आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फोकस ऑन..!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

1968 ची गोष्ट. मी इयत्ता आठवीमध्ये निवासी शाळेत शिकत होतो. ग्रामीण भागातून आल्याने स्वभाव लाजराबुजरा होता. शाळेत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, हे विद्यार्थिदशेपासूनच आतापर्यंत ऐकत आलो आहे. वादविवाद, वक्तृत्व, नाट्य, संगीत, शिष्यवृत्ती, मैदानी खेळ, गायन-वादन, अशा विविध अंगांनी खरे तर विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलत जाते, परंतु त्याकाळी व आजही अपवाद वगळता किती शाळांतून विद्यार्थ्यांना अशा गोष्टी शिकावयास मिळतात, हा संशोधनाचा विषय ठरावा. ग्रामीण भागातील विद्यार्थी अशा गोष्टीपासून कोसो दूर असतात. आठवीत असताना मी खो-खो खेळात भाग घेण्याचे ठरवले.

शाळा सुटल्यावर मैदानावर सरावासाठी व मार्गदर्शनासाठी हजेरी लावू लागलो. या खेळाचे तंत्रही ब-यापैकी आत्मसात केले. सडपातळ व वजनाने कमी असल्यामुळे चपळही होतो, परंतु खो खो पटू होण्याचे माझ्या नशिबी नसावे. एके दिवशी धावताना मैदानावर सपाटून आपटलो. हातापायाला मार लागला. मैदानावर जाण्याची इच्छा होईना. धावताना दमछाक होऊ लागली. इतर खेळात भाग घेण्यासारखी माझी शरीरयष्टी नव्हती. मी ज्युनियर डिव्हिजन एनसीसीमध्ये भाग घेतला. पायात घालायला बूट-मोजे मिळाले. खाकी कपड्याचे आकर्षणही वाटू लागले. राष्‍ट्रीय पातळीवर नवनवीन मित्रांच्या संगतीत व्यक्तिमत्त्वाला वेगवेगळे पैलू प्राप्त झाले. झोकून दिल्यामुळे जीव ओतल्यामुळे पुढे ऑफिसर म्हणून काम पाहू लागलो. नवी दिल्लीत परेडसाठी आणि यूथ एक्स्चेंज प्रोग्रॅमसाठीही निवड झाली. सेनाधिका-यांच्या सहवासात हिंदी, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवता आले. मॅनर्स, एटिकेट्स, ऑफिसर लाइक क्वालिटीज् शिकावयास मिळाल्या. बीड जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यातून आलेला एक गावंढळ केवळ एनसीसी या उपक्रमावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आंतरराष्‍ट्रीय पातळीवर धडक मारून चांगल्या यशाचा मानकरी झालो. म्हणून तर म्हणावे वाटते, फोकस ऑन...!