आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • For The First Time, India's Two Batsmen Number One In The Men's And Women's Rankings

प्रथमच महिला व पुरुष क्रमवारीत भारताचे दोन फलंदाज नंबर वन; सांगलीची स्मृती महिला गटात नंबर वन फलंदाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई- न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय महिला संघाच्या मालिका विजयामध्ये महाराष्ट्राच्या दोन प्रतिभावंत युवा फलंदाजांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये सांगलीची स्मृती मंधाना आणि मुंबईची जेमिमा रॉड्रिग्जचा समावेश आहे. या दोघींमुळे भारताने दौऱ्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका २-१ ने आपल्या नावे केली. यात स्मृतीने एकूण १९६ धावांची मोठी खेळी केली. यात प्रत्येकी एका शतकासह अर्धशतकाचा समावेश आहे. तिची  मालिकेतील ही उल्लेखनीय खेळी ठरली. त्यामुळे तिला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याच  फलंदाजीच्या बळावर  स्मृतीने  वनडे क्रमवारीत मोठी प्रगती साधली. तिने ७५१ रेटिंग गुणांच्या आधारे फलंदाजाच्या क्रमवारीत नंबर वनचे सिंहासन गाठले. यामुळे आता पहिल्यांदाच भारताचे दोन्ही फलंदाज हे क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर आहेत. यातील महिला गटात स्मृती आणि पुरुष गटात विराट कोहलीने हे मानाचे स्थान गाठले. कोहलीने अव्वल स्थान कायम ठेवले. तर, स्मृतीने नव्याने या स्थानावर धडक मारली.
 
७० गुणांच्या आघाडीने नंबर वन : 
सांगलीची स्मृती मंधानाने महिला फलंदाजाच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या एलीस पेरीला मागे टाकले. तिने हा पल्ला गाठण्यासाठी ७० गुणांनी आघाडी घेतली. म्हणजेच तिने ७५१ गुणांसह हे स्थान गाठले. यात दुसऱ्या स्थानावर असलेल्या पेरीच्या नावे ६८१ गुण आहेत.  
 
मितालीची घसरण : 
कर्णधार मितालीला क्रमवारीत फटका बसला. तिची एका स्थानाने पाचव्या स्थानी घसरण झाली.   


जेमिमा रॉड्रिग्जची क्रमवारीत   ६४ स्थानांनी मोठी प्रगती  
युवा सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्जने क्रमवारीत मोठी प्रगती साधली.तिने ६४ स्थानांनी सुधारणा केली. त्यामुळे तिला ६१ वे स्थान गाठता आले. जेमिमाने सलामीच्या वनडेत  नाबाद ८१ धावांची खेळी केली. तिने गत वर्षी मार्चमध्ये  पदार्पण केले.

 
ऑलराउंडर क्रमवारीमध्ये दीप्ती शर्मा चौथ्या स्थानी   
वनडेच्या  ऑलराउंडरच्या  क्रमवारीतही भारताची महिला खेळाडू आहे. यात दीप्ती शर्माने चौथे स्थान गाठले. तिने अष्टपैलू खेळी करताना मालिकेत चार विकेट घेतल्या व ६० धावांचे योगदान दिले.      

 
भारत  तिसऱ्या स्थानी  
वनडे टीम  क्रमवारीत भारतीय महिला संघ तिसऱ्या स्थानावर आहे.  भारताचे १२२ गुण आहेत. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियन महिला संघ अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारताला आता एका गुणांच्या आघाडीने इंग्लंडला मागे टाकण्याची मोठी संधी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...