Flashback / निवडणूक फ्लॅशबॅक : ऐंशीच्या दशकामध्ये पाथर्डीने अनुभवली सर्वपक्षीय नेत्यांची एकी

सुपरवायझिंग युनियनच्या माध्यमातून विकासासाठी केले एकीने काम

अविनाश मंत्री

Sep 07,2019 08:50:00 AM IST

पाथर्डी (जि. नगर) - आज केवळ विराेधी पक्षाचे नेते एकमेकाला पाण्यात पाहतात. विराेधाला विराेध म्हणून अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका-टिप्पणी हाेते. त्याला दुसऱ्या बाजूने प्रत्त्युत्तरही त्याच पातळीवर दिले जाते. यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आज राजकारणाचा स्तर खालावला आहे, अशी ओरड होते. मात्र, एेंशीच्या दशकात याच महाराष्ट्रातील पाथर्डी तालुक्याने विकासासाठी सर्वपक्षीय एकी अनुभवली, असे आज काेणाला सांगितले तर विश्वास बसणार नाही.


त्या काळी पाथर्डी तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर देखरेख ठेवणारी ‘सुपरवायझिंग युनियन’ म्हणजे देखरेख संघ होता. यात सर्वपक्षीय नेते १९७२ ते १९८० पर्यंत हातात हात घालून काम करत. वैयक्तिक मतभेदांचा लवलेशही या संस्थेच्या कामात नसे. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमही सर्वजण एकत्र बसून करत. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. पाथर्डी तालुका देखरेख संघात विविध नेत्यांनी दिलेले योगदान मैलाचा दगड ठरले आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे, माजी आमदार गणपतराव म्हस्के, सुपरवायझिंग युनियनचे अध्यक्ष बबनराव ढाकणे, माजी आमदार बाबूजी आव्हाड, दादा पाटील राजळे, प्रसन्नकुमार शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक त्र्यंबकराव गर्जे, माजी आमदार माधवराव निऱ्हाळी अशा सर्वपक्षीय नेत्यांनी तालुक्याच्या राजकारणाला गेल्या पन्नास वर्षांत दिशा दिली. आमदार कै. गणपतराव म्हस्के, माजी मंत्री बबनराव ढाकणे, कै. बाळासाहेब भारदे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव आठरे, कै. बाबूजी आव्हाड, कै.दादा पाटील राजळे, कै. प्रसन्नकुमार शेवाळे, कै, ज्ञानोबा तुपे, कै. त्र्यं बकराव गर्जे, कै. माजी आमदार माधवराव निऱ्हाळी या सर्वपक्षीय नेत्यांचे हे दुर्मिळ छायाचित्र नव्या पिढीसाठी चांगला संदेश देणारे ठरावे.

X
COMMENT