आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड - कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीने केवळ स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या गहू-तांदळाचा काळाबाजार केला नाही तर या कंपनीने सर्वसामान्य नागरिकांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केली. स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणारा तांदूळच ब्रँडेड म्हणून लोकांच्या माथी मारला. त्यामुळे नागरिकही गंडवले गेले.
कृष्णूर येथे इंडिया मेगा कंपनीचे जाळे ५८ एकरवर पसरले आहे. या कंपनीत गव्हापासून पीठ, रवा, मैदा बनवणारे युनिट आहेत. राइस मिल, तांदूळ पॉलिश करणारी मिल, बिस्कीट तयार करणे, सरकीपासून तेल बनवणे, पशुखाद्य तयार करणे असे विविध युनिट कार्यरत आहेत. या कंपन्यांनी केंद्र सरकारकडून विविध योजनांखाली सबसिडी घेतली आहे. परंतु पोलिसांनी टाकलेल्या धाडीनंतर काही युनिट शेतकऱ्याकडून माल खरेदी न करता केवळ शासकीय गोदामातील अन्नधान्यावरच सुरू असल्याचे दिसून आले. कंपनीत आढळलेल्या जवळपास सहा हजार गव्हाच्या पोत्यावर शासकीय वितरण व्यवस्थेचा शिक्का असल्याचे आढळून आले.
पोतीही जप्त केले : मोठ्या प्रमाणात शासकीय धान्यच कच्चा माल म्हणून वापरणाऱ्या इंडिया मेगा कंपनीला काही कंपन्याही मालाचा पुरवठा करीत असल्याचे पोलिस तपासात आढळून आले. त्यात कपिल ट्रेडिंग कंपनी, विजयकुमार ट्रेडिंग कंपनी, ओम सत्यसाई ट्रेडर्स, श्री लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी, सुमीत ट्रेडर्स, बालाजी ट्रेडर्स, लंबोदर ट्रेडिंग कंपनी या कंपन्यांनी माल पुरवठा केल्याचे आढळले. त्यांच्या माल खरेदीचे रजिस्टर व पावत्याही आढळून आल्या. स्वस्त धान्य दुकानदाराकडे वाटप करून शिल्लक राहिलेला माल ट्रेडिंग कंपन्यांना विकण्यात येतो व ट्रेडिंग कंपन्या हा माल कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीला विकतात असे पोलिस तपासात आढळून आले. हा सर्व माल खाली झाल्यानंतर रिकामा बारदाना तुलसीदास बारदाने यांना विक्री होतो. पोलिसांनी हैदराबाद रोडवरील चंदासिंघ कॉर्नरजवळ तुलसीदास देवसी अँड कंपनी बारदानवाले यांच्याकडे पाहणी केली असता त्या बारदान्यात एफसीआय, भारतीय खाद्य निगम, पंजाब सरकार, मध्य प्रदेश सरकार असे शिक्के असलेली पोतीही आढळून आली. ही पोती इंडिया मेगा अॅग्रो अनाज कंपनीतून आणल्याचे कंपनीचे जाधवजी देवसी भानुशाली यांनी पोलिसांना सांगितले. जो तांदूळ स्वस्त धान्य दुकानात अडीच-तीन रुपये किलोने विक्री होतो तोच तांदूळ खुल्या बाजारात ५० रुपयांहून अधिक प्रतिकिलो दराने नागरिकाच्या माथी मारला जातो. एकट्या जुलै महिन्यात २५ ट्रक माल कंपनीत पोहोचल्याचे पोलिस तपासात आढळून आले.
असा केला स्वस्त तांदूळ ब्रँडेड
पोलिस तपासात कंपनीच्या आवारात राइस मिलसाठी लागणारी साळ (धान) चार वर्षांपूर्वी खरेदी केल्याचे आढळले. परंतु राइस मिल सुरू नसल्याचे आढळले. त्याला लागूनच तांदूळ पॉलिश करणारी पॉलिशिंग इंडस्ट्री आहे. विशेष म्हणजे ही पॉलिशिंग इंडस्ट्री फक्त रात्रीच सुरू असते. रात्रीच्या वेळी स्वस्त धान्य दुकानातून वितरित होणारा तांदूळ ट्रकने कंपनीत आणला जातो. ती पोती खाली करून सरळ पॉलिशिंग मशीनमध्ये टाकले जातात. स्वस्त धान्य दुकानातला जाड तांदूळ बारीक करून त्याला पॉलिश केले जाते. नव्या पॉलिश केलेल्या तांदळाचे १० आणि २० किलोचे पॅक करून ते खुल्या बाजारात एव्हर फ्रेश प्रीमियम राइस या ब्रँडखाली विक्री केले जातात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.