आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅशबॅक : ‘एक तरी मंत्री मी खाईनच’ म्हणणारे जांबुवंतराव राहिले ‘उपाशी’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भवीर म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे हे विदर्भातील अतिशय आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध होते. कट्टर विदर्भवादी म्हणूनही त्यांची ओळख हाेती. महाराष्ट्रातील अनेक नेते राज्याचे मुख्यमंत्री वा मंत्री होऊनही ते विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या दृष्टीने काहीच करीत नाहीत, अशी संतप्त भावना ते वारंवार व्यक्त करायचे. संताप व्यक्त करताना ते भाषेची फारशी तमा बाळगत नव्हते. सत्तरच्या दशकात विदर्भात धोटे यांची प्रचंड लोकप्रियता होती. एखाद्या आंदोलनात ते रस्त्यावर आले की हजारोंचा जनसमुदाय त्यांच्या पाठीशी असायचा, हे जणू ठरलेलेच असायचे. १९७२ मध्ये नागपूरचे खासदार असताना धोटे यांनी एक विचित्र घोषणा केली. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्यावेळी धोटे यांनी विदर्भातील तीन मंत्र्यांच्या विरोधात लढण्याचा निर्णय नागपुरात जाहीर केला. हा निर्णय जाहीर करताना धोटे यांनी त्यांना साजेशा आक्रमक शैलीत चक्क ‘एक तरी मंत्री खाईनच..’ अशी घोषणा करून टाकली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या विरोधात पुसद मतदारसंघात, अर्थमंत्री नरेंद्र तिडके यांच्याविरुद्ध सावनेर तर कामगार मंत्री बॅरिस्टर वानखेडे यांच्या विरोधात कळमेश्वर मतदारसंघात त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या या घोषणेने काँग्रेस नेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले होते.
 
निवडणुकीचा प्रचार सुरू झाला. धोटे यांच्या लोकप्रियतेच्या भीतीपोटी नाईक, तिडके आणि वानखेडे आपल्या मतदारसंघातच अडकून पडले. प्रत्यक्षात धोटेंनी या मतदारसंघात फारसा प्रचारही केला नाही. धोटे यांच्या घोषणेबद्दल काही पत्रकारांनी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना विचारले असता ‘धोटे मंत्री खाणार म्हणाले आहेत, मुख्यमंत्री नाही. पुसदमध्ये त्यांचे डिपॉझिट जप्त होईल..” असे मिश्कील उत्तर नाईक यांनी दिले हाेते. झालेही अगदी तसेच. पुसद मतदारसंघात तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांविराेधात जांबुवंतरावांना डिपॉझिट गमवावे लागले. मात्र, सावनेर आणि कळमेश्वर मतदारसंघात ते कमी फरकाने पराभूत झाले. ‘मंत्री खाण्याची’ घोषणा त्यांना पूर्ण करता आली नाही. नंतर १९७७ मध्ये आणीबाणीनंतर धोटे यांनी काँग्रेसच्या जास्तीत जास्त उमेदवारांना पाडण्यासाठी वर्धा आणि नागपूर लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. संपूर्ण देशात काँग्रेसची वाताहत झाली. काँग्रेसचे नेतृत्वही पराभूत झाले असताना विदर्भाने काँग्रेसला साथ दिली. सर्व ११ मतदारसंघ काँग्रेसने जिंकले होते. जांबुवंतराव दोन्ही ठिकाणांहून पराभूत झाले होते.
 
 

बातम्या आणखी आहेत...