Maharashtra Special / पूरपरिस्थितीमुळे विद्यार्थ्यांवर परिणाम, आयटीआय प्रवेश वेळापत्रकात झाला बदल

मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2019 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे

प्रतिनिधी

Aug 14,2019 05:18:00 PM IST

सांगली- राज्यातील विविध भागामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. आयटीआय प्रवेश वेळापत्रकात बदल झालेला आहे. अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगलीचे प्राचार्य यांनी दिली.आयटीआय प्रवेशाचे सुधारीत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.


चौथ्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2019 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. विहीत मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती करणे व प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्जाची छापिल प्रत घेणे, अर्ज स्विकृती केंद्रात (राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत) मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज शुल्क भरून अर्ज निश्चित करण्याचा अंतिम दिनांक 16 ऑगस्ट 2019 सांयकाळी 5 वाजेपर्यंत आहे. समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी राज्यस्तरावरील एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे व उमेदवारांना एसएमएस व्दारे कळविण्याचा दिनांक 17 ऑगस्ट 2019 सायंकाळी 5 असा आहे.


राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील चौथ्या प्रवेश फेरीच्या समाप्तीनंतर रिक्त राहिलेल जागा जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीव्दारे भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. सदर जिल्हास्तरीय समुपदेशन प्रवेश फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचा दिनांक 17 ऑगस्ट 2019 सायंकाळी 5 असा आहे. औद्यागिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशोच्छुक व नोंदणीकृत संबंधित जिल्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यक्तीश: हजर राहून समुपदेशन फेरीकरीता हजेरी नोंदविण्याचा दिनांक 19 ऑगस्ट 2019 सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत. हजेरी नोंदविलेल्या उमेदवारांमधून संबंधित जिल्हास्तरावर गुणवत्ता यादी तयार करून संबंधित जिल्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रकाशित करण्याचा दिनांक 19 ऑगस्ट 2019 सायंकाळी 5 नंतर.


फक्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या जागा संबंधित शासकीय आद्योगिक प्रशिक्षण संस्थांना संस्थास्तरीय समुपदेशन फेरीव्दारे भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. सदर संस्थास्तरीय समुपदेशन फेरीकरिता उपलब्ध जागांचा तपशील दिनांक 24 ऑगस्ट 2019 रोजी सायंकाळी 5 वाजता संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. याबाबतच्या अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली येथे संपर्क साधावा.

X
COMMENT