आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमसेनजींचा नातू स्वरमंचावर, महिला कलाकारांचे धृपदगायन अन‌् पखवाजसाथीलाही महिलाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात शुक्रवारी सादरीकरण करताना पं. जसराज. - Divya Marathi
पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात शुक्रवारी सादरीकरण करताना पं. जसराज.

पुणे : एरवी धीरगंभीर स्वरातली खर्जातली धृपदाची आवर्तने ज्या स्वरमंचाने ऐकली, त्याच स्वरमंचावर शुक्रवारी प्रथमच स्त्री कलाकारांच्या उंच, नाजूक स्वरातील खर्ज आवर्तने आणि पारंपरिक नोम् तोम् रसिकांनी अनुभवली. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या ६६ वर्षांच्या वाटचालीतील हा दिवस त्यामुळे स्मरणीय ठरला. धृपद गायनाची साधना करणाऱ्या अमिता सिन्हा महापात्रा आणि जान्हवी फणसळकर यांनी अनोख्या गायकीने रसिकांची दाद मिळवली. त्यांच्या धृपदगायनाला पखवाजची साथही अनुजा बोरुडे या स्त्री कलावतीने केली.

धृपद गायनाचे व्यवच्छेदक लक्षण असणाऱ्या आकारयुक्त आलापीतून तसेच नोम् तोम् मधून दोन्ही गायिकांनी राग भीमपलास उलगडला. धृपद गायक गुंदेेचा बंधूंचे शिष्यत्व त्यांना लाभले आहे. चौतालात निबद्ध असणाऱ्या 'कुंजनमे रचू रास' या रचनेतून त्यांनी खास धृपद अंगाने जाणाऱ्या गमकेची विविध रूपे दर्शवली. त्यानंतर 'झीनी चदरिया' हे कबीर भजन त्यांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने सादर केले. धृपद गायनातील एकमेकींमधील सुसंवाद आणि ताळमेळही त्यांनी उत्तम जपला.

झुकरमन यांचा अनोखा चंद्रनंदन 

उस्ताद अली अकबर खाँ यांचे सर्वात ज्येष्ठ शिष्य केन झुकरमन यांनी राग चंद्रनंदनची निवड सादरीकरणासाठी करून वेगळेपण दाखवून दिले. जोगकंस आणि नंदकंस या रागांचे मिश्रण असलेल्या या रागातील झुकरमन यांचे वादन आदर्शवत होते. विलक्षण शांत, गंभीर असे आलापीचे काम त्यांनी ज्या पद्धतीने केले, ते विलक्षण होते. त्यानंतर गोरखकल्याण रागात त्यांनी दोन रचना सादर केल्या. मोजक्या वेळात रागरूप उभे करत, गूढ, गंभीर आणि विरागी असा गोरखकल्याण त्यांनी मूर्तिमंत साकारला. त्यांना पं. रामदास पळसुले यांनी केलेली तबल्याची साथ विशेष उल्लेखनीय होती.

पं. जसराज यांचा स्मरणीय जयजयवंती


तिसऱ्या दिवशीची सुरेल सांगता पं. जसराज यांच्या राग जयजयवंतीच्या गायनाने झाली. आकाशगंगेतील नव्याने शोध लागलेल्या ग्रहभागांना पं. जसराज यांचे नाव देण्यात आल्याची शुभवार्ताही याप्रसंगी रसिकांना देण्यात आली.

विराज आश्वासक

पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज यांनी सादर केलेला पूरियाधनाश्री त्यांच्याविषयीचे आश्वासन रसिकांना देणारा ठरला. सोळा वर्षांचा हा किशोर सवाईच्या स्वरमंचावर प्रथमच आला. पण आत्मविश्वासपूर्ण आविष्कार सादर करून त्याने वाहवा मिळवली. संथ, शांत, संयमित अशी आलापचारी पूरियाधनाश्रीचे सौंदर्य खुलवणारी होती. 'पायलिया झनकार' या द्रुत बंदिशीत विराज यांच्या तानांचे वैविध्य दिसले. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या अभंगगायनातून विराज यांनी भक्तिरसपूर्ण वातावरण निर्माण केले. रसिकांच्या आग्रहाला मान देऊन त्यांनी 'भाग्यदा लक्ष्मी' हे कानडी भजनही सादर केले. त्यांचे वडील श्रीनिवास जोशी पूर्णवेळ त्यांच्या पाठीशी बसून होते.

 

बातम्या आणखी आहेत...