज्ञानेश्वर श्यामलाल कुमावत हा या प्रकरणातील दुसरा प्रमुख आरोपी आहे. केवळ १७ वर्ष वय असलेल्या ज्ञानेश्वरने सहा महिन्यांपूर्वीच रावेर येथील एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तूल विकत घेतले होते. पंधरा दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर हा गुजरातला गेला. तेथे अमोलला भेटला. तेव्हापासून त्याच्या स्टुडिओत काम करू लागला. आठ दिवसांपूर्वी अमोल व ज्ञानेश्वर दरोड्यासाठी गावाकडे आले होते. यासाठी जळगाव जेलमध्ये ओळख झालेले सराईत गुन्हेगार सलमान अहमद खान, सैयद सलमान सैयद कासीन व आरिफ जहांगीर देशमुख यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दरोड्यासाठी रेसर बाईकची आवश्यकता होती. त्यानुसार सलमान अहमद, कासीन व जहांगीर देशमुख यांनी आपल्या काही सहकाऱ्यांकडून जळगाव एमआयडीसीतून यामाहा एफ. झेड ही रेसर बाईक चोरून ज्ञानेश्वरला दिली. ज्ञानेश्वर ती घेऊन हिंगणे ब्रुदूक या आपल्या गावी आला. आधीच एक मोटारसायकल असताना नंबर प्लेट नसलेली महागडी बाईक कुठून व कशी आली? याबाबत गावात चर्चा झाली. यातून हा प्रकार पोलिस उपनिरीक्षक विशाल पाटील यांच्यापर्यंत पोहाेचला. त्यामुळे दरोड्याचा प्रयत्न फसला. 

बातम्या आणखी आहेत...