Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Footcar killed by truck crashes; Lotgadi moved to the hospital

अतिक्रमणाचा दुसरा बळी; 6 नोव्हेंबरच्या घटनेची 6 डिसेंबरला पुनरावृत्ती

प्रतिनिधी | Update - Dec 07, 2018, 09:49 AM IST

राज्यमार्गावर अतिक्रमण काढण्यास चालढकल

 • Footcar killed by truck crashes; Lotgadi moved to the hospital

  यावल- शहरातून गेलेल्या अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमार्गालगत वाढलेल्या अतिक्रमणाने गुरूवारी पुन्हा एक बळी घेतला. भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या ट्रकने सकाळी ८ वाजता भुसावळ टी पॉइंटजवळ एका पादचाऱ्यास धडक दिली. या अपघातात जखमी झालेले दिलीप बाबूराव बिरारी (वय ५३, रा.सुदर्शन चौक, यावल) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण फोफावले आहे. भुसावळ टी-पॉइंटच्या तिन्ही बाजूने अतिक्रमणाचा वेढा पडला आहे. हे अतिक्रमण पावसाळ्यानंतर काढू, असे सार्वजनिक बांधकाम उपविभागाने जाहीर केले होते. मात्र, त्यास अजूनही मुहुर्त नाही. परिणामी अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागते. याच पद्धतीने गुरुवारी एकाचा बळी गेला. शहरातील सरस्वती शाळेजवळील रहिवासी दिलीप बिरारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पायी जात होते. भुसावळकडून येणाऱ्या ट्रकने (क्रमांक (एमएच.३०-एबी.४९३४) त्यांना धडक दिली. यामुळे ट्रकच्या चाकाखाली आलेले बिरारी गंभीर जखमी झाले. यानंतर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून डॉ. अंशिजा पाटील, चेतन भोईटे यांनी त्यांना जळगावला हलवले. मात्र, उपचार सुरू असताना सकाळी १० वाजता बिरारी यांचा मृत्यू झाला. प्रकाश बिरारी यांच्या तक्रारीनुसार अपघाताचा गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार संजय तायडे तपास करत आहे.

  यावल शहरातील भुसावळ टी-पॉइंटजवळील अपघात

  अपघातानंतर जखमी दिलीप बिरारी यांना लोटगाडीवर टाकून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

  सलगच्या घटनांमुळे वाढली भीती
  गेल्या ६ नोव्हेंबर रोजी बुरूज चौकातून पायी रस्ता ओलांडणाऱ्या जिजाबाई शांताराम पाटील (वय ७५, रा.सुंदरनगरी, यावल) यांना ट्रकने उडवले होते. या गंभीर जखमी झालेल्या जिजाबाईंचा दवाखान्यात नेताना रस्त्यात मृत्यू झाला होता. यानंतर एक महिन्याच्या अंतराने ६ डिसेंबरला पुन्हा अपघात होऊन बिरारींचा बळी गेला आहे.

  चाकाखाली सापडल्याने गंभीर जखमी
  ट्रकने धडक दिल्यानंतर चाकाखाली आलेले बिरारी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या डाव्या पायास जबर दुखापत, तर डाव्या हाताचा चेंदामेंदा झाला होता. याच अवस्थेत त्यांना तेथून हातगाडीत टाकून यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आलेे. अपघातानंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

  सार्व. बांधकामला किती बळी हवे?
  यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पावसाळ्यानंतर शहरातील राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्यात येईल, असे सांगितले होते. प्रत्यक्षात अजूनही अतिक्रमण काढण्याची हालचाली नाहीत. दुसरीकडे अतिक्रमणामुळे अपघात वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाला अजून किती बळी हवेत? असा प्रश्न आहे.

Trending