आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपच्या खोट्या आरोपांत 70 वर्षांनंतर चौघेही ठरले निर्दोष; आता एकही नाही जिवंत; कोर्टानेही दिली घोर अन्याय झाल्याची कबुली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेत 70 वर्षांपूर्वी बलात्कार प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या 4 आफ्रिकन-अमेरिकन आरोपींची नुकतीच निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ज्या बलात्काराच्या आरोपात 4 जणांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी 70 वर्षे नरकयातना भोगल्या तो बलात्कार प्रत्यक्षात झालाच नव्हता. कोर्ट आणि गव्हर्नरने त्यांना न्याय देण्यात इतका विलंब लावला की आता त्यापैकी एकही जण जिवंत नाही. 1949 मध्ये झालेल्या या कथित बलात्कार प्रकरणाने पुन्हा जगासमोर अमेरिकेचा वर्णद्वेषी चेहरा समोर आणला आहे. कसे हे आरोप मीडिया ट्रायल आणि वर्णद्वेषाचा बळी ठरले त्याची संपूर्ण हकीगत कोर्टात मांडण्यात आली आहे.


17 वर्षीय तरुणीने लावला होता आरोप
1949 मध्ये जेव्हा अमेरिका वर्णद्वेष आणि युद्धातून सावरण्याचा प्रयत्न करत होता, त्याचवेळी कथित बलात्काराचे सर्वात कुप्रसिद्ध प्रकरण समोर आले. त्याच वर्षी अमेरिकेतील ग्रोव्हलंड येथे राहणाऱ्या एका 17 वर्षांच्या मुलीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे आरोप लावले होते. कार खराब झाल्यानंतर मदत मागितली तेव्हा चार्ल्स ग्रीनली, वॉल्टर आयरविन, सॅम्युएल शेफर्ड आणि अर्नेस्ट थॉमस या चौघांनी आपल्यावर बलात्कार केला अशी तक्रार तिने दिली. हे चारही कथित आरोपी अश्वेत होते. तर आरोप लावणारी तरुणी श्वेत होते. आधीच वर्णद्वेषाच्या आगीत होरपळणाऱ्या स्थानिकांना जणू मुद्दाच मिळाला होता. पोलिसांनी या प्रकरणात चार्ल्स ग्रीनली, वॉल्टर आयरविन आणि सॅम्युएल शेफर्ड या तिघांना अटक केली. तर चौथा आरोपी अर्नेस्ट थॉमस फरार झाला होता.


फरार अर्नेस्टवर झाडल्या 400 गोळ्या, आरोपींच्या घरांना लावली आग
फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसॅन्टिस यांनीच आपल्या अधिकारांचा वापर करून चौघांना निर्दोष ठरवण्यासाठी योगदान दिले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, 1949 मध्ये बलात्काराचे आरोप लागल्यानंतर पोलिसांनी चौघांपैकी 3 जणांना अटक केली. तर चौथा फरार झालेला अर्नेस्ट याचा शोध घेण्यासाठी तब्बल 1000 सशस्त्र जवान कामावर लावले. त्याच दरम्यान अर्नेस्ट एका गावात झाडाखाली झोपलेला दिसून आला. त्या हजार पोलिस अधिकाऱ्यांनी अर्नेस्टला घेरून जवळपास 400 गोळ्या झाडल्या. एका माणसावर 400 गोळ्या? हा कुठला न्याय? असा प्रश्न त्यांनी मांडला. 'ग्रोव्हलंड फोर' असे त्या चौघांना नाव देण्यात आले होते. त्यावेळी छापिल माध्यमांनी त्यांची इतकी कुप्रसिद्धी केली की त्यांच्या विरोधात गोऱ्या समुदायांनी हिंसक निदर्शने केली. सर्वच कथित आरोपींच्या घरांना आग लावण्यात आली. मोठ्या प्रमाणात दंगल सुद्धा भडकली होती.


पुराव्यांवर केले दुर्लक्ष
माध्यम आणि आंधळ्या झालेल्या हिंसक जमावाने या सर्वांना आधीच दोषी मानले होते. अशात न्यायालयाकडून काही वेगळा निकाल येण्याची कुणालाही अपेक्षा नव्हती. त्याच वर्षी कोर्टाने तिघांनाही बलात्काराच्या प्रकरणात दोषी मानले आणि त्यापैकी एक अल्पवयीन चार्ल्सला जन्मठेप तर उर्वरीत दोघे वॉल्टर आणि सॅम्युएल यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला. विशेष म्हणजे, या तिघांना शिक्षा देणाऱ्या खंडपीठातील सर्वच न्यायाधीश गोरे होते. त्यांनी पीडितेचा मेडिकल रिपोर्ट सुद्धा पाहिला नाही. त्यामध्ये डॉक्टरांनी सांगितले होते, की कदाचित पीडितेवर बलात्कार झाला नसावा. तरीही कोर्टाने तो पुरावा पुरेसा मानला नाही.


फेरविचार याचिकेवर सुनावणी होण्यापूर्वीच दोघांचा एनकाउंटर
1951 मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयावर प्रथमच एका अश्वेत न्यायाधीशाची निवड झाली होती. त्यांनी या कथित आरोपींच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु, ऐनवेळी लेक काउंटीचे पोलिस प्रमुख विलिस मॅककॉल यांनी वॉल्टर आणि सॅम्युअल यांचा एनकाउंटर केला. स्थानिक पोलिस स्टेशनमधून जेलमध्ये नेले जात असताना आत्मरक्षणासाठी दोघांवर गोळ्या झाडल्या असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. यातील सॅम्युएलचा मृत्यू झाला. तर गळ्यावर गोळी लागल्यानंतरही वॉल्टर वाचला. त्यावेळी एफबीआयच्या तपास अधिकाऱ्याने खुलासा केला होता की पोलिस मुद्दाम या आरोपींच्या विरोधात पुरावे स्वतः बनवत आहेत. तरीही वॉल्टरला पुन्हा शिक्षा झाली. 1968 मध्ये वॉल्टरला पॅरोल मिळाला. पण, दुसऱ्याच वर्षी त्याचा मृतदेह एका कारमध्ये सापडला. यासोबतच 2012 मध्ये जन्मठेप भोगत असलेल्या चार्ल्सचा सुद्धा खून करण्यात आला. प्रत्यक्षात हे चौघे आरोपी नसून खरे पीडित होते. असे म्हणत कोर्ट आणि गव्हर्नरने त्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे. पण, त्यांच्यावर खोटे आरोप लावून फसवणाऱ्या गोऱ्यांवर कुठलेही आरोप लागले नाहीत.

 

बातम्या आणखी आहेत...