आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात प्रथमच वारकरी व नारदीय कीर्तन, चार वर्षांचा पदविका अभ्यासक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - महाराष्ट्रामध्ये कीर्तनाची मोठी परंपरा आहे. मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणून कीर्तन या प्रकाराकडे बघितले जाते. महाराष्ट्रात वारकरी व नारदीय अशा दोन कीर्तन पद्धती महत्त्वाच्या मानल्या जातात. या कीर्तन पद्धतींचा अभ्यास अनेक विद्यार्थी करत असतात. परंतु विद्यापीठ पातळीवर अशी सोय फारशी उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात प्रथमच वारकरी व नारदीय अशा दोन कीर्तन पद्धतींचा एकत्रित पदविका कोर्स पुण्यात भारती विद्यापीठाने सुरू केला आहे. कीर्तन पद्धतीचा अभ्यास करण्याची इच्छा व कीर्तनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. सध्या या वर्गात एकूण ६० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.


चारुदत्त आफळे यांचे मार्गदर्शन लाभणार 
राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि ज्येष्ठ कीर्तनकार निंबराज महाराज जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम सुरू आहे. संत साहित्याचा विस्तृत परिचय, नारदीय व वारकरी कीर्तनाची वैशिष्ट्ये, महाराष्ट्रातील इतर कीर्तन परंपरांचा परिचय, भारतीय इतर भाषिक कीर्तनाचा परिचय, कीर्तन व समाज मानसशास्त्र यातील परस्पर संबंध आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे, असे भारती विद्यापीठाचे परफॉर्मिँग आर्टचे संचालक शारंगधर साठे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.


या अभ्यासक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल. तसेच यामध्ये कालानुरुप आवश्यक बदलही करण्यात येतील,असेही साठे यांनी सांगितले. या  वेळी विद्यापीठ आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

 

असा असेल चार वर्षांचा अभ्यासक्रम
> अभ्यासक्रम चार वर्षे कालावधीचा 
> सैद्धांतिक, मौखिक व प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण
> एकूण सोळा कीर्तनांचे प्रशिक्षण
> कीर्तन ही सादरीकरण कला असल्याने गायन, वादन, निरूपणाचे प्राथमिक प्रशिक्षण
> सैद्धांतिक परीक्षेत कीर्तन परंपरेचा इतिहास आणि वैशिष्ट्ये
 

दोन परंपरांची वैशिष्ट्ये अशी
वारकरी आणि नारदीय कीर्तन परंपरांविषयी माहिती देताना निंबराज महाराज जाधव म्हणाले, ‘वारकरी परंपरेत फक्त संतांच्या रचनांचाच समावेश असतो. नारदीय परंपरेत अभंगांसह अन्य रचना, पदे, पोवाडे, गीते, आर्या, साकी, दिंड्या हेही असते. वारकरी परंपरेत मृदंग, वीणा आणि टाळकरी असतात. नारदीय परंपरेत तबला आणि पेटी वापरली जाते. वारकरी परंपरेत कीर्तनकार फेटा आणि उपरणे परिधान करतात. नारदीय परंपरेत पगडी परिधान केली जाते. पूर्वरंग आणि उत्तररंग हे भाग दोन्हीकडे असले तरी कथन पद्धतीत काहीसा वेगळेपणा असतो.

बातम्या आणखी आहेत...