आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाताळ, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर विमानांच्या तिकीटदरात तिप्पट वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी शहराबाहेर जाण्याचा बेत औरंगाबादकरांनी आखला आहे. यामुळेच ३ कंपन्यांच्या हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीच्या पाच विमानांतील ८० टक्क्यांहून जास्त तिकिटे आधीच बुक झाली आहेत. ७ जानेवारीपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. काही चाणाक्ष प्रवाशांनी २ ते ३ महिने आधीच बुकिंग केल्याने सवलतीच्या दरात तिकिटे मिळाली. उर्वरित २० टक्के तिकिटांसाठी चढाओढ सुरू आहे. परंतु, नियमित तिकिटापेक्षा तिप्पट अधिक पैसे मोजावे लागत आहेत. 

 

शहरवासीयांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्यांचे वेध लागले आहेत. शनिवारी-रविवारच्या सुटीनंतर दोन दिवसांत नाताळची सुटी आहे. परत तीन दिवसांत शनिवार-रविवार व ३१ रोजी नवीन वर्षाचा जल्लोष राहणार आहे. कॉर्पाेरेट कंपन्यांत नाताळ ते नवीन वर्ष सुट्या आहेत. शााळांनाही सुट्या आहेत. त्या साजऱ्या करण्यासाठी शहरवासी गोवा, राजस्थान, अंदमान निकोबार, पुदुच्चरी, मनाली, तर काही परेदशात जाण्यासाठी सज्ज आहेत. 

 

मंत्र्यांनी तिकिटासाठी मोजली ७ पट रक्कम 

गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांना मुंबईच्या एअर इंडियाच्या गुरुवारी संध्याकाळच्या विमानासाठी ७ पट पैसे मोजावे लागले. ते एका कार्यक्रमासाठी आले व लगेच मुंबईला परतले. विमान ९८ टक्क्यांहून अधिक बुक होते. त्यांना २९,७०० रुपयांत तिकीट घ्यावे लागले. विमानात या दरातील ३-४ तिकिटेच असतात, असे अजय भाेळे यांनी सांगितले. 

 

औरंगाबाद-मुंबई (जेट एअरवेज) 
औरंगाबादहून जेट एअरवेजचे मुंबईला सकाळ-संध्याकाळ एक विमान जाते. याच्या तिकिटाचा बेस रेट ४००० रुपये आहे. पण सध्या ९० टक्के तिकिटे विकली गेल्याने इकॉनॉमी क्लासमधील तिकीट १४०००, तर बिझिनेस क्लासमधील १८००० रुपयांत मिळत असल्याचे जेटचे एरिया मॅनेजर सईद अहमद जलील यांनी सांगितले. 

 

एप्रिल-मेची तिकिटे आता स्वस्तात :
ऐनवेळी प्रवास केला तर तिकिटासाठी जास्त पैसे लागतात. दौरा नियोजित असेल तर बेस रेटपेक्षाही कमी दरांत तिकीट मिळते. जेटचे एप्रिल-मे महिन्याचे मुंबईचे तिकीट आता काढले तर सकाळच्या फ्लाइटसाठी ३४००, तर संध्याकाळसाठी २९०० रुपये लागतील. प्रत्येक २० सीटच्या रांगांनंतर तिकिट दरात ५०० ते ६०० रुपये वाढ होते. 

 

औरंगाबाद-हैदराबाद (ट्रूजेट) 
ट्रूजेटच्या हैदराबादच्या विमानाचे तिकीट सरासरी ५००० रुपये आहे. याचे दर १३९०० रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे ट्रूजेटच्या स्टेशन मॅनेजर प्रतिमा थोटे यांनी सांगितले. 

 

औरंगाबाद-दिल्ली (एअर इंडिया) 
संध्याकाळी एअर इंडियाचे एक विमान मुंबईला, तर दुसरे दिल्लीला जाते. दोन्ही विमानांच्या ८० टक्के तिकिटांचे बुकिंग झाले आहे. यामुळे ४००० रुपयांत मिळणारे मंुबईचे तिकीट १२०००, तर दिल्लीचे ७ हजारांचे तिकीट १८००० रुपयांपर्यंत विकले जात असल्याचे एअरपाेर्ट मॅनेजर अजय भोळे म्हणाले. 

 

रेल्वे फुल्ल : तिकीट मिळाले तरी कन्फर्म होणे अवघड 
आयआरसीटीच्या वेबसाइटनुसार सचखंंड एक्स्प्रेसची दिल्लीच्या प्रवासासाठीची स्लिपर क्लासमधीच सर्व तिकिटे विकली गेली आहेत. १२ जानेवारीपर्यंत यावर सीएनएफ प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रवासाच्या दिवशीच्या स्थितीवर अवलंबून बुकिंग असे दाखवत आहे. दिल्लीसह हैदराबाद आणि मुंबईच्या तिकिटांचीही १०० टक्के बुकिंग आहे. तिकीट मिळाले तरी कन्फर्म होण्याची शक्यता नाही. प्रवाशांनी गर्दीत प्रवास करणे टाळावे, असे रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...