प्रलय / बिहार, आसामसह ५ राज्यांत ५० लाखांना पुराचा फटका; ब्रह्मपुत्रेचे पाणी आल्याने काझीरंग पार्क बुडाले

बिहारमध्ये ४, आसामात आणखी दोघांचा मृत्यू, पुराला राष्ट्रीय संकट घोषित करण्याची मागणी
 

वृत्तसंस्था

Jul 16,2019 09:58:00 AM IST

पाटणा/गुवाहाटी - सतत होत असलेल्या पावसामुळे बिहार, ईशान्येसह ५ राज्यांत पुराच्या तडाख्यात ५० लाख लोक सापडले आहेत. नेपाळमध्ये पाणी सोडल्याने बिहारमध्ये कोसी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. त्याशिवाय बागमती, लखनदेई, गंडक, बुढी गंडक आणि कमला बलानही धोक्याच्या पातळीवर आहेत. त्यामुळे मुझफ्फरपूर, सीतामढी, शिवहरसह मधुबनी, दरभंगा जिल्ह्यात पुराची स्थिती भयावर होत चालली आहे. त्यांच्यासह राज्यातील १० जिल्ह्यांचे १८ लाख लोक पुराशी झुंज देत आहेत. सोमवारी राज्यात आणखी चौघांचा मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या ३३ झाली आहे. आसाममध्ये ३३ पैकी २८ जिल्ह्यांतील २८ लाख लोक पुराशी झुंज देत आहेत.

काझीरंगा पार्क बुडाला, अरुणाचल-मिझोराममध्ये ४ मृत्यू

> सोमवारी आसाममध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला. राज्यात दोन दिवसांत एकूण १३ मृत्यू झाले.
> ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी घुसल्याने काझीरंगा नॅशनल पार्क ८०% बुडाला. तेथे ११ प्राण्यांचा मृत्यू झाला. पार्कमधून जाणाऱ्या एन-३७ वर ४ फूट पाणी आहे.
> आठवड्यापासून पाऊस, पुरामुळे वेस्ट गारो हिल्स जिल्ह्यातील सुमारे १.१४ लाख लोक संकटात आहेत.
> अरुणाचल, मिझोरामध्ये प्रत्येकी दोन लोकांचा मृत्यू झाला.
> भूस्खलनामुळे त्रिपुरा आणि मिझोरामचा देशाच्या उर्वरित भागाशी रेल्वे मार्गाने संपर्क तुटला.

देश: पुराला राष्ट्रीय संकट घोषित करण्याची मागणी

दिल्लीसह १६ राज्यांत सोमवारी पाऊस झाला. चंदीगडमध्ये दुसऱ्या दिवशी पाऊस झाला. दिल्लीत काँग्रेसच्या राज्यसभा खासदारांनी सोमवारी संसदेत धरणे देऊन केंद्राने आसामच्या पुराला ‘राष्ट्रीय समस्या’ घोषित करावे, अशी मागणी केली.

विदेश: नेपाळने आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मदत मागितली

> नेपाळमध्ये ७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या ६५ झाली आहे. नेपाळने आंतरराष्ट्रीय संस्थांकडे पूर आणि आजारांना तोंड देण्यासाठी मदत मागितली आहे.
> बांगलादेशात पुरामुळे २०० गावांना फटका बसला. १५ लाख बेघर झाले.

X
COMMENT