Home | Maharashtra | Marathwada | Nanded | For the first time in the history of Loha NP, BJP win the election

लोहा न.प.च्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप सत्तेवर; 17 पैकी 13 जागा पटकावून दिला काँग्रेसला धक्का

प्रतिनिधी | Update - Dec 11, 2018, 07:57 AM IST

नगराध्यपदाच्या थेट निवडणुकीतही भाजपचे गजानन सूर्यवंशी साडेतीन हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाले

  • For the first time in the history of Loha NP, BJP win the election

    नांदेड- लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला जोरदार धक्का देत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. एकूण १७ सदस्यांच्या नगर परिषदेत भाजपचे १३ तर काँग्रेसला अवघ्या ४ जागा मिळाल्या. मावळत्या नगर परिषदेत काँग्रेसकडे सर्वच्या सर्व १७ जागा होत्या. नगराध्यपदाच्या थेट निवडणुकीतही भाजपचे गजानन सूर्यवंशी साडेतीन हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांना ९ हजार ६०५ मते मिळाली तर काँग्रेसचे व्यंकटेश संगेवार यांना ५ हजार ९०९ मते मिळाली.

    लोहा नगर परिषदेवर गेली पाच वर्षे काँग्रेसची सत्ता होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि लोहा मतदार संघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागले होते. प्रताप पाटील चिखलीकर यांनी काँग्रेसची सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अखेर मतदारांनीही चिखलीकरांच्या बाजूने कौल देऊन लोहा नगर परिषदेत पहिल्यांदाच भाजपला सत्ता दिली. जिल्ह्यात भाजपने एकहाती सत्ता मिळवलेली लोहा ही पहिली नगर परिषद आहे. मावळत्या नगर परिषदेत एकछत्री अंमल असलेल्या काँग्रेसला या वेळी केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. ज्योती जीवन चव्हाण, वर्षा संभाजी चव्हाण, पंचशील विक्रम कांबळे व शारदाबाई बबन निर्मले या चार उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झाले.


    भारतीय जनता पक्षाच्या विजयी उमेदवारांत नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्यासह दत्ता आप्पाराव वाले, छत्रपती संभाजी धुतमल, राहीबाई खोब्राजी खिल्लारे, बालाजी व्यंकटी शेेळके, चंद्रकलाबाई अरुणराव यळगे, केशवराव व्यंकटराव चव्हाण, गोदावरी गजानन सूर्यवंशी, शेख न्यामतबी हबीब, संदीप ज्ञानेश्वर दमकोंडवार, अनुसयाबाई सदाशिव यलरवाड, शरद नामदेव पवार, कल्पना केशवराव चव्हाण आणि मुजावर करीम महोद्दीन यांचा समावेश आहे.

Trending