आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसहभागातून विकास : दिल्ली आयआयटीने दत्तक घेतली पाच गावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जिल्ह्यातील पाच गावे आदर्श ग्राम करण्यासाठी दत्तक घेतली आहेत. गेवराई कुबेर, करोडी साजापूर, चोंदपूर, मावसाळा, चिंचोली बुद्रुक अशी या गावांची नावे आहेत. लोकसहभागातून या गावांत संपूर्ण सुविधा देऊन शाश्वत विकास करण्याचा संकल्प विद्यापीठाने केला आहे. विशेष म्हणजे, दिल्ली येथील आयआयटीनेही याच गावांची निवड केली असून त्यांनीही निधी देऊन हीच पाच गावे दत्तक घेतली आहेत. 


'युनिव्हर्सिटी फॉर सोसायटी' हे ब्रीद स्वीकारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गत शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील पाच गावे दत्तक घेतली आहेत. उन्नत भारत अभियानांतर्गत पुढील पाच वर्षांत या गावांचा कायापालट करण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयांनाही सामावून घेतले आहे. दिल्ली आयआयटीनेही (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) सरकारमार्फत पाच गावे दत्तक घेण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी पवई आयआयटीमार्फत प्रस्ताव मागवले होते. विद्यापीठाने या पाच गावांचे प्रस्ताव पाठवल्यानंतर दिल्ली आयआयटीने ते मंजूर केले. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विद्यापीठासोबत तसा पत्रव्यवहार झाला आहे. १९ डिसेंबर २०१७ रोजी विद्यापीठ आणि आयआयटीने सामंजस्य करारावर सह्या केल्या. आता उन्नत भारत अभियानच्या कामांना प्रारंभ केला जाणार आहे. सर्वात आधी गावांची गरज ओळखण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. त्यासाठी १ लाख ७५ हजारांचा निधी विद्यापीठाच्या खात्यात जमा झाला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या मार्गदर्शनात रासेयोचे प्रभारी संचालक डॉ. टी. आर. पाटील या गावांच्या विकासासाठी पाठपुरावा करत आहेत. 


लोकसहभागाने केली पाचही गावांंमध्ये क्रांती 
गेवराई कुबेर :
पाचपैकी सर्वाधिक कामे औरंगाबाद तालुक्यातील या गावांत झाली. विद्यापीठाशी संलग्नित ७ महाविद्यालयांतील ४२५ विद्यार्थ्यांनी या गावांत विविध शिबिरांच्या माध्यमातून जनजागृती केली. गावांतील १६० जणांचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले. नियमित शिबिरातून ४२ जणांना रक्तदान करण्याची सवय लावली. १४० रोपांची लागवड, अत्यंत खराब झालेला ४ किमीचा रस्ता श्रमदानातून तयार केला आहे. बंधाऱ्याची निर्मिती करून अडीच लाख लिटर पाणी अडवले आहे. 


करोडी, साजापूर 
औरंगाबाद तालुक्यातील या गावात विवेकानंद महाविद्यालय आणि राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयाने कामे केली. दोन्ही महाविद्यालयांतील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी या गावांत स्वच्छता आणि शिक्षणाविषयी जनजागरण केले आहे. 


चांदापूर 
सिल्लोड तालुक्यातील या गावासाठी इंद्रराज महाविद्यालयाच्या १०० विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. जलसंधारण, २०० ग्रामस्थांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, अशाच शिबिरात ३९ जणांनी रक्तदान केले आहे. पाणी फाउंडेशनमार्फत विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. 


मावसाळा 
खुलताबाद तालुक्यातील या गावात दोन हजार पेक्षा अधिक झाडे लावली आहेत. मंदिरे आणि संपूर्ण गावांत स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. सिडको एन-३ येथील शिवछत्रपती महाविद्यालयाने या गावावर आठ लाख रूपये खर्च केले आहेत. ११० स्वयंसेवकांचे या गावांवर सतत देखरेख आहे. 


चिंचोली बुद्रुक 
फुलंब्री तालुक्यातील या गावासाठी विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय आणि एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयातील ३५० विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेत आहेत. येथेही कृषिविकास, ग्रामस्वच्छता, जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करण्यात आली आहेत. 


भविष्यात कामांवर असेल फोकस 
पाचही गावांचे सर्वेक्षण करून निष्कर्षानंतर विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. प्रामुख्याने ग्राम स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, सौरऊर्जा, सिंचन, कृषि विकास आणि कृषिपूरक व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी तंत्र विकसित करणे आदी कामांवर भर दिला जाणार आहे.

- डॉ. टी. आर. पाटील, प्रभारी संचालक, रासेयो 

बातम्या आणखी आहेत...