आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळाच्या इतिहासात अध्यक्षांनी प्रथमच सुनावली मुख्य सचिवांना शिक्षा

एका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांच्या मध्यस्थीनंतर शिक्षा मागे
  • औचित्याच्या ८३ मुद्द्यांपैकी केवळ ४ प्रश्नांना प्रशासनाकडून उत्तर

मुंबई - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या रागाचा पारा सोमवारी भलताच चढला आणि त्यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांना चक्क विधानसभेच्या प्रवेशद्वारावर येऊन माफी मागावी, असे आदेश दिले. परंतु नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आदेश मागे घेण्याची विनंती अध्यक्षांना केल्यानंतर त्यांनी शिक्षा मागे घेतली, परंतु पुढे असे घडले तर शिक्षा दिलीच जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष आणि विविध समित्यांचे अध्यक्ष नेहमीच प्रशासकीय अधिकारी कामकाजात हयगय करतात ज्यामुळे वेळेवर उत्तरे मिळत नाहीत, असा आरोप करीत आले आहेत. अनेकदा सभागृहात तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. प्रश्नोत्तरे असोत वा लक्षवेधी सूचना अधिकारी वेळेत उत्तरे देत नसल्याने अनेकदा मंत्र्यांना प्रश्न वा लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्याची विनंती अध्यक्षांना करावी लागली आहे. सोमवारी याच कारणामुळे अध्यक्षांचा राग अनावर झाला. आक्रमक झालेल्या अध्यक्षांच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाच्या दिरंगाईबद्दल मी उपमुख्यमंत्री म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात असे घडणार नाही, याची मी खात्री देतो, असे सांगत विधानसभा अध्यक्षांना ही शिक्षा मागे घेण्याची विनंती केली. तसेच  मुख्य सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून मुख्यमंत्री आणि मी सक्त सूचना देतो, असेही त्यांनी सांगितले.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, अध्यक्षांच्या भावना समजू शकतो, कोणावरही कारवाई करताना आपल्याकडे बोलवून त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे, अशी भूमिका मांडली. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासनातर्फे माफी मागितली असल्याने आपण त्यांना बोलावून घ्या आणि कडक समज द्या आणि शिक्षा मागे घ्या. अशी विनंतीही केली.यानंतर अध्यक्ष नाना पटोले यांनी, सभागृहाचे पावित्र्य राखले जात नसेल तर कडक भूमिका घेणे भाग असते. तहसीलदार, ठाणेदारही आमदाराचा मान ठेवत नाहीत. या पद्धतीने प्रशासनाची वागणूक असेल आणि आमदारांच्या तक्रारी आल्या तर मी यापुढे मुख्य सचिवांनाच जबाबदार धरेन. मी जोपर्यंत या खुर्चीवर आहे तोपर्यंत हा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी मुख्य सचिवांना दिला. औचित्याच्या मुद्द्यावर एका महिन्यात उत्तरे आवश्यक

विधानसभेत मागील अधिवेशनात ८३ औचित्याचे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्यातील फक्त ४ मुद्द्यांना प्रशासनाने उत्तर दिले. खरे तर नियमानुसार औचित्याच्या मुद्द्यांना एका महिन्यात उत्तर द्यावे लागते, परंतु अधिकाऱ्यांनी वेळेवर उत्तर न दिल्याने या दिरंगाईबद्दल विधिमंडळ प्रशासन वारंवार पाठपुरावा करत होते. ही बाब विधानसभा अध्यक्षांनीही मुख्य सचिवांना फोन करून सांगितली होती. मात्र तरीही उत्तरे न मिळाल्याने अध्यक्ष नाना पटोले प्रचंड चिडले. त्यामुळे आक्रमक होऊन अध्यक्ष नाना पटोले यांनी, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर येऊन माफी मागावी, असे आदेश दिले.