आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीच्या इतिहासात प्रथमच 12 गावांना पाटाचे पाणी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरीनाथ काळे 
फुलंब्री - फुलंब्री तालुक्यातील वाकोद मध्यम प्रकल्प पहिल्यांदाच नऊ वर्षांत परतीच्या पावसाने १०० टक्के भरला. त्यात लघु पाटबंधारे विभाग क्र. १ च्या योग्य नियोजनामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी इतिहासात प्रथमच दाेन दिवसांसाठी १२ किमी टाेकापर्यंत पाटाने पाणी सोडण्यात आले. तर भरउन्हाळ्यात विहिरींना पाण्याच्या धारा लागल्या. यात ४७६ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून जोमात असलेल्या रब्बीला पाणी मिळाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे.  
वाकोद मध्यम प्रकल्प हा २००६ मध्ये पूर्ण झाला आहे. 

हा प्रकल्प तालुक्याच्या मध्यभागी असून अनेक गावांची तहान या प्रकल्पावर असलेल्या विहिरीवरून भागते. रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी पाणी सल्लागार समितीची बैठक झाली होती. या बैठकीत रब्बी पिकांसाठी प्रकल्पांतर्गत ३६५ हेक्टरला पाणी देण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. लाभ क्षेत्रातील व बुडीत क्षेत्रातील वाकोद, महालकिन्होळा, वडोदबाजार, वडोद खुर्द, नायगव्हाण, विरमगाव, पाल, लेहा अादी गावांतील लाभधारक शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा झाला. पाणी व्यवस्थित पुरवण्यासाठी लघु पाटबंधारे विभाग क्र.१ कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाकोद कालवा उपविभागीय अभियंता जयंत गायकवाड, स. अभियंता कैलास साळी, मनोज वाघचौरे यांच्यासह सुधीर जोशी, विनायक दळे आदींनी परिश्रम घेतले. 

नदीजोड कालव्यासाठी प्रशासकीय मान्यता बाकी 
गिरजा-वाकोद नदीजोड कालवा हा गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित आहे. आघाडी सरकारच्या काळात माजी आ. डॉ. कल्याण काळे यांनी हा नदी जोडकालवा होण्यासाठी प्रयत्न केले होते. या कामाला फक्त प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी होते. आता महाविकास अाघाडीचे सरकार असल्याने प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

लाभक्षेत्रातील पिकांना दोन पाणी पाळ्या देण्याचे नियोजन
फेब्रुवारी महिन्यात पाण्याची मागणी आल्यानंतर तब्बल १२ किमी पाटाद्वारे पाणी सोडण्यात आले. यामध्ये प्रथमच पाटाच्या शेवटच्या टोकाला पाणी गेले असून यामध्ये तीन पाझर तलाव भरण्यात आले. १२ किमी सोडलेल्या पाटाच्या पाण्याने पाटालगत असलेल्या अनेक विहिरींंना पावसाळ्यासारख्या धारा लागल्या आहेत. 

आरक्षण सोडून सिंचनासाठी पाणी उपलब्ध
सद्य:स्थितीत वाकोद मध्यम प्रकल्पात ५७ टक्के पाणीसाठा असून पिण्याच्या पाण्याचे आरक्षण वगळून, जर शेतकऱ्यांनी पाणीपट्टीचा भरणा करून सिंचनासाठी पाणी मागितले तर अजून २०० हेक्टरला पाणी उपलब्ध करून देता येईल. -जयंत गायकवाड, अभियंता

वाकोद प्रकल्पात गिरजा नदीचे पाणी आले तर शेतीच्या पाण्यासह तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. गिरजा-वाकोद जोडकालवा व्हावा यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या माध्यमातून जलसंपदामंत्री यांची भेट घेतली आहे. गिरजा वाकोद प्रकल्प लवकरच मार्गी लागण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. - किशोर बलांडे, बांधकाम सभापती, जि.प. औरंगाबाद

पाट शेतातून गेला, मात्र पाणी कधी येईल याची प्रतीक्षा होती.  पाटाच्या पाण्याने गावातील पाझर तलावात पाणी सोडले. परंतु माझ्या शेतातून गेलेल्या पाटाने माझ्या विहिरीला मोठे पाणी आले. - पांडुरंग मंदाडे, शेतकरी

बातम्या आणखी आहेत...