आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी दुसऱ्या सत्रापासून होणार हंगामी वसतिगृह सुरू, प्रस्ताव मागवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जिल्ह्यात दुसऱ्या शैक्षणिक सत्राची सुरुवात २५ नोव्हेंबरपासून होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर यंदा जिल्ह्यातून ऊसतोड मजुरांनी स्थलांतर केले आहे. त्यांच्या पाल्यांसाठी हंगामी वसतिगृह सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून तालुकास्तरावरून प्रस्ताव मागवल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड यांनी दिली.


जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर ऊसतोड मजूर इतर जिल्हा व राज्यांत ऊसतोडीसाठी स्थलांतरित होतात. अनेकदा हे मजूर मुलांना गावी एकटे ठेवणे शक्य नसल्याने त्यांनाही सोबत घेऊन जातात. सहा महिने मुले शाळेत न गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. हे रोखण्यासाठी मुलांची जेवणाची व राहण्याची सोय व्हावी म्हणून शासनाने हंगामी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. यंदा दुष्काळी स्थितीमुळे ऊसतोड मजुरांनी लवकर स्थलांतर केले असले तरी अद्याप दुसरे शैक्षणिक सत्र सुरू न झाल्याने जिल्ह्यात हंगामी वसतिगृहे सुरू झालेली नाहीत. मात्र, दुसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवसापासूनच वसतिगृह सुरू करण्याचे प्रयत्न शिक्षण विभागाने सुरू केले आहेत. सोमवारी झालेल्या बैठकीतही याबाबत सूचना दिल्या असून दोन दिवसांत ही प्रक्रिया होणार आहे.


शिरूरमध्ये प्रतिविद्यार्थी मिळणार साडेआठ हजार रुपये
हंगामी वसतिगृहांबाबत दरवर्षी होत असलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने यंदा शिरूर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांना वसतिगृहाऐवजी थेट अनुदान देण्यात येणार आहे. प्रतिविद्यार्थी सुमारे साडेआठ हजार रुपये मिळणार आहेत. याचीही माहिती मागवली.


वसतिगृहाचे प्रस्ताव पाठवण्याबाबत सूचना दिल्यात
सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना वसतिगृहाचे प्रस्ताव पाठवण्याबाबत सूचना दिल्या. काही तालुक्यांची माहिती मिळाली असून काही तालुक्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. राजेश गायकवाड, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जि.प. बीड.

बातम्या आणखी आहेत...