आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअयाेध्या / लखनऊ - अयाेध्याप्रश्नी आता देशाला केवळ सर्वाेच्च न्यायालयाच्या निवाड्याची प्रतीक्षा आहे. हा निवाडा कोणत्याही दिवशी जाहीर केला जाऊ शकतो. त्याआधी सांप्रदायिक सद्भावनेसाठी विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) राम मंदिरासाठीच्या दगडांना आकार देण्याचे काम बंद केले आहे. १९९० नंतर पहिल्यांदाच विहिंपने हे काम थांबवलेे. १९९० मध्ये राम मंदिर आंदोलनादरम्यान विहिंपने हे काम सुरू केले होते. त्यास कारसेवा असे नाव दिले होते. विहिंपचे प्रवक्ते शरद शर्मा म्हणाले, सर्व कारागिरांना घरी पाठवण्यात आले आहे. विहिंपच्या म्हणण्यानुसार १.२५ लाख क्युबिक फूट दगडांची घडण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. एवढे घडीव काम मंदिराचा पहिला मजला साकारण्यासाठी पुरेेसे ठरू शकेल. दुसऱ्या मजल्यासाठी १.७५ क्युबिक फूट दगडाची गरज भासणार आहे. त्या दगडांचे घडीव कामही सुरू आहे. न्यायालयाचा निकाल कोणत्याही बाजूने गेला तरी हा निर्णय स्वीकारला पाहिजे, असे विहिंपचे राष्ट्रीय अध्यक्ष चंपत राय यांनी सांगितले. लोकांनी कोणताही जल्लोष किंवा टिप्पणी करण्यापासून दूर राहिले पाहिजे.
आश्वासन : प्रशासन म्हणते, विवाह रोखणार नाही
अयोध्येच्या प्रशासनाने जिल्ह्यातील जनजीवनावर काहीही परिणाम होऊ दिला जाणार नाही, याची सर्व खबरदारी घेतली आहे. लोकांचे खासगी कार्यक्रम थांबवले जाणार नाहीत. त्यातही या महिन्यात विवाह असलेले कार्यक्रम निर्विघ्न पार पडतील, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे. अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुज कुमार झा म्हणाले, खासगी कार्यक्रमांच्या आयोजनांवर बंधन नाही. त्यात विवाहासारख्या समारंभांचाही समावेश होतो. अयोध्येत आधीपासूनच लोकांनी वाण-सामान, दैनंदिन वापराच्या वस्तू साठवण्यास सुरुवात केली आहे. राजेश कुमार म्हणाले, माझ्या मुलीचा २५ नोव्हेंबरला विवाह आहे. मी गेस्ट हाऊस बुक केले आहे. वरात जौनपूर जिल्ह्यातून येणार आहे. वर पक्षाला अयोध्येत प्रवेश करण्याची परवानगी मिळेल की नाही, याचीच चिंता वऱ्हाडी मंडळींना वाटते.
कयास : ८, १३,१४, १५ नोव्हेंबर यापैकी एका दिवशी निर्णय येऊ शकेल
आता कोर्टाचा निर्णय कोणत्या दिवशी येईल? यावरून अनेक कयास लावले जात आहेत. काही जाणकारांना निकाल ८ नोव्हेंबरला जाहीर होईल, असे वाटते. निर्णयाची वेळ दुपारी साडेतीन वाजता शक्य आहे. कारण शुक्रवारी नमाज असते. काही जणांना १३ ते १५ नोव्हेंबरलाअपेक्षित वाटताे. न्यायालयीन कामकाजाच्या दिवसांपैकी या आठवड्यात ८ नोव्हेंबर आहे. नंतर ९, १०, ११ व १२ रोजी सुटी आहे. १६ नोव्हेंबर रोजी शनिवार, तर १७ रोजी रविवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई निवृत्त होतील.
गर्दीच गर्दी : कार्तिक पाैर्णिमेच्या स्नानासाठी २० लाख भाविक दाखल
अयोध्येत गुरुवारपासून पंचकोसी परिक्रमेला सुरुवात झाली. ही परिक्रमा १५ किमीची आहे. या निमित्ताने शहरात भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. जवानांना तैनात करण्यात आले आहे. ड्रोननेही निगराणी केली जात आहे. या परिक्रमेत शुक्रवारपर्यंत अयोध्येत सुमारे २० ते ३० लाख भाविक येतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.