Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Five-year-old girl was injured in the attack of 10 dogs

पाचवर्षीय मुलीस 10 कुत्र्यांनी घेरून तोडले लचके; हात, पाय, पाठीवर 15 जखमा, संतप्त जमावाने लाठ्याकाठ्यांनी 8 कुत्र्यांना टाकले मारून 

प्रतिनिधी | Update - Feb 10, 2019, 11:26 AM IST

रिक्षाचालकाने सोडवले चवताळलेल्या कुत्र्यांच्या तावडीतून, अंगावर शहारे आणणारी काबरानगरमधील घटना 

 • Five-year-old girl was injured in the attack of 10 dogs

  औरंगाबाद- सूतगिरणी परिसरातील काबरानगरमध्ये शनिवारी दुचाकी शिकणाऱ्या आईच्या पाठीमागे पळणाऱ्या एका पाच वर्षांच्या आकांक्षा नामक चिमुकलीस दहा कुत्र्यांनी घेरून तिच्या हात, पाय, पाठीचे लचके तोडले. अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरलेल्या चिमुकलीला चवताळलेल्या कुत्र्यांनी फरपटत नेले. तिच्या हातापायाचे लचके तोडत असताना तिची आई व एका रिक्षाचालकाने आरडाओरड केली. रिक्षाचालकाने तत्काळ आकांक्षाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून बाजूला नेले. आरडाओरडीमुळे आजूबाजूच्या नागरिकांचे लक्ष जाताच संतप्त जमावाने दगडधोंडे, लाठ्या काठ्यांनी चवताळलेल्या आठ कुत्र्यांना जागीच ठार मारले. जखमी आकांक्षाला ताबडतोब घाटी रुग्णालयात नेण्यात आले. तिच्यावर उपचार करून रात्री आठ वाजता तिला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले.

  अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे औरंगाबादेतील मोकाट कुत्र्यांच्या दहशतीची कल्पना येऊ शकते. दरम्यान, घटनेनंतर महापालिकेच्या पथकाने ६ कुत्र्यांना पकडून नेले. रामकृष्णनगर वॉर्ड क्रमांक ९७ मधील सूतगिरणीच्या बाजूने काबरानगरमध्ये जाणाऱ्या रस्त्यावर चिकन, मटणाची दुकाने आहेत. येथे एमएसईबीचे कार्यालय असून मोकळी जागाही आहे. तेथे मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. त्यामुळे या ठिकाणी तब्बल २० ते २५ कुत्रे दररोज असतात. शनिवारी दुपारी इंदिरानगर भागातील आकांक्षाची आई कविता सागर शेजवळ या विभागीय क्रीडा संकुलाच्या मागील बाजूस काबरानगर-इंदिरानगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर दुचाकी शिकत होत्या. आई गाडी शिकत असताना चिमुकली आकांक्षाही मैदानावर आईच्या मागे धावत होती. मैदानावरील मोकाट कुत्र्यांच्या टोळीने पळणाऱ्या आकांक्षाचा पाठलाग करून क्षणार्धात तिच्यावर हल्ला केला. आठ-दहा कुत्रे एकदम तिच्या अंगावर आले. काही क्षणांतच कुत्र्यांनी एखाद्या सावजाप्रमाणे तिला चावा घेण्यास सुरुवात केली. चिमुकली जोरजोरात ओरडत असताना कुत्रे तिला फरपटत ओढत होते. तब्बल १५ ठिकाणचा कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे मुलीच्या पाठीवर कुत्र्यांचे दात, नखांचे ओरखडे दिसत असून हात, दोन्ही खांदे आणि पायावर मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचे दात घुसलेेले आहेत. हा प्रकार बाजूला अगोदर तिथे उभ्या असलेल्या रिक्षाचालकाला दिसला. आरडाओरड करून त्याने कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मुलीच्या आईसह आसपासच्या सर्वच नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना हाकलून लावले. त्याच रिक्षात मुलीला घाटीत उपचारासाठी हलवले. रात्री आठ वाजेपर्यंत मुलीला घाटीत ठेवण्यात आले होते. मुलीची प्रकृती चांगली असल्याने घाटीतून घरी पाठवून दिले, असे तिचे शेजारी विजय गालीव यांनी सांगितले. या घटनेमुळे पूर्ण परिसरात कुत्र्यांची दहशत पसरली होती. स्थानिकांनी तत्काळ मनपाची गाडी बोलावली होती. मनपाच्या गाडीने सहा कुत्रे पकडून नेले.

  आणखी ६० मोकाट कुत्रे
  मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास घेऊन अनेकांनी मनपाकडे तक्रारी केल्या होत्या. वारंवार सांगूनही त्याकडे मनपाने लक्ष दिले नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येसह त्रासातही वाढ होत होती. शनिवारच्या प्रकारामुळे पूर्ण परिसरात कुत्र्यांची दहशत निर्माण झाली होती. घटनेनंतर मनपाची गाडी आल्याने त्यांनीही सहा कुत्रे पकडून नेले. अजूनही येथे ६० पेक्षा जास्त कुत्रे असल्याचे रहिवाशांनी सांगितले.

  पाळीव कुत्रे असल्यास होऊ शकला असता गुन्हा दाखल
  कायद्यानुसार पाळीव कुत्र्याने चावा घेतला असता तर कुत्रामालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करता येऊ शकतो. शनिवारच्या घटनेत सर्व मोकाट कुत्रे असल्याने व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. मात्र मुलीच्या कुटुंबीयांकडून मनपाविरोधात गुन्हा दाखल करता येऊ शकतो.

  या सर्व प्रकारास महानगरपालिकाच जबाबदार
  येथील नागरिकांनी मनपाकडे आणि नगरसेवकाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याची कोणतीच दखल मनपाने घेतली नाही. कधीतरी गाडी यायची, एक-दोन कुत्रे घेऊन निघून जायची. त्या वेळी सर्व कुत्र्यांना पकडले असते तर आजचा प्रकार घडला नसता. या सर्व प्रकारास मनपाच जबाबदार आहे. - सागर शेजवळ, मुलीचे वडील

Trending